Join us   

Vaginal Health : 'नाजूक भागाची' स्वच्छता कशी राखाल? 5 गोष्टी, योनीमार्गाची योग्य स्वछता, टाळा इन्फेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 2:06 PM

Vaginal Health : फारशा न बोलल्या जाणाऱ्या किंवा दबक्या आवाजात बोलल्या जाणाऱ्या विषयावर आपण प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिता चव्हाण यांच्याकडून जाणून घेऊया...

ठळक मुद्दे याठिकाणचे केस हे आपल्या सुरक्षेसाठी असतात, त्यामुळे ते काढणे योग्य नाही.व्हजायनामध्ये नासर्गिकरित्या हा भाग स्वच्छ ठेवणारे चांगले बॅक्टेरीया कार्यरत असतात. त्यामुळे आपण सतत व्हजायना धुतली तर ते बॅक्टेरीया नाहीसे होतात

आपण नियमितपणे आंघोळ करतो, केस धुतो, नखे कापतो, कान साफ करतो. आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण शरीराच्या इतर भागांची ज्याप्रमाणे स्वच्छता करतो, त्याचप्रमाणे शरीरातील नाजूक भाग असलेल्या व्हजायनाची स्वच्छता राखणेही तितकेच महत्त्वाचे असते. व्हजायना (Vaginal Health) हा काही चर्चेचा विषय़ आहे का असे अनेकांना वाटू शकेल. पण शरीरातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या अवयवाची स्वच्छता उत्तम आरोग्यासाठी गरजेची असते. याबाबत योग्य ती काळजी वेळीच न घेतल्यास इन्फेक्शन्स होऊ शकतात आणि त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. तेव्हा व्हजायनल स्वच्छता म्हणजे काय? ती कशी करायची, करायची की नाही, याठिकाणचे केस कसे काढायचे अशा फारशा न बोलल्या जाणाऱ्या किंवा दबक्या आवाजात बोलल्या जाणाऱ्या विषयावर आपण प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिता चव्हाण यांच्याकडून जाणून घेऊया...

(Image : Google)

१. अंतर्वस्त्र कोणत्या प्रकारची असावीत? 

अंतर्वस्त्राचे कापड कसे आहे यावरही व्हजायनाची स्वच्छता अवलंबून असते. अनेकदा कमी किमतीची, सिल्कच्या कापडांच्या किंवा फॅशनेबल पॅन्टी वापरल्या जातात. मात्र हे कापड कॉटनचे नसेल तर या भागाला पुरेशी हवा मिळत नाही आणि हवा न मिळाल्याने घाम येणे, कापड टोचणे या गोष्टींमुळे याठिकाणी इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे आपल्या पॅन्टीचे कापड पूर्णपणे कॉटनचे असेल याची खात्री करावी. पॅन्टी नियमितपणे स्वच्छ धुतलेल्याच घालाव्यात. 

२. व्हाईट डिस्चार्जबाबत...

अनेक महिलांना पाळीच्या आधी किंवा एरवीही व्हाईट डिस्चार्ज होतो. अशाप्रकारे डिस्चार्ज होत असेल तर पॅन्टी बदलायला हवी. इतकेच नाही तर आपल्या डिचार्जचा रंग त्याचा वास याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. या डिस्चार्जला जास्त वास येत असले तर त्याठिकाणी पावडर टाकून किंवा पर्फ्युम मारुन हा वास घालविण्याचा प्रयत्न काही जणी करतात. पण असे करणे योग्य नसून डिस्चार्जला वास आल्यास त्यामागचे कारण शोधायला हवे. इतकेच नाही तर डिस्चार्जचा रंग पिवळा, हिरवा किंवा लालसर, काळपट असेल तरी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 

३. व्हजायना सतत धुवू नका, कारण..

व्हजायनामध्ये नासर्गिकरित्या हा भाग स्वच्छ ठेवणारे चांगले बॅक्टेरीया कार्यरत असतात. त्यामुळे आपण सतत व्हजायना धुतली तर ते बॅक्टेरीया नाहीसे होतात आणि त्यामुळे व्हजायना साफ न राहता त्याठिकाणी इन्फेक्शन होऊ शकतात. त्यामुळे साध्या पाण्याने व्हजायना दिवसातून एखादवेळी धुणे ठिक आहे, पण सतत शॉवरने, कपड्याने किंवा आणखी कोणत्या गोष्टीने व्हजायना साफ करण्याची आवश्यकता नाही.

४. व्हजायना साफ करताना 

त्वचा थोडी काळसर आहे किंवा त्याठिकाणी मांडीला डाग आहेत म्हणून काही मुली किंवा महिला वेगवेगळ्या स्क्रबने हा भाग घासतात. पण असे करणे येथील त्वचेसाठी अजिबात फायद्याचे नसते. त्यामुळे या त्वचेला जास्त त्रास होऊ शकतो. अनेकदा आपण बाथरुम झाल्यावर हा भाग धुतो आणि पुसतो. त्यावेळी वरुन खाली धुवायला हवे. कारण संडासच्या भागाला आधी पुसले आणि नंतर आपण व्हजायना स्वच्छ केली तर त्याठिकाणचे विषाणू आपल्या व्हजायनापाशी लागू शकतात आणि त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. 

५. व्हजायनल शेविंग 

प्रत्यक्षात याठिकाणचे केस हे आपल्या सुरक्षेसाठी असतात, त्यामुळे ते काढणे योग्य नाही. पण तुम्हाला काढायचेच असतील तर वरच्या वर ट्रिम करायला हवे. पार्लरमध्ये जाऊन याठिकाणचे व्हॅक्सिंग करणे कितपत आरोग्यदायी आहे हे आपण सांगू शकत नाही. तसेच रेजरला असणाऱ्या ब्लेडमुळे याठिकाणी इजा होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे रेजर वापरणेही टाळावे. रेजरने पूर्ण क्लिन केल्यास नंतर हे केस येतांना टोकेरी येतात आणि आपल्याला सतत टोचल्यासारखे होते. किंवा शरीरसंबंधांच्या वेळी आपल्या जोडीदारालाही त्याचा त्रास होऊ शकतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सयोनी