डॉ. गौरी करंदीकर
एग फ्रीजिंगची चर्चा होते, अमूक अभिनेत्री, तमूक सेलिब्रिटीने एग फ्रीज करुन ठेवले होते असे आपल्या कानावर येते. हे तंत्रज्ञान आता समाज स्वीकारत असले तरी तसा हा प्रकार नवीन नाही. एग फ्रीजिंग अर्थात स्त्रीच्या बीज कोशातील अंडी शीत अवस्थेत ठेवून त्यांचा वापर नंतर करून गर्भधारणा व त्यानंतर पहिली यशस्वी झालेली प्रसुती ही १९८६ साली डॉ. चेन यांनी नोंदवली आहे. बदलत्या काळाबरोबर आणि आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर सामाजिक बदल ही घडत गेले त्यातून एग फ्रीजिंगची संकल्पना पुढे येऊ लागली. एखाद्या स्त्रीच्या बीजकोशातल अंडी ही मासिकपाळी आल्यापासून ते साधारणत: ४५ म्हणजेच मेनोपॉजपर्यंत दर महिन्याला फलित होतात त्यामुळे गर्भधारणा शक्य होते. कर्करोग किंवा त्यासाठी होणारे औषधोपचार, किमो थेरपी अथवा रेडिओथेरपीमुळे बीजकोशावर परिणाम होऊन बीज बनण्याची क्षमता गमावण्याची भिती उत्पन्न होते. मग त्यासाठी उपाय म्हणुन ही अंडी विशिष्ट पद्धतीने काढुन ती अतिशीत अवस्थेत ठेवली जातात. तिचा साठा करून ठेवला जातो. पुढील आयुष्यात त्याच महिलेला गर्भवती होण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. याला वैद्यकीय कारणांसाठी केले फ्रिजींग म्हणतात. म्हणजेच आजराखातीर केलेली ही पर्यायी सोय. त्यातुन पुढे संकल्पना सोशल म्हणजेच सामाजिक कारणांसाठी केलेलं फ्रीजिंग मुली शिकल्या त्यांनी योग्य व्यवसाय निवडले यशाच्या पायऱ्या गाठल्या. आपल्याला जेव्हा मुल हवे असेल किंवा योग्य तो जोडीदार मिळेल तोपर्यंत थांबायचं अनेकींनी ठरवलं. मात्र त्यांना भय असं होतं की आपल्या वयामुळे जर अंडाशयाचे कार्य योग्य न राहिल्यास, त्यासाठी पर्याय म्हणुन सोशल एग फ्रीजिंग केले जाऊ लागले तसेच कुत्रीम पद्धतीने म्हणजे आयव्हीएफनी तयार झालेले गर्भ फ्रीज करण्यात धार्मिक अडचणी येत असल्यामुळे फ्रीजिंग हा सोपा मार्ग ठरला.
या प्रक्रियेचा लाभ कुणाला?
१. ज्या स्त्रियांना वैद्यकीय कारणांमुळे गर्भधारणा उशीरा होते त्यांच्यासाठी हा पर्याय वरदान ठरतो.
२. एखाद्या कुटुंबात मेनोपॉज म्हणजेच मासिक पाळी बंद होणे हे कमी वयात होत असेल, त्या मुलींसाठी हा पर्याय लाभदाय ठरू शकतो.
धोके कोणते?
१. या प्रक्रियासाठी दिलेल्या इंजेक्शनमुळे अंडाशयात पाण्याच्या गाठी व इतर दुष्परिणाम होण्याचे धोके संभावते. २. एग फ्रीजिंगनंतर गर्भधारणा होण्यासाठी कृत्रीम पद्धतीचा वापर केला जातो. शुक्राणुंना अंडाशयाच्या कवचाचे भेदन करण्यासाठी आयसीएसआय ही प्रक्रिया करणो गरजेचे असते ते केल्यानंतर ही यशस्वी गर्भधारणोची व प्रसुतीचे प्रमाण २-१२ % च असू शकते. ३. त्याचबरोबर वयाच्या चाळीशी नंतर झालेल्या गर्भवती स्त्रियांमध्ये, अपुर्ण दिवसात प्रसुती होणे, रक्तदान वाढणे, गर्भावस्थेत मधुमेह होणे याचे प्रमाण अधिक आढळते. त्यामुळे अर्थातच स्त्रीला व तिच्या गर्भाला त्यामुळे उद्भवणाऱ्या धोक्याला सामोरे जावे लागु शकते. ४. ३५-४० व्या वर्षानंतर प्रथमच माता झालेल्या स्त्रिया बालसंगोपन अधिक चांगल्या पद्धतीने करत असल्याचे दिसुन येते मात्र या गरोदरपणाचे धोके अधिक असून ह्या वयापर्यंत लांबवणे ह्याचा निर्णय वैयक्तिक असू शकतो. पालकत्व पुढे ढकलुन त्याबरोबर आपली संगोपनाची क्षमता विशेषत: मूल किशोर वयात येईर्पयत कशी असेल ह्याचा ही विचार असणो जरुरीचे ठरते. ५. आपण आपले एग्ज फ्रीज केले तरी आपलं वय फ्रीज करता येणं अद्याप शक्य नाही. ६. मुलींना, महिलांना एग फ्रीजिंगचा पर्याय असावा ही बाब नक्की खरी आहेच परंतु या मार्गाचा अवलंब करताना हा पर्याय माझ्या हिताचा आहे अथवा नाही ह्याचा विचार करणेही गरजेचे आहे.
(लेखिका स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ आहेत.)