Join us   

वर्क फ्रॉम होममुळे वजन वाढतंय? 6 सोप्या टिप्स, घरुन काम करतानाही राहाल फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 5:38 PM

डाएट आणि व्यायाम याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. काही सोप्या गोष्टी केल्यास तब्येत चांगली राहायला मदत होईल

ठळक मुद्दे वर्क फ्रॉम होम असेल तरी तुम्ही राहू शकता फिट अँड फाईन व्यायाम आणि डाएटच्या छोट्या छोट्या सोप्या टिप्स करतील वर्क फ्रॉम होम सोपे

नवीन वर्षात वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकांनी वेगवेगळे संकल्प केले असतील. यामध्ये काहींनी व्यायाम सुरू करण्यासाठी जीमला जाण्याचे तर कोणी किमान जवळच्या गार्डनमध्ये चालायला जाण्याचे ठरवले असेल. पण कोवीडच्या तिसऱ्या लाटेमुळे हे संकल्प एव्हाना धुळीला मिळाले असतील. आता कुठे सगळे सुरळीत सुरू होत होते, तितक्यात पुन्हा एकदा या कोविड नावाच्या राक्षसाने आपले डोके वर काढले आहे. म्हणता म्हणता देशात आणि राज्यातही कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने बहुतांश कंपन्यांनी पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. त्यामुळे थोडेफार चालणे व्हायचे तेही आता बंद झाले आहे. तसेच थंडीच्या दिवसांत असणारी गार हवा, त्यामुळे सतत लागणारी भूक आणि त्यात घरात असल्याने सतत काहीतरी खाण्याची होणारी इच्छा यांमुळे भुकेपेक्षा थोडे जास्तच खाल्ले जाते. त्यामुळे २०२२ मध्ये तुम्ही बारीक व्हायचे ठरवले असेल आणि तसे न होता तुम्ही दिवसेंदिवस आणखी जाड होत असाल तर घरुन काम करतानाही तुम्ही फिट राहावे यासाठी काही टिप्स पाहूयात. 

(Image : Google)

डाएट टिप्स 

१. प्रोसेस्ड फूड, खूप साखर असलेले पदार्थ, रिफाईंज केलेली धान्ये, बियांचे तेल यासारख्या गोष्टी शक्यतो टाळायला हव्यात. 

२. भाज्या, फळे, कडधान्ये, अंडी, तूप यांसारख्या पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. 

३. मधल्या वेळेत भूक लागेल तेव्हा कुरकुरीत, तळकट काहीतरी न खाता दाणे, चणे, सुकामेवा, फळे यांचा आहारात समावेश करावा. 

४. घरचे अन्न केव्हाही चांगले त्यामुळे शक्यतो घरचेच जेवा. याशिवाय आपण काय जेवतो याबरोबरच कोणत्या वेळेला जेवतो हेही तितकेच महत्त्वाचे असते. सूर्याच्या घड्याळाबरोबर आपले खाण्यापिण्याचे घड्याळ ठरवून घ्या, म्हणजे योग्य वेळेला खाल्लेले अन्न तुम्हाला चांगले पचेल. 

५. दिवसाची सुरुवात चांगल्या स्थानिक ब्रेकफास्टच्या पदार्थाने करा. ब्रेकफास्ट प्रोटीनरिच असेल याची काळजी घ्या. तसेच त्याचे प्रमाण योग्य ठेवा, जेणेकरुन जेवणाच्या वेळेपर्यंत तुम्हाला व्यवस्थित भूक लागेल. 

६. सकाळी ९ च्या दरम्यान नाश्ता, दुपारी १.३० च्या दरम्यान जेवण, ४ वाजता मधला स्नॅक्स आणि रात्री ८ च्या आधी जेवण अशा वेळा ठेवल्यास याचा तुमचे आरोग्य चांगले राहण्यास निश्चितच फायदा होईल. 

व्यायाम टिप्स 

१. तुम्ही इमारतीत राहत असाल तर कोणत्याही कामासाठी खाली गेलात तर लिफ्टचा वापर करणे टाळा आणि जिन्यांचा वापर करा. त्यामुळे तुमचा चांगला व्यायाम होण्यास मदत होईल. 

२. तुम्ही ऑफीसच्या कामासाठी किंवा नातेवाईकांशी, मित्रमंडळींशी फोनवर बोलत असाल तेव्हा घरातल्या घरात चालत किंवा घराच्या बाहेरच्या भागात चालत फोनवर बोला. म्हणजे फोनवर बोलणे आणि शरीराची हालचाल असे दोन्ही होईल.

३. तुमच्या रिलॅक्सेशन अॅक्टीव्हीटींमध्ये टीव्ही पाहणे, सोशल मीडियावर वेळ घालवणे यांपेक्षा चालायला जाणे, दोरीच्या उड्या मारणे, योगा करणे, सूर्यनमस्कार करणे अशाप्रकारचे व्यायामप्रकार असू द्या. 

(Image : Google)

४. काम करताना कित्येक तासांसाठी एकाच जागेवर बसून राहावे लागणार नाही याची काळजी घ्या. त्यादृष्टीने कामाच्या मधे योग्य तितके ब्रेक घेण्याचा प्रयत्न करा.  म्हणजे सततची बैठी अवस्था मोडून शरीराची हालचाल होईल. 

५. आठवड्याचे ५ ते ६ दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करा, जेणेकरुन तुम्हाला तोच तो व्यायाम करुन कंटाळा येणार नाही. यामध्ये चालणे, स्ट्रेचिंग, योगा, अॅरोबिक्स, झुंबा, वेट ट्रेनिंग, सायकलिंग अशा गोष्टींचा समावेश असेल. त्यादृष्टीने तुमचे आठवड्याचे टाइमटेबल तयार करा. 

६. घरी, आजुबाजूच्या कोणाकडे किंवा सोसायटीच्या जीममध्ये ट्रेडमिल किंवा व्यायामाची कोणती साधने असल्यास त्यांचा वापर करुन व्यायाम करा. त्याचा तुमच्या तब्येतीसाठी चांगला फायदा होईल.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकोरोना वायरस बातम्यालाइफस्टाइल