Join us   

World Ostioporasis Day : सांधे दुखतात, हाडं ठिसूळ होतात, ते कशामुळे? मेनोपॉज- गर्भाशय काढण्याशी संबंध, तज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 1:36 PM

दैनंदिन काही गोष्टींची योग्य ती काळजी घेतल्यास वय झाल्यावर समस्या उद्भवण्यापासून तुम्ही स्वत:ला दूर ठेऊ शकता. पण वेळीच लक्ष न दिल्यास मात्र काही दुखणी मागे लागल्याशिवाय राहत नाहीत....

ठळक मुद्दे हाडांच्या खनिजतेमध्ये आणि ताकदीत घट झाल्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होतोइतर देशांच्या तुलनेत भारतीयांमधे ऑस्टिओपोरोसिसची सुरुवात १० ते २० वर्षे अलिकडे होते

ऑस्टियोपोरोसिस हा हाडांचा विकार असून त्यात  हाडे ठिसूळ होतात. म्हणजेच हाडांची घनता कमी झाल्याने हा त्रास उद्भवतो. आयुष्यभर ज्या हाडांच्या जोरावर आपले शरीर सगळी कामे करत असते ती हाडेही थकतात, झिजतात आणि त्यामुळे ही समस्या निर्माण होते, हाडांच्या खनिजतेमध्ये आणि ताकदीत घट झाल्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होतो. वय झालेल्या व्यक्तींमध्ये ही समस्या दिसून येते. सामान्यत: मध्यम वयापासूनच हा विकार वाढू लागतो. या आजाराची कोणतीही लक्षणे नसून वय झाल्यानंतर पडले, काही अपघात झाल्यास हाडे तुटण्याची शक्यता जास्त असते. हाडांच्या कमकुवतपणामुळे ताणतणाव होण्याची शक्यता जास्त असते. भारतामधे हे प्रमाण पुरुषांमधे १३ टक्के व स्त्रियांमधे ३० टक्के दिसून येते, असे एका पाहणीमधे आढळून आले आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतीयांमधे ऑस्टिओपोरोसिसची सुरुवात १० ते २० वर्षे अलिकडे होते. परदेशामधे वयाच्या सत्तरीनंतर, तर भारतीयांमधे वयाच्या पन्नाशीनंतर ऑस्टिओपोरोसिस बघायला मिळतो. याबाबत प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत वाघ सांगतात, महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिस होण्याची सामान्यपणे तीन महत्वाची कारणे आहेत. 

१. सेनाईल ओस्टीओपोरोसिस - वाढत्या वयामुळे महिलांमध्ये ही समस्या निर्माण होते. हाडांची झीज झाल्यामुळे हाडे ठिसूळ होतात. अशावेळी डॉक्टर हाडांची घनता तपासली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार महिलांमध्ये वयाच्या साठीनंतर हाडांची घनता तपासून पाहणे आवश्यक आहे. हाडे ठिसूळ होणे हे नैसर्गिक असले तरी त्यासाठी वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास ही समस्या पुढे ढकलणे शक्य असते. 

२. पोस्ट मेनोपॉज ओस्टीओपोरोसिस - मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये हार्मोन्सचे असंख्य बदल होतात. त्यामुळे पाळी बंद होणे, मानसिक समस्या यांबरोबरच हाडांची घनता कमी होण्याची किंवा हाडे ठिसूळ होण्याची समस्याही निर्माण होते. अशावेळी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे आवश्यक ठरते. 

३. वजन कमी असणे - भारतात अनेक महिला या वयाच्या तुलनेत किंवा उंचीच्या तुलनेत वजनाने कमी असतात. त्यामुळे त्यांची हाडे कमकुवत असण्याची शक्यता असते. वजन कमी असून जास्त शारीरिक आणि मानसिक ताण असेल तर हाडे ठिसूळ होण्यास सुरुवात होते आणि ही समस्या कालांतराने वाढत जाते. त्यामुळे आपले वजन आणि आहार यांकडे महिलांनी वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. 

४. गर्भाशय काढून टाकणे - महिलांना काही कारणांमुळे गर्भाशय काढून टाकावा लागतो. अशावेळी हाडे ठिसूळ होण्याची शक्यता असते. तसेच पाळी लवकर बंद झाल्यासही ओस्टीओपोरोसिससारखी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे याबाबतची योग्य ती माहिती वेळीच घ्यायला हवी. 

( Image : Google)

डॉ. श्रीकांत वाघ सांगतात...

ओस्टीओपोरोसिस होऊ नये म्हणून नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. स्नायूंची पुरेशी हालचाल झाली की हाडे चांगली राहण्यास मदत होते. त्यामुळेचयापचय चांगला होऊन हाडांना बळकटी मिळते. तसेच योग्य आहार हाही ओस्टीओपोरोसिस होऊ नये यासाठी उत्तम उपाय आहे. यासाठी आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करायला हवा. तसेच गरज भासल्यास शाकाहारी लोकांनी कॅल्शियम सप्लिमेंटस घेणे गरजेचे आहे. महिला घराबाहेर जाताना एकावर एक कपडे घालतात. त्यावर सनकोट, स्कार्फ यांमुळे शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही आणि कॅल्शियम हाडांमध्ये शोषला जात नाही. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात काही काळ ऊन्हाशी शरीराचा संपर्क आल्यास शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता भासत नाही. हे शक्य नसल्यास व्हिटॅमिन डी साठीही सप्लिमेंटस घेणे आवश्यक आहे. 

ओस्टीओपोरोसिस म्हटल्यावर घाबरुन जायचे कारण नाही. यामध्ये हाड फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढत असली तरी पुरेशी काळजी घेतल्यास तुम्ही त्यापासून स्वत:ची सुटका करुन घेऊ शकता. भारतात कुटुंबातील महिलेला जर फ्रॅक्चर झाले तर संपूर्ण कुटुंब कोलमडते. कारण महिला हीच घरातील सर्व गोष्टींमध्ये प्रामुख्याने लक्ष देत असल्याने तिचे आरोग्य जपणे सर्वांची जबाबदारी आहे. अनेकदा महिला कुटुंबातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांची काळजी घेतात. त्यांना व्यवस्थित खायला प्यायला मिळेल हे पाहतात पण या सगळ्यात त्यांचे स्वत:कडे मात्र दुर्लक्ष होते. 

( Image : Google)

भारतात वयाच्या ९० वर्षापर्यंत ३० टक्के स्त्रियांमधे, १७ टक्के पुरुषांमधे ऑस्टिओपोरोसिसमुळे खुब्याचे फ्रॅक्चर्स झालेले आढळून आले आहे. स्त्रियांमधे स्तनांचा, गर्भाशयाचा तसेच बीजकोषाचा कर्करोग होण्याचा जेवढा धोका असतो, तेवढाच धोका ऑस्टिओपोरोसिसमुळे खुब्याचे फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो. दरवर्षी आपल्या शरीरामधे जवळपास १० टक्के हाडांमधील पेशी नव्याने तयार होतात. जुन्या अथवा जास्त वापर झालेल्या हाडांमधील पेशी काढल्या जाऊन त्या ठिकाणी नवीन पेशी तयार होतात. ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असते. ऑस्टिओपोरोसिसमधे हाडे ठिसूळ होण्याची प्रक्रिया जास्त होते; कारण हाडांमधील नवीन पेशी तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली असते. ऑस्टिओपोरोसिसचे प्रमाण जास्त असणाऱ्या पेशंटसाठी नाकातून घ्यायचा स्प्रे व काही इंजेक्शनसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिले जाऊ शकतात. या समस्येवर औषधोपचार उपलब्ध आहेत, पण त्याबाबत काही प्रमाणात साशंकता आहे, त्यामुळे औषधोपचारापेक्षा दैनंदिन काही गोष्टी केल्यास समस्या उद्भवणारच नाही.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स