Join us   

पिरिएड ट्रॅकर अ‍ॅप्स काय असतात? खरंच त्यांचा उपयोग करुन पाळीच्या दिवसात योग्य काळजी घेता येते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 2:53 PM

5 Unexpected Benefits Of Period Tracking : मासिक पाळीच्या तारखा, विविध समस्या आणि हार्मोन बदल याची नोंद ठेवणं गरजेचं असतं.

मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. आपल्यापैकी काहीजणींना मासिक पाळी बरोबर त्याच तारखेला येते. परंतु काही वेळेला शारीरिक बदलानुसार या तारखा मागे पुढे होण्याची शक्यता असते. काही वेळेला तर मासिक पाळी दिवसातील कोणत्याही क्षणाला येऊ शकते. ठरलेल्या तारखेशिवाय अशा अवेळी आलेल्या पाळीची तारीख लक्षात ठेवण्यास कठीण असते. कधी - कधी मागे पुढे होणाऱ्या तारखांची नोंद नक्की कशी ठेवायची असा प्रश्न आपल्यापैकी कित्येकजणींना पडत असेल. याबाबत काळजी करण्याचे आता मुळीच कारण नाही कारण, आता स्मार्ट फोन व इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मासिक पाळीचा दर महिन्याचा ट्रॅक ठेऊ शकता. प्रत्येकीने आपल्या मासिक पाळीचा अहवाल अथवा पिरिएड ट्रॅक स्वत:च ठेवणं फार गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मासिक पाळी येण्याच्या तारखेचा योग्य अंदाज लावता येऊ शकतो. पिरिएड ट्रॅकर (Period Tracker) म्हणजे नेमकं काय आणि पिरिएड ट्रॅक करण्याचे काय आहेत फायदे समजून घेऊयात(5 Unexpected Benefits Of Period Tracking).

पिरिएड ट्रॅकर (Period Tracker) म्हणजे नेमकं काय ?

पिरिएड ट्रॅकर (Period Tracker) तुम्हाला तुमच्या मासिक पाळीचा योग्य ट्रॅक ठेवण्यास किंवा अंदाज घेण्यास मदत करतं. एखाद्या कॅलेंडर प्रमाणे ते दर महिन्याच्या तुमच्या मासिक पाळीचा अहवाल सादर करतं. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या खास प्रसंग नेमका कधी प्लॅन करावा हे समजण्यास मदत होऊ शकते. तसेच मासिक पाळीच्या काळात तुमची दैनंदिन कामे देखील विनासायास करण्यास या ट्रॅकरची नक्कीच मदत होऊ शकते.

पिरिएड ट्रॅकर वापरण्याचे कोणते फायदे आहेत ?

१. मासिक पाळीचा अंदाज बांधता येतो - पिरिएड ट्रॅकर तुम्हाला मासिक पाळी येण्याआधीच सतत त्याची सूचना देत राहतं. ते तुम्हाला मासिक पाळी कधी पूर्ण होणार हे देखील सांगू शकतं. म्हणूनच आज भारतातील अनेक महिला वेगवेगळ्या पिरिएड ट्रॅकर अप्सचा वापर करतात. 

२. तारखा ट्रॅकिंग करणं होईल सोप - आजकाल अनेक महिलांना पीसीओएस (PCOS) किंवा पीसीओडी (PCOD) सारख्या पाळी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. या महिलांची मासिक पाळी अनियमीत असल्याने त्यांना डॉक्टर मासिक पाळीचा ट्रॅक अथवा अहवाल ठेवण्याचा सल्ला देतात. अशा महिलांसाठी पिरिएड ट्रॅकर फार उपयुक्त ठरते. यामुळे महिला योग्य तारखा ट्रॅकिंग करू शकतात.    

३. मासिक पाळीचा काळ समजण्यास मदत - पिरिएड ट्रॅकर वापरल्यामुळे तुम्हाला तुमच्या मासिक पाळीचे कार्य नीट समजू लागतंं. या ट्रॅकरमुळे दर महिन्यातील तुमच्या ओव्हुलेशन चक्राची सुरुवात व समाप्ती तसेच तुमचा प्रजनन काळ शोधण्यास तुम्हाला मदत होते. मासिक पाळीतील बारकावे जसं की, अतिरक्तस्राव होणं, मध्यम रक्तस्राव होणं अथवा फक्त स्पॉटींग होणं या गोष्टी तुम्हाला लगेच जाणवू शकतात. ज्यामुळे भविष्यात काही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं सोपं होते.

४. तुमच्या पाळीसंबंधित सविस्तर माहिती देते -  तुमच्या मासिक पाळीविषयी सविस्तर माहिती ट्रॅकरमुळे तुमच्या हातात असते. जेव्हा तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला भेट देता तेव्हा तुम्हाला ही माहिती उपयोगी पडते. तुमचे पिरिएड ट्रॅकर तुमच्या डॉक्टरांना तुमच्या मासिक चक्राविषयी सर्व लहान-सहान माहिती पुरवतं.

५. हॉर्मोन्सचा ट्रॅक ठेवता येतो -  मासिक पाळी आल्यावर तुमच्या भावनांमध्ये होणारे बदल, तुमच्या आचार-विचारांचा ट्रॅक ठेवणं या अ‍ॅप्समुळे फार सोपं जातं. ज्यामुळे तुम्हाला जर या काळात चक्कर येणं, मळमळणं अथवा मूडस्विंगची समस्या असेल तर त्यावर उपाय करता येतात. तुम्हाला क्रॅम्प नेमके कोणत्या दिवशी येतात अथवा तुमचा मुड कधी बदलतो हे लक्षात आल्याने त्यावर उपाययोजना करणे सोपे होते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमासिक पाळी आणि आरोग्य