Join us   

दर महिन्याला ‘ते’ चार दिवस असह्य होतात? कारणं आणि वेदनाही कमी करण्याचे ४ उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 5:32 PM

एकदा पाळीच्या कळा सुरू झाल्या की ४ दिवस झाल्याशिवाय त्या थांबायचे नाव घेत नाहीत. त्यामुळे आपला हा त्रास कमी व्हावा असं वाटत असेल तर हे उपाय नक्की ट्राय करुन पाहा...

ठळक मुद्दे पाळी येण्याच्या आधी आणि पाळीतही असा शेक घेणे दुखणे कमी होण्यासाठी फायदेशीर ठरु शकते.  नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यासही मासिक पाळीचा त्रास कमी होतो. 

महिन्याचे ते चार दिवस अनेकींना नकोसे होतात. पाळी सुरू होण्याच्या आधीपासून पोट, पाय आणि कंबरेत येणाऱ्या कळा आणि ते ४ दिवस होणारा त्रास नकोसा वाटतो. या सगळ्या त्रासात घरातले काम, ऑफीस, प्रवास या कशालाच सुट्टी घेऊन चालणार नसते. त्यामुळे ते चार दिवस येऊच नयेत असेही अनेकींना मनातून वाटते. याचे कारण म्हणजे अनेकींना मासिक पाळीच्या वेदना इतक्या जास्त असतात की धड उठताही येत नाही. मग कधी गरम पाण्याचा शेक घेणे तर कधी जास्तच त्रास होत असला तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पेनकीलर घेणे हे उपाय केले जातात. एकीकडे जास्त प्रमाणात होणारा रक्तस्त्राव, त्यामुळे आलेला थकवा आणि पोट आणि पाठीतून येणाऱ्या कळा असह्य होतात. हार्मोन्समध्ये होणारे बदल, मानसिक ताण यांमुळे पाळीच्या वेदना कमी जास्त होतात. इतकेच नाही तर वयानुसारही वेदनांचे स्वरुप बदलत जाते. काहीवेळा गर्भाशयाशी निगडित तक्रारी असतील तर त्याही वेदना कमी जास्त होण्यास कारणीभूत ठरतात. एकदा पाळीच्या कळा सुरू झाल्या की ४ दिवस झाल्याशिवाय त्या थांबायचे नाव घेत नाहीत. त्यामुळे आपला हा त्रास कमी व्हावा असं वाटत असेल तर हे उपाय नक्की ट्राय करुन पाहा...

(Image : Google)

१. योगा 

योगा हा अनेक समस्यांवरील एक उत्तम उपाय आहे. योगामुळे आपली ऊर्जा वाढण्यास मदत होते. इतकेच नाही तर नियमित योगा केल्याने स्नायूंची योग्य पद्धतीने हालचाल होते आणि पाळीचा काळ फारसा कठिण जात नाही. चंद्र नमस्कार, वर्जासन, सुप्तबद्ध कोनासन, बटरफ्लाय पोज यांसारखी आसने नियमित केल्यास पाळीत होणारा त्रास कमी होण्याची शक्यता असते. याचे मुख्य कारण म्हणजे कंबर आणि पोटाच्या आजुबाजूचे स्नायू लवचिक होतात आणि दुखणे कमी होते. 

२. आहार 

आपण नियमितपणे संतुलित आणि चांगला आहार घेत असू तर आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या कमी होतात. म्हणजेच सुकामेवा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, डाळी, कडधान्ये, फळे या सगळ्या गोष्टींचा आहारात योग्य प्रमाणात समावेश असेल तर पाळीमध्ये होणाऱ्या वेदना नियंत्रणात असतात. पण आपण सतत जंक फूड, मसालेदार पदार्थ, मैदा यांचे सेवन करत असू तर मात्र आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान वेदना जास्त होण्याची शक्यता असते. केळं, सी व्हिटॅमिन असलेले लिंबू, संत्री या गोष्टी मासिक पाळीच्या काही दिवस आधी जास्त प्रमाणात खायला हव्यात. तसेच मीठ, चॉकलेट, कॉफी या गोष्टींचे सेवन मासिक पाळीच्या काळात कमी करायला हवे. नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यासही मासिक पाळीचा त्रास कमी होतो. 

३. घरगुती उपाय

१ चमचा जीरे, १ चमचा ओवा, १ चमचा काळे मीठ, चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा बडिशोप पाण्यात घाला. हे पाणी दिवसातून दोन वेळा प्या. या सगळ्या गोष्टींचा अर्क पाण्यात उतरला तर ते पाणी पिण्यासाठी अतिशय चांगले असते. मासिक पाळीच्या आधी होणाऱ्या पाठदुखीपासून आराम मिळण्यास हा उपाय अतिशय चांगला आहे. 

(Image : Google)

४. शेक 

मासिक पाळीत पोट किंवा पाठ दुखते. त्यावेळी या ठिकाणचे स्नायू आकुंचन प्रसरण पावत असल्याने वेदना होतात. पण अशावेळी आपण स्नायूंना थोडा आराम दिला तर हे दुखणे कमी होते. अशावेळी गरम पाण्याची पिशवी, गरम लोखंडी तवा, पोट आणि पाठीवर गरम पाण्याचा शेक घेणे असे उपाय अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे पाळी येण्याच्या आधी आणि पाळीतही असा शेक घेणे दुखणे कमी होण्यासाठी फायदेशीर ठरु शकते.    

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्य