lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Pregnancy > फार कंबर दुखते, सिझेरिअनच्यावेळी मणक्यात इंजेक्शन दिलं त्याचाच हा त्रास, असं कोण म्हणतं?

फार कंबर दुखते, सिझेरिअनच्यावेळी मणक्यात इंजेक्शन दिलं त्याचाच हा त्रास, असं कोण म्हणतं?

बायकांना छळणारी कंबरदुखी नेमकी कशाने होते, त्यासाठी सिझेरिअनचं इंजेक्शनच जबाबदार असं म्हणत नेमका आजार आणि उपचार आपण नाकारत आहात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 PM2021-06-24T16:14:48+5:302021-06-24T16:18:00+5:30

बायकांना छळणारी कंबरदुखी नेमकी कशाने होते, त्यासाठी सिझेरिअनचं इंजेक्शनच जबाबदार असं म्हणत नेमका आजार आणि उपचार आपण नाकारत आहात का?

is cesarean injection, c section causes back pain? | फार कंबर दुखते, सिझेरिअनच्यावेळी मणक्यात इंजेक्शन दिलं त्याचाच हा त्रास, असं कोण म्हणतं?

फार कंबर दुखते, सिझेरिअनच्यावेळी मणक्यात इंजेक्शन दिलं त्याचाच हा त्रास, असं कोण म्हणतं?

Highlightsनव्वद टक्के कंबरदुखी असलेल्या स्त्रियांना नियमित व्यायाम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्यांनी खूप फरक पडू शकतो.

डॉ. शिल्पा चिटणीस जोशी

"डॉक्टर,या कंबरदुखीचा काहीतरी उपाय सांगाच!!"
"डॉक्टर,आज हिला जबरदस्तीनेच घेऊन आलोय. गेली कित्येक वर्षं हिची सतत कंबर दुखते,पण तुमच्याकडे यायलाच तयार नव्हती..असं होतंच सगळ्या बायकांना असं तिचं म्हणणं आहे.मला पटलं नाही म्हणून घेऊन आलोय तुमच्याकडे"
इति पेशंटचा वैतागलेला पण प्रेमळ नवरा..
'घरोघरी मातीच्या चुली'या धर्तीवर' घरोघरी कंबरदुखी ' असं म्हणता येईल एवढी कंबरदुखी ही कॉमन गोष्ट आहे.आणि त्याबरोबरच याबद्दल असलेले अगणित गैरसमज ,वेळप्रसंगी अंधश्रद्धासुद्धा आपल्या समाजात दिसतात. त्यामुळे या विषयी वेगळी चर्चा व्हायलाच हवी असं वाटलं.
सर्वात मोठा प्रचलित गैरसमज म्हणजे कंबरदुखी सिझेरियनच्या वेळी पाठीत दिलेल्या इंजेक्शन मुळे सुरू होते हा आहे.सिझेरियन च्या वेळी spinal anaesthesia म्हणजे मणक्याच्या एका आवरणात इंजेक्शन देऊन भूल दिली जाते.यामध्ये कमरेखालचा भाग साधारणपणे दोन तासांपर्यंत पूर्ण बधिर होतो.ही भूल स्त्री आणि बाळ दोघांकरताही अतिशय सुरक्षित असते. या भुलेमुळे बाळ बाहेर येताना पेशंट पूर्ण जागी असते. तिला बाळ लगेच दाखवले जाते आणि बाळाला स्तनपानसुद्धा ऑपरेशन टेबलवर असतानाच सुरू करता येते.दोन तासांनी भूल उतरल्यानंतर पेशंट पूर्णपणे नॉर्मल होते. खूप पूर्वी सिझेरियनच्या पेशंटला जनरल अनस्थेशिया म्हणजे पूर्ण भूल देत असत तेव्हा भुलेची औषधे रक्तातून बाळापर्यंत पोहोचायची आणि जन्मलेले बाळ त्यामुळे थोडे गुंगीत असायचे. स्तनपान सुरू व्हायला पण वेळ लागायचा.ह्या सर्व समस्या दूर करण्यासाठी स्पायनल अनस्थेशियाचा वापर सुरू झाला.

 

आता थोडंसं वेदनारहित प्रसूतीबद्दल. प्रसूतीवेदना या मनुष्याला माहीत असलेल्या सर्वात जास्त तीव्रतेच्या वेदना आहेत. दिवस भरत आलेल्या गर्भवतीच्या आजूबाजूचे जेव्हा येणाऱ्या बाळाची अतिशय आतुरतेने वाट बघत असतात तेव्हा तिला मात्र प्रसुतीकळांच्या भीतीने रात्र रात्र झोप लागत नाही. बरं या भीतीबद्दल कोणाशी बोलायला गेलं तर बहुतेक घरचे हा विषय उडवून लावतात. अशावेळी या मुलींना प्रसूती वेदनारहित करता येईल हा विश्वास आम्ही स्त्रीरोगतज्ज्ञ देऊ शकतो आणि प्रसूतीचा अनुभव भयंकर न होता सुखकारक होऊ शकतो .
यामध्ये गर्भवतीच्या प्रसूतीवेदना कमी करण्यासाठी कळा सुरू झाल्यानंतर मणक्याच्या epidural space या भागात वेदनाशामक औषध सोडले जाते. यासाठी एक अतिशय बारीक नळी मणक्याच्या आतील भागात ठेवून गरजेप्रमाणे डोस दिला जातो.गर्भवती या दरम्यान पूर्ण जागी असते आणि प्रसूतीची वेळ आल्यावर जोरपण लावू शकते.
तर हे सगळं सविस्तर सांगण्याचा उद्देश हा की स्त्रीच्या पोटातून पाच सहा आवरणे कापून गर्भाशयातले बाळ अलगद बाहेर काढून परत सगळं शिवून टाकायचं हे प्रसुतीतज्ज्ञांचं काम पण हे सगळं पेशंटला पूर्णपणे सुरक्षित ठेवून आणि कसलीही जाणीव आणि वेदना न होता हे मात्र भुलतज्ज्ञ सहजतेने आणि अतिशय कुशलतेने करतात. तसंच प्रसूतीवेदनांची तीव्रता कमी करून प्रसूती हा सुखकारक अनुभव करू शकणाऱ्या भुलतज्ज्ञांना आम्हा स्त्रीरोगतज्ज्ञांचा मनःपूर्वक सलाम! एवढं महत्त्वाचं काम करून पेशंटची भूल उतरण्याआधीच भुलतज्ज्ञ पुढच्या पेशंटकडे गेलेले असतात त्यामुळे पेशंटची कृतज्ञताही त्यांना कधी अनुभवता येत नाही. त्यांनी दिलेल्या एका इंजेक्शनला उगाचच बदनाम करण्याआधी सर्वांनी खूप विचार करायला हवा ..नाही का? भूलेची इंजेक्शन्स आयुष्यभर दुखतात हे म्हणणे म्हणजे लहान बाळांना दिलेल्या लसी आयुष्यभर दुखतात असे म्हणण्याइतकेच अशास्त्रीय आणि अतार्किक आहे.
महत्त्वाचा मुद्दा हाही आहे की भारतीय स्त्रिया स्त्रीरोगतज्ज्ञांनी कितीही आवर्जून सांगितले तरीही नियमित कॅल्शियमच्या गोळ्या घेत नाहीत. त्यामध्ये सुद्धा पूर्वीच्या पिढीत कॅलशियमच्या गोळ्या घेतल्या तर बाळाचं वजन खूप वाढतं आणि नॉर्मल डिलिव्हरी होत नाही असा गैरसमज खरंतर अंधश्रद्धाच होती. ही पिढी अजूनही अशा अशास्त्रीय आणि कधी कधी धोकादायक गोष्टी तरुण स्त्रियांच्या मनावर बिंबवत असते. एखादी प्रसूती झालेली स्त्रीसुद्धा स्वतःला याबाबतीत एक्सपर्ट समजते आणि आजूबाजूच्या सगळ्या कोवळ्या मुलींना सल्ले देत सुटते. बऱ्याच तरुण मुलींचे अशा चुकीच्या सल्ल्यांमुळे आयुष्यभराचे नुकसान होऊ शकते.

 

आपल्या समाजात काही स्तरात अजूनही मुलींना लहानपणापासून पोषक आहार मिळत नाही. कुपोषणाची सुरवात तिथूनच होते. मग लहान वयात लग्न, लगेच मुलं,एकापाठोपाठ बाळंतपणे असं शुक्लकाष्ठ लागतं त्यांच्यामागे. या सगळ्यामध्ये तिच्या शरीराच्या पोषणाचा विचार कोणीही करत नाही. चार पाच महिने झाल्याशिवाय गर्भवतीला डॉक्टरकडेही घेऊन जाण्याची तसदी न घेणारी खूप कुटुंबे आहेत. तरी बरं सगळ्या गर्भवतींना सरकारी दवाखान्यांमध्ये रक्तवाढीच्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या फुकट दिल्या जातात. बऱ्याच वेळा तर ती बिचारी आधीच्या बाळाला स्तनपान पण देत असते. कॅल्शियमच्या गोळ्यांचा कुठेच पत्ता नसतो .अशा परिस्थितीत तिच्या शरीरातील सगळं कॅल्शियम संपलं नाही तरच नवल!!
आर्थिक स्तर चांगला असलेल्या गर्भवतीसुद्धा केवळ कंटाळा म्हणून कॅल्शियम घ्यायची टाळाटाळ करतात. कॅल्शियम हे गर्भारपणात होणाऱ्या बऱ्याच गुंतागुंतींना उदा. गर्भारपणात वाढणारा रक्तदाब इत्यादी टाळण्यासाठी सुद्धा महत्वाचे आहे.
आता याच स्त्रिया बाळंतपणानंतर एकदोन वर्षात कंबरदुखीची तक्रार करू लागतात. आणि घरचे,बाहेरचे त्यांना सर्रास हे डिलिव्हरीच्या वेळच्या इंजेक्शन मुळे आहे आणि यावर काही उपाय नाही असं सांगून मोकळे होतात. एव्हाना यातल्या काही स्त्रियांचे वजन वाढलेले असते. घरच्या व्यापामुळे व्यायाम हा शब्द हद्दपार झालेला असतो. मानसिक ताणामुळे ही कंबरदुखी अजूनच वाढत जाते. मग अशास्त्रीय उपायांकडे मोर्चा वळवला जातो.
नव्वद टक्के कंबरदुखी असलेल्या स्त्रियांना नियमित व्यायाम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्यांनी खूप फरक पडू शकतो. एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे नुसत्या कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन नियमित व्यायाम केला नाही तर ते कॅल्शियम हाडांमध्ये सामावले जात नाही त्यामुळे नियमित व्यायाम अत्यंत महत्वाचा आहे. आहारामध्ये दूध व दुधाचे पदार्थ,नाचणी, कोबी, ब्रोकोली यासारख्या भाज्या यांचा समावेश असावा. अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कंबरदुखी इतरही काही आजारांमध्ये असू शकते. मणक्याचे वेगवेगळे आजार,संधिवात,मज्जासंस्थेचे विकार,क्वचित गर्भाशयाला किंवा ओटीपोटात असलेल्या गाठी यामुळेही कंबरदुखी असू शकते. साध्या उपायांनी बरे न वाटल्यास,असह्य वेदना असल्यास,पायांना मुंग्या येणे,पायांची ताकद कमी झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणे असल्यास लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.
तर मग मैत्रिणींनो पुढच्या वेळी तुमच्या गप्पांमध्ये कंबरदुखी हा विषय आला की या सगळ्या गोष्टींची चर्चा नक्की करा आणि तुमच्या सख्यांना प्रेमाचा योग्य सल्ला द्या. खरंतर प्रेमाने ओथंबलेले शब्द निम्मी कंबरदुखी बरी करूच शकतात ..हो ना?

(लेखिका पुणेस्थित स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: is cesarean injection, c section causes back pain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.