डॉ. प्रिया प्रभू- देशपांडे, (साथरोग तज्ज्ञ)
कोरोना पुन्हा आल्याची चर्चा आहे. मात्र आत्ताचा कोविड विषाणू JN.1 आहे जो ऑगस्ट २०२३ मध्ये सापडला आणि तेव्हापासूनच तो भारतात आहे. हा ओमेक्रॉनचा प्रकार आहे. JN.1 हा ओमायक्रोनचा उपप्रकार (sub varient) आता VOI (Varient of Interest) या पदावर विराजमान झालाय . म्हणजे हा लक्ष ठेवण्यासारखा विशेष प्रकार आहे असे जागतिक आरोग्य संस्थेलाही वाटते. सध्या करोनाचे हजारो उपप्रकार निर्माण झालेले आहेत. JN.1 बद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. त्याविषयी आपण अधिक माहिती पाहू..
१. नवा JN.1 करोना विषाणू खरा आहे का?
होय. अमेरिकेमध्ये सप्टेंबर २०२३ मध्ये सापडला होता तेव्हा ०.१% रुग्ण याचे होते. डिसेंबर ८ ला १५-२९% रुग्ण या उप प्रकारचे आहेत. म्हणजे हा वेगाने वाढणारा उपप्रकार आहे. नवे उपप्रकार सतत सापडत असतात. पण त्याच्या बातम्या होत नाहीत. कोणता नवा उपप्रकार वेगाने वाढेल याचा अंदाज करणे कठीण आहे. कारण म्युटेशन कधीही घडू शकतात.
२. रुग्णसंख्या का वाढत आहे?
महत्वाची ३ कारणे असू शकतात. वातावरण - थंड व कोरडे वातावरण असताना श्वसनाचे आजार आणि मुख्यतः कोरोना संसर्ग वाढतो ही दरवर्षी घडणारी घटना आहे. याची विविध कारणे आहेत. सध्याचे वातावरण रुग्णसंख्या वाढीला पोषक आहे .
जंतू - कोरोनाचा नवा उपप्रकार संसर्ग घडवण्यासाठी अधिक सक्षम आहे. आपल्या शरीरातील इम्युनिटी पासून बचाव करण्याची क्षमता याला मिळालेली आहे. (Immune escape) - शरीराला इम्युनिटी नव्याने निर्माण करावी लागणार आहे. माणूस- संसर्ग, विशेषतः ओमायक्रोन संसर्ग - दणकट इम्युनिटी निर्माण करू शकत नव्हते हे आपण वाचले आहेच. आणि लसीकरणाची इम्युनिटी संसर्ग टाळण्याएवढी सक्षम राहिली नाहीये . बऱ्याच जणांनी अकारण भीतीपोटी बूस्टर (precaution) डोस घेणे टाळले होते. त्यामुळे इम्युनिटीची भिंत आता पुरेशी घट्ट नाही .
स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे महत्वाचे..
१. हा संसर्ग धोकादायक आहे का?
याची लक्षणे डेल्टापेक्षा सौम्य आहेत. म्हणजे सर्दी, खोकला, ताप, जुलाब इ. अशी विविध लक्षणे दिसू शकतात. सध्या एखादे आजारपण असेल तर कोविडसारखी काळजी घेणे याने नुकसान होणार नाही. लक्षणे असतील तर फक्त व्हायरल सर्दी समजून दुर्लक्ष न करता, शक्यतो तपासणी करून घरी आयसोलेट होऊन पुढील प्रसार टाळणे महत्वाचे आहे. जोखमीच्या लोकांपासून अंतर राखा . २. संसर्ग कसा टाळायचा? आता आपण याबाबत नक्कीच तज्ज्ञ झालोय. मास्क आपला मित्र आहे हे विसरायचे नाही, मास्क सुरक्षित असतो. सहसा N95 वापरणे सर्वाधिक सुरक्षा देईल. लोकांसोबत असताना मास्क वापरणे महत्वाचे. Closed, Crowded आणि Congested अशा जागी जाऊ नका. हातांची स्वच्छता आणि हात चेहऱ्याजवळ न नेणे (हे नकळत घडते) महत्वाचे आहे. सर्वाधिक जबाबदारी ज्यांना सर्दी खोकला अशी लक्षणे असतील त्या लहान थोर सर्वांची आहे. आजारी असताना इतरांना सुरक्षित ठेवणे आपली जबाबदारी आहे. घाबरुन न जाता काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे.