Join us   

नवरात्र स्पेशल आरोग्य उपासना : मेनोपॉजमध्ये शरीरात बदल होतात म्हणजे नेमकं काय? तज्ज्ञ सांगतात, त्रास अंगावर काढण्याचे दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 11:34 AM

Navratri Special Health Misconceptions about Menopause : ५० वर्षानंतर पाळी चालू राहिल्यास अतिशय नियमितपणे स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून घ्यायला हवी.

ठळक मुद्दे मेनोपॉज आहे म्हणून प्रत्येत दुखण्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार घेणे गरजेचेघरातील लोकांनी किंवा मित्रमंडळींनी दिलेले फुकटचे सल्ले आरोग्यासाठी घातक ठरु शकतात

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी    

आपल्या समाजात सध्या चाळीशीच्या वरच्या कोणत्याही आरोग्य समस्येचे खापर मेनोपॉज वर फोडण्याची फॅशनच आली आहे. समस्या अगदी कोणतीही असो..आपण त्याचे खापर मेनोपॉजवर फोडतो. मात्र असे करणे अतिशय चुकीचे आणि घातक आहे. खरंतर  स्त्रीचे मेनोपॉजचे वय हे साधारणपणे ४८-४९ आहे, कधी कधी ५०-५१ पर्यंतही पाळी चालू राहू शकते. पण ५० वर्षानंतर पाळी चालू राहिल्यास अतिशय नियमितपणे स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून घ्यायला हवी. साधारणपणे चाळिशीनंतर स्त्रियांना आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. यामागे आत्तापर्यंत शरीराकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष हा महत्त्वाचा भाग असतो. योग्य आहार आणि व्यायाम याचा कधीच विचार न केल्यामुळे वाढलेले वजन, गरोदरपणात आणि प्रसुतीनंतर रक्तवाढीच्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या नियमित न घेतल्यामुळे शरीरात आलेला कमकुवतपणा, विविध कारणांनी आलेले मानसिक नैराश्य या सगळ्या गोष्टी चाळिशीनंतर स्त्रीच्या अनारोग्याला कारणीभूत असतात (Navratri Special Health Misconceptions about Menopause).

(Image : Google)

मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या जननसंस्थेचे काम हळू हळू संथ होत जाते आणि सरतेशेवटी पूर्ण थांबते. हा बदल अतिशय सावकाश आणि स्थिर गतीने होतो. त्यामुळे याचे शरीरावर कोणतेही अतितीव्र परिणाम सहसा दिसत नाहीत. नॉर्मल मेनोपॉज मध्ये पाळी उशिरा उशिरा येत जाते आणि ब्लीडींग कमी कमी होत जाते. हा आणि हाच पॅटर्न मेनोपॉज मध्ये नॉर्मल समजला जातो. आपल्या समाजात दर १५ दिवसांनी पाळी येऊन प्रचंड रक्तस्त्राव होणाऱ्या स्त्रीला हा मेनोपॉजचा त्रास आहे..होणारच असं तिच्या आजूबाजूचे निकटवर्तीय  स्वघोषित वैद्यकीय तज्ज्ञ(!!) पटवून देतात आणि मग तीसुद्धा निमूटपणे हे दुखणं अंगावर काढत राहते.

(Image : Google)

मेनोपॉजमध्ये नेमकं काय होणं अपेक्षित आहे बघूया...

१) पाळी उशिरा उशिरा येऊ लागणे, तरीही रक्तस्राव नॉर्मलच असणे.

२) थोड्याफार प्रमाणात मूड्स बदलणे, कधीतरी निराश वाटणे.

३) 'hot flashes'म्हणजे अचानक शरीराच्या वरच्या भागाला खूप घाम येतो आणि खूप गरम वाटते. हा प्रकार पाळी पूर्णपणे थांबल्यावर १-२ वर्षात होणं अपेक्षित आहे.पण काही स्त्रियांना आधी जाणवू शकतो.

४) योनीमार्गामध्ये कोरडेपणा जाणवणे तसेच लैंगिक इच्छा कमी होणे.

५) योनीमार्गाच्या अतिकोरडेपणामुळे कधी कधी त्या भागात खाज सुटणे किंवा  वारंवार लघवीचा संसर्ग होणे.

६) शरीरातील हॉर्मोनचे प्रमाण कमी झाल्यामुळे कॅल्शियमची कमतरता जाणवायला लागते आणि स्नायू आणि हाडं किंवा सांधेदुखीची सुरुवात होऊ शकते.

७) काही स्त्रियांना झोप न येणे, केस गळणे, डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा अशा समस्या येऊ शकतात.

(उद्या बोलू दुसऱ्या एका गैरसमजाविषयी)

(लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्य