Join us   

गरोदरपणात चेहरा काळवंडतो, त्वचेवर पडतात डाग.. हे कायमस्वरुपी की तात्पुरतं; डाॅक्टर काय म्हणतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 8:04 PM

गरोदरपणात चेहरा काळवंडतो, त्वचा खराब होते.  याचा अर्थ आईला किंवा बाळाच्या जीवाला काही धोका असेल का? काळवंडलेला चेहरा पुन्हा पूर्ववत होणारच नाही का? अशा अनेक शंका कुशंका गरोदर महिलांमधे असतात. याचं नेमकं कारण कळलं तर काळजी घेणं सोपं होईल. 

ठळक मुद्दे गरोदरपणात चेहरा काळवंडणे, त्वचा खराब होणे ही समस्या 70 टक्के महिलांमधे असते. हा बदल टाळण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी हा बदल न टाळता येणारा आहे.  त्वचेच्या रंगात होणारा बदल हा शरीराच्या आत होणाऱ्या बदलाच्या प्रक्रियेवर अवलंबून असतो. 

गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. काही बदल तर असे असतात, की स्वत:च्या तर येतातच लक्षात आणि इतरांच्याही ठळकपणे लक्षात येतात. गरोदरपणात एक जाणवणारा ठळक बदल म्हणजे त्वचा काळवंडते, त्वचेवर काळे डाग पडतात.  विशेषत: गाल, कपाळ, नाक, वरच्या ओठांवरची  त्वचा येथे काळे डाग दिसतात किंवा हा भाग जास्त काळवंडतो. गरोदरपणात होणारे हे सामान्य बदल आहे. जे होतात आणि बाळंतपणानंतर चेहऱ्याचा काळवंडलेपणा, त्वचेवरचे काळे डाग हळूहळू कमीही होतात. त्वचा काळवंडते याचा अर्थ  आईच्या आणि बाळाच्या जीवाला धोका असतो असं  नाही किंवा गरोदरपणात चेहरा काळवंडतो, त्वचेवर काळे डाग पडतात , ते कायमस्वरुपी राहातात असं नाही.  सौंदर्याच्या दृष्टिकोनातून यामुळे खूप हानी होते असं नाही. 

गरोदरपणात चेहरा केव्हा काळवंडतो?

गरोदरपणात त्वचा काळवंडणे, डाग पडणे, त्वचेचा रंग जर काळा असेल तर तो आणखी गडद होणे या समस्या 70 टक्के गरोदर महिलांमधे आढळून येतात. गरोदरपणाचा कालावधी जसजसा पुढे सरकतो, तशी ही समस्या वाढते. आणि गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत चेहऱ्याच्या त्वचेच्या रंगातील  हा बदल तीव्रतेने जाणवतो. समजा चेहऱ्यावर किंवा त्वचेवर कुठे तीळ असेल, काही डाग असेल तर तो गरोदरपणात ठसठशीत दिसतात.  त्वचा  मुळातच सावळी किंवा काळी असल्यास ती जास्त गडद होते. हे घडतं कारण रक्तातील मेलानिनचं प्रमाण गरोदरपणात वाढतं. 

Image: Google

त्वचा का काळवंडते?

गरोदरपणात त्वचा काळवंडण्याचं एकमेव कारण  शरीरातील विशिष्ट हार्मोन्समधे होणारे चढउतार हेच असतं.  प्रोजेस्टेराॅन आणि इस्ट्रोजन या दोन हार्मोन्सची पातळी वाढते. त्यामुळे मेलानिनची निर्मिती ही जास्त होवून त्वचा काळवंडते.

Image: Google

गरोदरपणात त्वचा काळवंडू नये म्हणून काय करावं?

गरोदरपणात त्वचा काळवंडते ती केवळ  शरीराच्या आतील हार्मोन्सच्या पातळीत होणाऱ्या बदलांमुळे. त्यामुळे हे होवू नये म्हणून विशेष  काही केलं तरी त्वचा काळवंडतेच. मात्र एक आहे, की त्वचेचा पोत चांगला राहावा, त्वचेच्या बाबतीत झालेल्या बदलांचा परिणाम कायमस्वरुपी त्वचेवर राहू नये म्हणून काळजी घेणे या स्वरुपात काही गोष्टी आपण नक्कीच करु शकतो. 

1. बाहेर जातांना उन्हापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी अंगात सनकोट घालणं, चेहेऱ्यावर स्फार्फ गुंडाळणं ही काळजी अवश्य घ्यायला हवी. ऊन लागून त्वचा आणखी जास्त काळवंडण्याचा धोका असतो. बाहेर पडण्याआधी सनस्क्रीन लावणं, डोक्यात टोपी घालणं यासारख्या साध्या सोप्या उपायांमुळे चेहऱ्यावर थेट सूर्यप्रकाश पडत नाही. 

2. एसपीएफ 30 किंवा त्यापेक्षा  जास्त प्रमाण असलेल्या एसपीएफचं सनस्क्रीन वापरावं. सनस्क्रीन केवळ बाहेर जातांनाच लावावं असं नाही, तर घरात असतांनाही सनस्क्रीन लावावं. कारण घरात असतांना खिडकीतून, दरवाज्यातून जी सूर्याची किरणं आत येतात त्याचा परिणाम त्वचेवर होतोच. 

3. फोलिक ॲसिड आणि त्वचा काळवंडणं याचा संबंध असतो. शरीरात फोलिक ॲसिडची कमतरता यामुळेही त्वचा काळवंडते. त्यामुळे पुरेशा प्रमाणात फोलिक ॲसिड शरीरात जाईल असा आहार घेणं किंवा डाॅक्टरांनी सूचवलेल्या जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेणं हाच यावरचा उपाय आहे. 

Image: Google

त्वचा कशी आणि केव्हा पूर्ववत होते?

त्वचेचा काळवंडलेपणा हा बाळंतपणानंतर कमी होतो. पण बाळंतपणानंतरही त्वचा तेवढीच काळवंडलेली असली, त्याचं प्रमाण कमी झालं नाही तर त्वचारोग तज्ज्ञांना आपली समस्या दाखवणं , त्यांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. 

तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी विशेष आभार: डाॅ. डिम्पल चुडगर ( एमडी. डीएनबी, एफसीपीएस, डीजीओ, डिप्लोमा इन ॲडव्हान्स एलएपी जर्मनी, फेलो रोबोटिक सर्जरी, युएसए)

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीगर्भवती महिलात्वचेची काळजी