- डॉ. शंतनु अभ्यंकर
ऐंशीच्या दशकात एचआयव्ही एखाद्या झंझावातासारखा भारतीय समाजव्यवस्थेवर कोसळला. आपण सोवळा समजत असलेला भारतीय समाज किती ओवळा आहे, हे लख्ख दिसून आलं. एचआयव्ही बाधितांना वाळीत टाकण्यापासून सुरुवात झाली. पदोपदी भेदभावाची वागणूक, लागट बोलणं, घृणा, निगरगट्ट आरोग्य व्यवस्थेकडून दुर्लक्ष, आरोग्याची हेळसांड अशा अनेक आघाड्यांवर रुग्णांना लढावं लागायचं. लैंगिक संबंधातून पसरणारा रोग म्हटल्यावर, त्यावर नीती-अनीतीची, पूर्व सुकृताची, पापपुण्याची पुटं चढायला कितीसा वेळ, तशी ती चढलीच. त्यातून अशा एखादीला दिवस गेले, तर वेगळीच प्रश्नचिन्हं ‘आ’ वासून उभी राहायची. बाळाला वारेतून, जनन-मार्गातून आणि दुधातूनही एचआयव्ही होण्याची शक्यता हा पहिला प्रश्न. तसं झालं, तर त्याच्या आजाराचे, उपचाराचे प्रश्न आणि पुढे ते जगले वाचले, तर अल्पायुषी पालकांमुळे त्याच्या भविष्याचे प्रश्न! या मुलांच्या अशा अवस्थेचे पापाचे माप कुणाच्या पदरात टाकणार? जन्मतः एचआयव्हीची लागण झालेली तान्ही बाळं म्हणजे एचआयव्हीचे सर्वात निरागस बळी. आईकडून बाळाला लागण होते हे खरं, पण हे अर्धसत्य. आईला आजार असल्याशिवाय बाळाला तो होईलच कसा? प्रश्न रास्त आहे, पण तरीही ‘आईकडून बाळाला’ म्हणताना, आईविरुद्ध एक सूक्ष्म अढी दर्शविली जाते. आई गुन्हेगार आहे आणि बाप नाही, असं काहीतरी वाटू शकतं. मुळात आईला एचआयव्हीची लागण बहुदा बापाकडूनच झालेली असते. पण कुणाला ‘गुन्हेगार’ ठरवण्याचा अधिकार आरोग्य व्यवस्थेला नाही. हे सगळं लक्षात घेऊन ‘आईकडून बाळाला लागण’ हा शब्द समूह बदलला गेला. ‘पालकांकडून बालकाला लागण’ असा अधिक निर्विष, अधिक समन्यायी शब्दप्रयोग आता वापरला जातो. जागतिक आरोग्य संघटना सांगते की, मुळात होऊ घातलेल्या पालकांनी एचआयव्हीच टाळला किंवा त्यांनी अवांच्छित गर्भधारणा टाळली, तरी बराच प्रश्न सुटायला मदत होते आणि नियमित औषधांनी उरलेला प्रश्न मार्गी लागतो. पण हे आता...
पण हे आता...
तीस पस्तीस वर्षांपूर्वी, कोणी एचआयव्ही बाधित जोडपे आम्हाला मूल हवंय वगैरे चर्चा करू लागले की, अंगावर काटा यायचा. शरीरसंबंध ठेवताना निरोध वापरा, असा सज्जड सल्ला दिलेला असायचा. कारण कोणी एक जण एचआयव्ही बाधित असेल, तर जोडीदार बाधित होईल. अगदी दोघेही बाधित असले, तरी एचआयव्हीचे नवे-नवे स्ट्रेन्स दोघांतही निर्माण होत असतात आणि हे परस्परांना नवखे स्ट्रेन्स, परस्परांना बाधक ठरू शकतात. ‘नवे स्ट्रेन्स नवे गुणधर्म’ हे आता कोरोनामुळे सगळ्यांना माहीत आहे.
(पूर्वार्ध) (लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत.)
shantanusabhyankar@hotmail.com