Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मोबाइलमुळे मलेरिया होतो! भलताच ‘ताप, साथीचा नवाच आजार आणि मुलांच्या जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2024 18:55 IST

मेघालायात मलेरियासह भलत्याच तापाने आरोग्यविभाग त्रस्त, हातातला मोबाइल भान हरवतो..

ठळक मुद्दे मोबाइलवर खेळा पण डास चावतात ते तरी पाहा असं आवाहन आता शेवटी आरोग्य विभाग करत आहे.

मोबाइलमुळे मलेरिया होतो असं कुणी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल का? हसाल म्हणाल काहीही बोलता, पण ते खरं आहे. मेघालयात अनेक मुलांना मोबाइलमुळे मलेरिया होतो आहे आणि तो तिथल्या आरोग्य विभागाच्या काळजीचा विषय झाला आहे. मलेरिया गंभीर वाढल्यानं गेल्या वर्षभरात ८ जण मृत्यूमुखी पडले आणि अनेकांना दवाखान्यात भरती व्हावे लागले. आता प्रश्न असा की मोबाइलमुळे मलेरिया कसा होईल? तर त्याचंच वाचा हे उत्तर..

मेघालय आरोग्य विभागाने मार्चमध्ये केलेल्या पाहणीनुसार अनेक लहान मुलांना आणि तिशीच्या आतल्या तरुणांना मलेरिया होण्याचे प्रमाण वाढलेले दिसले. त्यांनीसर्वेक्षण केल्यावर लक्षात आलं की अनेक मुलं हातात मोबाइल घेऊन घराबाहेर, कोपऱ्याकापऱ्यात, एकांत म्हणून किंवा चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी म्हणून बाहेर जाऊन बसतात. ते ऑनलाइन गेम खेळतात. खेळण्यात इतके तासंतास गर्क होतात की आपल्याला डास चावत आहेत हे ही त्यांना कळत नाही. डास चावतात आणि ते किती चावले हे कळत नाही. आणि त्यातून मलेरियाचा डास चावला की ताप येतो. अनेकांना दवाखान्यात भरती करावे लागते.

मेघालय आरोग्य विभाग सांगतो की, मलेरियाच्या डासाचं वर्तनही बदललेलं आहे. म्हणजे पूर्वी डास जितका वेळ चावायचा त्याहून दुप्पट वेळ तो डास आता चावतो. त्यात तापमान वाढलं आहे, उन्हाळ्यात मलेरियाचा प्रादूर्भाव या भागात जास्त होतो. गेले दशकभर इथला आरोग्यविभाग मलेरिया कमी व्हावा म्हणून झटत आहे. ज्या भागात प्रमाण जास्त त्या भागात मच्छरदाणी वाटप, डास चावू नये म्हणून क्रिम्स, फवारणी असे सगळे उपाय केले जातात. लोकांमध्ये जनजागृती केली जाते. आशा वर्कर्स घरोघर जाऊन तपासणी करतात. अनेकभागात तर लोकांना तपासणी किटही वाटण्यात आले आहे.

एवढं सारं सुरु असताना मलेरियाचं प्रमाण तरुण मुलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये वाढल्याचं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. त्याचं कारण हेच की ऑनलाइन गेम खेळताना डास चावले तरी अनेकांनी तंद्री तुटत नाही.  मोबाइलवर खेळा पण डास चावतात ते तरी पाहा असं आवाहन आता शेवटी आरोग्य विभाग करत आहे.  

टॅग्स : आरोग्य