Join us   

जुही चावला म्हणतेय मोबाईलची रेंज गर्भावर परिणाम करते.... खरंच असं होतं का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 3:54 PM

मोबाईलच्या फाईव्ह जी तंत्रज्ञानाला विरोध करणारी याचिका अभिनेत्री जुही चावला हिने नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. तिच्या आणि इतर याचिका कर्त्यांच्या म्हणण्यानुसार हे तंत्रज्ञान  गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळासाठी  सुरक्षित नाही. खरोखरंच असे असते का ?, मग अतिमोबाईल वापरणाऱ्या गरोदर मातांचे बाळ सुरक्षित असेल का ? याविषयी तज्ञांकडून जाणून घेऊ या.

ठळक मुद्दे या घटनेमुळे भारतासह जगभरातील अनेक गर्भवती मातांची झोप उडाली आहे.अनेक गर्भवती महिला  हैराण  झाल्या आहेत.

जूही चावलाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने इतर अनेक कारणांसाठी फेटाळून लावली. एवढेच नव्हे तर न्याययंत्रणेचा महत्त्वाचा वेळ वाया गेल्याचे ताशेरे ओढत चुहीला तब्बल २० लाख रूपयांचा दंडही ठोठावला. काही जणांच्या मते जुहीने केलेला हा एक निव्वळ पब्लिसिटी स्टंट होता. पण या घटनेमुळे मात्र भारतासह जगभरातील अनेक गर्भवती मातांची झोप उडाली आहे. मोबाईलची रेंज मातेचे शरीर भेदून थेट गर्भापर्यंत जाऊ शकते का ?, या विचाराने आज अनेक गर्भवती महिला  हैराण  झाल्या आहेत. अनेक उलट सुलट प्रकारच्या चर्चा देखील यानिमित्ताने रंगल्या आहेत. हा सर्व गदारोळ थांबविण्यासाठी जुही चावला हिने नुकताच एक व्हिडियो इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. यामध्ये तिने स्पष्ट शब्दांत सांगितले की, फाईव्ह जी मोबाईल तंत्रज्ञानाला आमचा विरोध नाही. मात्र मोबाईल टॉवरद्वारे निघणारी किरणे मानवी आरोग्य, पर्यावरण, गर्भवती महिला आणि लहान मुलांना अपायकारक आहेत, असा आमचा दावा आहे. 

खरोखरंच माेबाईल रेंज गर्भावर परिणाम करू शकते का ? याविषयी सांगताना औरंगाबाद येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रश्मी बोरीकर म्हणाल्या की, फाईव्ह जी तंत्रज्ञान किंवा मोबाईलद्वारे निघणाऱ्या हानिकारक लहरी शरिराचे आवरण भेदून गर्भावर परिणाम करतील, असे सध्यातरी कोणत्याही संशोधनानुसार सिद्ध झालेले नाही. मात्र ज्या व्यक्ती खूप जास्त फोनवर बोलतात, त्यांना काही कालांतराने बहिरेपणा येणे, डोळ्यांचा नंबर वाढणे किंवा डोळ्यांचे इतर अनेक आजार उद्भवणे, मानसिक समस्या जाणवणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे केवळ गर्भवती महिलांनीच नव्हे, तर प्रत्येकानेच काळजी घेतली पाहिजे आणि आवश्यक तेवढाच मोबाईलचा वापर केला पाहिजे. 

मोबाईलच्या अतिवापरामुळे उद्भवणारे आजार बहिरेपणा, डोळ्यांच्या तक्रारी यासोबतच मोबाईलचा अतिवापर केल्याने एन्झायटी, चिडचिडेपणा, अस्थिरता, एकाग्रतेचा भंग यासारख्या समस्या जाणवू शकतात. अतिमोबाईल पाहणारी मुले अतिचंचल आणि रागीट, हट्टी होऊ शकतात. 

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीगर्भवती महिलामोबाइलहेल्थ टिप्स