शीतल मोगल (आहार तज्ज्ञ आणि वर्कआउट प्लॅनर)
मानवाच्या आरोग्याचे मूळ हे त्याच्या आहारात आणि जीवनशैली दडलेलं असतं. शरीर निरोगी तंदुरुस्त आणि दीर्घायुष्य ठेवण्यासाठी योग्य आहार आणि संतुलित पोषण याला पर्याय नाही. (National Nutrition Week 2025 special) आजच्या धकाधकीच्या तणावपूर्ण जीवनात आहाराचे शास्त्र आणि पोषणाचे नियम याकडे दुर्लक्ष झालेले आहे. परिणामी, स्थूलता, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या असंख्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढलेले दिसते. (Healthy eating)आहार म्हणजे शरीराला ऊर्जा आणि पोषण देणारे पदार्थ. धान्य डाळी, फळे भाज्या दूध, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्य, सुकामेवा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पाणी हे सर्व आहाराचे घटक आहेत. (Nutrition awareness) परंतु आहार केवळ पोट भरायला नसून तो शरीराच्या प्रत्येक पेशीला जीवन देणारा स्रोत आहे आणि पोषणाचे महत्त्व आहारात मोठे आहे.
योग्य आहाराचे फायदे
१. रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराला आजारांपासून लढायची शक्ती देते. शारीरिक व मानसिक विकास योग्य होतो.
२. लहान मुलांच्या मेंदू आणि शरीराच्या वाढीसाठी महत्त्वाचे असते.
३. उच्च जीवनातील धकाधकीसाठी ऊर्जा आणि कार्यक्षमता टिकवते.
४. आहार आणि पोषण मूल्याचे प्रमाण कमी झाल्यास मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, रक्तदाब यांसारखे आजार उद्भवतात. योग्य आहारामुळे दीर्घायुषी तंदुरुस्ती व वृद्धावस्थेतही निरोगी राहता येते.
चुकीच्या आहाराचे दुष्परिणाम
१. अति तेलकट मसालेदार व फास्ट फूड यामुळे लठ्ठपणा येतो व पचन संस्था बिघडते.
२. जंक फूडमध्ये आवश्यक जीवनसत्वे व खनिजे नसल्याने शरीर कमकुवत होते.
३. अयोग्य आहारामुळे कुपोषण, अशक्तपणा शरीरात रक्ताची कमतरता शारीरिक वाढ खुंटते.
४. जास्त गोड खाल्ल्याने मधुमेह, दातांचे आजार व विकार वाढतात.
संतुलित आहाराचे महत्त्व
१. जेवणात आपल्या ताटात धान्य, पालेभाज्या, फळभाज्या, डाळ, दही, दूध, थोडेसे तेल किंवा तूप या सर्वांचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे.
२. ताजे घरात बनलेले व ऋतुमानानुसार अन्न खावे. अति खाण्यापेक्षा मित आहार पाळणे आवश्यक व हितकारी आहे.
३. पाणी योग्य प्रमाणात पिणे खूप आवश्यक आहे.
४. जेवण वेळेवर व मन लावून शांतपणे व आनंदाने करणे महत्त्वाचे.
अयोग्य आहारामुळे महिलांना होणारे त्रास
१. ॲनिमिया म्हणजे रक्त कमी होणे लोह व जीवनसत्वे, बी १२ यांच्या कमतरतेमुळे थकवा कमजोरी व चक्कर येणे.
२. कॅल्शियम व व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास हाडे ठिसूळ होऊन सांधेदुखीचा धोका.
३. प्रथिने व जीवनसत्वे कमी असल्यास त्वचा निस्तेज व केसांच्या समस्या उद्भवतात.
४. प्रतिकारशक्ती कमी होणे व वारंवार संसर्ग होणे व आजारी पडणे.
५. थकवा व मानसिक तणाव. अंगात ताकद राहत नाही.
कुपोषणामुळे गर्भवती स्त्रियांना होणारे धोके
१. कुपोषणामुळे गर्भवती मातेचा रक्तदाब अंगावर सुज येणे. पायावर सुज येणे व जास्त रक्तस्राव होऊ शकतो.
२. प्रथिने, फॉलिक ॲसिड, लोह, कॅल्शियम यांचा अभाव असेल तर गर्भातील बाळाची वाढ खुंटते.
३. बाळ वेळेच्या आधी जन्मास येण्याची शक्यता असतेच, म्हणजेच अकाली प्रसूतीचा धोका निर्माण होतो. जन्मतः बाळ अशक्त व कमी वजनाचे असू शकते.
४. मेंदू व पाठीच्या कण्याचे दोष जन्मतः निर्माण होऊ शकतात.
५. प्रसूतीनंतर योग्य आहार घेतला नाही तर पाठदुखीचा त्रास व कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.
६. चुकीच्या जीवनशैलीमुळे ३५ ते ४० वयातच मेनोपॉज यायला लागला आहे.
७. तरुण मुलींमध्ये पीसीओडीची समस्या वेगाने वाढते आहे.
८. हार्मोनल असंतुलनामुळे अनेक प्रकारच्या तक्रारी दिसून येतात.
लहान मुलांना होणारे त्रास
१. वजन व उंची योग्य प्रमाणात न वाढणे.
२. शरीर व मेंदूचा विकास थांबणे, बुद्धी व स्मरणशक्ती कमी होणे, वारंवार सर्दी, ताप, खोकला होणे.
३. हाडे व दात कमजोर होणे. फास्ट फूडमुळे सतत पोटात दुखणे व लहान वयातच ॲसिडिटी सुरू होणे.
४. एकाग्रता कमी होणे व चिडचिड जास्त होणे. चुकीच्या जीवनशैलीमुळे चुकीच्या आहारामुळे आणि न्युट्रिशनच्या कमतरतेमुळे आजकाल लहान मुलांमध्ये टाईप टू डायबिटीस हा झपाट्याने वाढत आहे.
४. अनेक मुलं आक्रमक होताना दिसतात.
चुका आणि उपाय
१. ताटात पुरेशा प्रमाणात हिरव्या भाज्या-फळे नसल्याने बद्धकोष्ठता, अशक्तपणा व रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
२. बऱ्याचदा पाणी कमी पिल्याने शरीरातील विषारी द्रव्य नीट बाहेर फेकली जात नाहीत. परिणामी, थकवा जाणवतो व त्वचेचे त्रास होतात.
३. आहार डाळी, कडधान्य, दूध, अंडी, सुकामेवा कमी घेतल्यास स्नायू व हाडे ठिसूळ बनतात.
४. तेलकट तुपकट मिठाई जास्त साखर व साखरेचे पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह व हृदयरोगाचा धोका निर्माण होतो.
५. सकाळचे लवकर जेवण किंवा नाश्ता टाळल्यास दिवसभर लागणारी ताकद कमी मिळते. परिणामी, कामात लक्ष कमी लागते व चिडचिड वाढते.
६. अति उशिरा जेवण घेणे किंवा अनियमित खाल्ल्याने पचनशक्ती बिघडते. गॅस व ॲसिडिटी वारंवार होते.
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब, हृदयरोग व किडनीचे आजार वाढतात.
७. आजकालच्या काळात शारीरिक श्रम कमी झाले असून, फास्ट फूड, पॅकेज पदार्थ, शीतपेयं यांचे प्रमाण वाढले आहे.
८. आहार हा फक्त पोट भरण्याचा विषय नसून आरोग्य आनंद आणि जीवनाचा पाया आहे. योग्य आहार आणि संतुलित न्यूट्रिशन यामुळे शरीर निरोगी, मन ताजेतवाणे राहते.
९. आहाराने आयुष्य उत्साही बनते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात संतुलित आहार आणि योग्य प्रमाणातील व्यायाम अंगीकारणे आवश्यक आहे.
१०. योग्य आहार व व्यायाम यांचा समतोल राखणे ही काळाची गरज बनली आहे. "जसे अन्न तसे मन" हे विधान खरे आहे. पौष्टिक व घरच्या अन्न व आहारामुळे मन प्रसन्न राहते. विचारशक्ती वाढते आणि जीवनमान उंचावते.
शीतल मोगल (आहार तज्ज्ञ आणि वर्कआउट प्लॅनर)
shitalmogal1912@gmail.com