Join us   

शरीराच्या वेगवेगळ्या भागावर फोड का येतात? ही कसली लक्षणं, कोणता आजार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 1:35 PM

आपल्या चेहऱ्याच्या आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर येणारे पिंपल्स आपल्याला आरोग्याविषयी काही सूचना करत असतात. म्हणूनच तर जाणून घ्या कोणत्या भागातले पिंपल्स काय सांगत आहेत. 

ठळक मुद्दे आपल्या शरीरात जर काही बिघाड होत असेल, तर त्याचे प्रतिबिंब फोडं, पिंपल्सच्या माध्यमातून आपल्या शरीरावर उमटते.

आपण जर बारकाईने लक्षात घेतले तर आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावर सुद्धा नेहमी वेगवेगळ्या भागात फोडं येत असतात. काही फोडं कपाळावर, काही गालावर तर कधी काही फोडं हनुवटीवर येत असतात. काही जणींच्या छातीवर खूप फोडं असतात तर काही जणींची पाठ आणि मान कायम फोडांनी भरलेली असते. अशी शरीराच्या वेगवेगळ्या भागात फोडं येण्याची कारणं वेगवेगळी असतात. आपल्या शरीरात जर काही बिघाड होत असेल, तर त्याचे प्रतिबिंब फोडं, पिंपल्सच्या माध्यमातून आपल्या शरीरावर उमटते. म्हणूनच कोणत्या भागावर येणारे फोडं काय सांगत आहेत, हे जाणून घेणं गरजेचं आहे. 

 

चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांवर येणारे पिंपल्स काय सांगतात १. कपाळ-  पचन संस्थेत काही बिघाड झाला असेल, अपचनाचा त्रास असेल तर कपाळावर फोडं येतात. कधी पाणी कमी पिणं झालं असेल आणि मुत्राशयासंबंधी काही तक्रारी असतील तर कपाळावर फोडं येतात. तसेच यकृत आणि पित्ताशयाच्या तक्रारीही कपाळावरचे फोड दर्शवतात. त्याचप्रमाणे केसांना लावलेले तेल, केसांची अस्वच्छता आणि डोक्यातील कोंडा देखील कपाळावरच्या फोडांचे कारण आहे.

२. भुवयी आणि नाकाचा भाग या भागात येणारा फोड तुमच्या रक्तदाबाविषयी सूचना देताे. व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाण कमी होणे, ओमेगा ३ फॅटी ॲसिडयुक्त आहाराची कमतरता हे देखील या फोडांमधून सूचित होते. 

 

३. गाल श्वसन क्रियेत काही अडथळा येत असेल, धुर आणि धुळीचा संपर्क आला असेल तर गालावर फोड येतात. गालावर फोड आल्यास दिर्घ श्वसन करावे. 

४.हनुवटी हनुवटी किंवा त्याच्या आसपासच्या भागात येणारे फोड हार्मोन्समध्ये असणारे असंतूलन आणि पचनशक्तीतील बिघाड दाखवितात. यासाठी तेलकट आणि खूप जास्त फॅट्स असणारे पदार्थ खाणे टाळावे. मासिक पाळी, थकवा, अशक्तपणा, अस्वस्थता यामुळे देखील हनुवटीवर फोडं येऊ शकतात. 

 

शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर येणारे पिंपल्स काय सांगतात १. छातीवर येणारे फोड छातीवर येणारे फोड लालसर रंगाचे आणि जरा दुखणारे असतात. या फोडांचा आकारही मोठा असतो. छातीवर जर फोड येत असतील, तर त्यासाठी अस्वच्छता हे एक मोठे कारण असू शकते. ज्या व्यक्तींना खूप घाम येतो, त्या व्यक्तींच्या छातीवर, मानेवर आणि गळ्यावर फोड दिसून येतात. त्यामुळे कोमट पाण्याने साबण लावून स्वच्छ आंघोळ करणे, शक्य झाल्यास सायंकाळी कामावरुन घरी परतल्यावर पुन्हा एकदा आंघोळ करणे, हा यासाठीचा योग्य उपाय आहे. 

  २. पाठीवर येणारे फोड मासिक पाळीचे चक्र बिघडले असेल, मसालेदार आणि तेलकट पदार्थ जास्त खाण्यात आले असतील, तर पाठीवर फोड येण्याचे प्रमाण वाढते. अपुरी झोप, ताणतणाव, कामाची दगदग या कारणांमुळे देखील पाठीवर फोड येऊ शकतात. त्यामुळे जर पाठीवर फोडं येत असतील तर सगळ्यात आधी तुमची मासिक पाळी आणि त्या संदर्भातल्या तक्रारी तपासून पहा, अन्यथा बिघडलेले रुटीन आणि आहार पुन्हा एकदा व्यवस्थित करा. 

३. नितंबावर येणारे फोड पार्श्वभागावर फोड येण्याची समस्या देखील खूपच सामान्य आहे. आतले कपडे खूप जास्त घट्ट असतील, अर्धवट ओले कपडे घातले गेले असतील, तर अशी समस्या जाणवू शकते. रात्रीचे जागरण आणि मानसिक दडपण यामुळेही या भागात फोड येऊ शकतात.  

 

टॅग्स : हेल्थ टिप्सत्वचेची काळजीब्यूटी टिप्स