शीतल मोगल (आहारतज्ज्ञ) आता उन्हाळा जाणवायला लागला. जीव पाणी पाणी करतो. उन्हाने होणारे त्रासही छळू लागतात. डिहायड्रेशन, हिट स्ट्रोक, ॲसिडिटी, ऊन लागून डोके दुखणे, चक्कर येणे, घामोळ्या येणे, पाणी कमी प्यायल्याने युरीन इन्फेक्शन, किडनी स्टोन, डोळ्यांची जळजळ, दुपारनंतर अतिशय थकवा येणे, अतिशय थंड खाल्ल्याने होणारे सर्दी खोकला, ताप, सन बर्न असे अनेक लहानमोठे आजार होतात. हे सारे त्रास आपल्याला योग्य आहाराने टाळता येऊ शकतात.
काय करायला हवं? १. सकाळी उठल्याबरोबर भरपूर पाणी प्यावे कारण रात्रभर घाम घाम यामुळे शरीरातील पाणी कमी होते. २. रात्री सब्जा भिजवून तो पाण्यात घालून प्यायल्याने शरीराला दिवसभर थंडावा मिळतो. त्याचबरोबर वजन कमी होण्यासही मदत होते.
३. खरबूज, टरबूज, संत्री, मोसंबी, द्राक्षे, ही फळं भरपूर खावी. ४. गुळाची लापशी, ओट्सचे डोसे, उपमा, असा नाश्ता, फूड सलाड तसेच चिकू केळीची स्मुदी असा नाष्टा करा. ५. दुपारच्या जेवणात काकडी कोशिंबीर पुदिना चटणी, डाळिंबाची कोशिंबीर, भरपूर सॅलेड खा. सोबत पालेभाजी, पडवळ, वरणभात, भाकरी-फुलके असे हलके जेवण घ्या. ६. चहा कॉफी टाळा. त्याऐवजी लिंबू सरबत, पुदिना व सब्जा घालून सरबत, कैरीचे पन्हे, सोलकढी, कोकम सरबत, नारळ पाणी हे पर्याय उत्तम.
७. रात्रीच्या जेवणात साधं वरण भात-आमटी, आमसूल घालून केलेली भात, दलिया, पुदिना चटणी, डाळीचे डोसे, जास्त डाळ घालून केलेली मऊ व पातळ खिचडी असा आहार घ्या. जास्त भूक असल्यास ज्वारी तांदूळ किंवा नागलीची भाकरी जवसाची चटणी, कैरीचं लोणचं असा आहार घ्या. ८. फ्रीजमधलं पाणी पिऊ नका. मुलांना आईस्क्रीम ऐवजी दही ताक पन्हे लस्सी द्या. ९. सकाळी थोडे चालणे, सूर्यनमस्कार तरी अवश्य करा. १०. आहार-विहार सांभाळला तर उन्हाळ्यातली आजारपणं लांब राहतात.