माधुरी पेठकर इंग्लंडच्या स्वर्गीय राणीची नातसून आणि आता असलेल्या राजाची सून प्रिन्सेस केट मिडलटनची सतत या ना त्या कारणाने माध्यमात चर्चा सुरु असते. किंग चार्ल्स यांची सून केट ती करत असलेल्या सामाजिक कामासाठी म्हणून विशेष लोकप्रिय आहे. लहान मुलांसाठी काम करणाऱ्या राॅयल फाउंडेशन सेंटर या संस्थेसोबत केट काम करते. सदैव प्रसिध्दीच्या झोतात राहणारी केट मध्यंतरी कुठेच दिसत नव्हती. ती आजारी आहे एवढंच फक्त लोकांना माहिती होतं. तिला काय बरं झालं असावं? याच्याबाबतीत लोक काहीबाही अंदाज लावतच होते की मदर्स डेला १० मार्च रोजी केटचा आपल्या तीन मुलांसोबतचा एक फोटो प्रसिध्द झाला. पण या फोटोविषयी वेगळ्याच चर्चा केल्या गेल्या. केटच्या हातात वेडिंग रिंगच नाही, हा मूळ फोटोच नाही, वगैरे वगैरे वाद सुरु होते. शेवटी केटने आपण हा फोटो एडिट केला असं माध्यमातून सांगितल्यावर चर्चा शांत झाली. तोच पुन्हा केट मिडलटनबद्दल पुन्हा चर्चा सुरु झाली. या चर्चेचे कारण म्हणजे तिचं आजारपण आणि त्यावर ती घेत असलेले उपचार. ४२ वर्षांच्या केटने नुकताच एक व्हिडिओ प्रदर्शित केला. या व्हिडीओमध्ये तिने एक संदेश चित्रीत केला आहे. या व्हिडीओद्वारे केटने आपल्या आजाराबद्दलची माहिती लोकांना दिली आहे.
केटला नेमकं काय झालं?
केटवर जानेवारी महिन्यात ओटीपोटावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया सामान्य असावी असंच सर्वांना वाटत होतं. पण शस्त्रक्रियेनंतर झालेल्या तपासण्यांमध्ये केटला कॅन्सरचं निदान झालं. ते ऐकल्यानंतर केटला आणि प्रिन्स विल्यमला मोठा धक्का बसला. या दोघांनी या आजाराची बातमी फार पसरणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. एकतर राजघराणं हे तर कारण होतंच शिवाय केट आणि विल्यम यांंची प्रिन्स जाॅर्ज, प्रिन्सेस चार्लोट आणि प्रिंस लुईस ही मुलं अजून खूपच लहान आहेत. आईला काय झालंय हे समजण्याचं त्यांचं वय नाही. त्यामुळे आपल्या आजारपणाची बाहेर उलट सुलट चर्चा झाल्यास त्याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होवू शकतो. त्यामुळे मुलांना काय, कसं आणि कधी सांगायचं याचा सखोल विचार दोघांनीही केला. शेवटी केटने मुलांना समजेल अशा भाषेत आपल्याला काय झालंय हे तर सांगितलंच शिवाय मी यातून पूर्ण बरी होणार आहे असा विश्वासही मुलांना दिला. आपल्या मुलांना अशा प्रकारे आश्वस्त केल्यानंतर केटने आपल्याला कॅन्सर झाल्याची बातमी जगजाहीर केली.
जानेवारीमध्ये केटच्या ओटीपोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया केल्यानंतर १३ दिवसांचा हाॅस्पिटलचा मुक्काम संपवून केट २९ जानेवारीला घरी आली. आपल्याला कॅन्सर झालाय हे सत्य पचवून, शस्त्रक्रियेनंतर पुढील उपचारांसाठी शरीर आणि मनाला उभारी मिळण्यासाठी केटला तीन आठवडे लागले आणि फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यांपासून आपण 'प्रिव्हेण्टिव्ह कीमोथेरेपीच्या' उपचार प्रक्रियेत प्राथमिक टप्प्यावर आहोत असं तिने जाहीर केलं. पण आपल्याला नेमका कोणता कॅन्सर झाला हे मात्र केटने सांगितलं नाही.
प्रिव्हेण्टिव्ह कीमोथेरेपी म्हणजे काय? कॅन्सर झाल्यानंतर रुग्णावर सर्वसामान्यपणे कीमोथेरेपीचे उपचार केले जातात. पण प्रिव्हेण्टिव्ह कीमोथेरेपी ही संज्ञा जी केटने आपल्या उपचाराची माहिती सांगताना वापरली ती मात्र अजूनही वैद्यकीय भाषेत वापरली जात नाही. याला वैद्यकीय भाषेत ॲडज्युवेण्ट थेरेपी (सहाय्यक उपचारपध्दती) असं म्हणतात. या थेरेपीत विशिष्ट पध्दतीची औषधं आणि उपचार दिले जातात. या प्रकारच्या थेरेपीद्वारे शस्त्रक्रिया करताना डाॅक्टर उपचार करुन कॅन्सरची एक जरी पेशी शरीरात राहिलेली असेल ती नष्ट करतात. पुढे शरीरात कॅन्सर पसरवू शकेल अशी पेशी या प्रिव्हेण्टिव्ह कीमोथेरेपीद्वारे नष्ट केली जाते. मूळ कीमोथेरेपीच्या तुलनेत ही उपचारपध्दती लहान असते. भविष्यात शरीरात विकसित होवू शकणाऱ्या कॅन्सर आपत्तीवर उपचार म्हणून ही थेरेपी केली जाते. यात किमान तीन महिने शरीरात विशिष्ट औषधं सोडली जातात.