Join us   

गणपतीच्या पूजेत लागणाऱ्या २१ पत्रींचा आरोग्यदायी उपयोग, छोटेमोठे आजार घरच्याघरी बरे करण्याचे सामर्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2022 8:30 AM

गणपतीला 21 पत्री ( 21 types of leaves) वाहाताना या पत्रींचं आपल्या आरोग्यासाठी असलेलं महत्व लक्षात यावं यसाठी खरंतर हे पत्रीपूजन. अनेक छोटे मोठे आजार बरे करण्याचे सामर्थ्य या 21 प्रकारच्या पत्रींमध्ये असतं. त्यांचे हे आरोग्यदायी गुणधर्म (medicinal benefits of 21 types of leaves) ओळखून शक्य तितक्या वनस्पती आपण आपल्या दारात लावायला हव्यात असं आयुर्वेद तज्ज्ञ म्हणतात. 

ठळक मुद्दे पत्रीपूजनाच्या निमित्ताने पत्रींचं आपल्या आरोग्यासाठीचं असलेलं महत्व लक्षात घेऊन शक्य तितक्या वनस्पती आपण आपल्या घरातील अंगणात, गॅलरीतील कुंड्यात लावू शकतो. किमान तुळस, आघाडा, दुर्वा, बेल, मधुमालती, डाळिंब या वनस्पती आपल्या दारात असायलाच हव्यात.

गणपतीच्या पुजेत पत्रीपूजनाला महत्त्व आहे. या पत्रीपूजनात गणपतीला 21 वनस्पती वाहायल्या जातात. या  पत्रीपूजनाच्या निमित्तानं कितीतरी वनस्पती आपण पहिल्यांदा पाहातो. ज्या पत्री गणपतीला प्रिय असतात त्या आपल्या आरोग्यासाठीही महत्त्वाच्या असतात. या पत्रींचं आपल्या आरोग्यासाठी असलेलं महत्व लक्षात यावं यासाठी खरंतर हे पत्रीपूजन. या पत्री गणपतीला वाहताना या वनस्पतींना ओळ्खणं, त्यांचे गुण जाणून घेणं आणि आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या वनस्पती जास्तीत जास्त प्रकारे आपल्या परसबागेत, अंगणात, गॅलरीतील कुंड्यात कशा लावता येतील याचा विचार होणं, तशी कृती होणं अपेक्षित आहे. या वनस्पती हाताशी असल्या की छोट्य छोट्या आरोग्यविषयक तक्रारी घरच्याघरी दूर होतात इतके गुणधर्म या 21 प्रकारच्या वनस्पतीत असल्याचं नाशिक येथील आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य राजश्री कुलकर्णी सांगतात. प्रत्येक वनस्पतीत असलेल्या गुणधर्मांची आणि त्यांच्या आरोग्यविषय फायद्यांची माहिती त्यांनी या लेखात  सविस्तर सांगितली आहे. 

पत्रीपूजनातील 21 वनस्पतींचे गुणधर्म काय आहेत?

1 . पिंपळ- हवा शुध्दीकरणासाठी या झाडाला खूप महत्व. पिंपळाची लाख अर्थात राख खडीसाखरेबरोबर खाल्ल्यास चांगली झोप लागते. झोपेचे विकार दूर होतात. 2. जाई- तोंड आल्यावर जाईची पानं चाऊन खावीत, तोंडात निर्माण झालेली लाळ थुंकवी, या उपायाने तोंड लवकर बरं होतं. 3. अर्जुन- हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी भागात ही वनस्पती ओळखली जाते. हदयरोगावर ही वनस्पती उपयोगी ठरते. या वनस्पतीत कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं. 4. रुई- हत्तीरोगावर रुईचं पान उत्तम औषध आहे. तसेच कृष्ठरोगावर देखील त्याचं औषध प्रभावी ठरतं. 5. मारवा- ही वनस्पती सुवासिक असून विविध प्रकारच्या जखमा भरणं किंवा कोणत्याही कारणामुळे त्वचेवर आलेले डाग घालवण्यासाठी उपयुक्त असते. 6. कण्हेरीची पानं- कण्हेरीची पानं, मुळं औषधी आहेत. वात विकारावरील महाविषारी तेलात हिचा वापर केला जातो. 7. देवदार- कफ, पडसे, संधिवात यासाठी देवदार पानांचा रस फायदेशीर ठरतो.  8. डोरली- याला काटे रिंगणी म्हणून ओळखतात. त्वचा रोग, पोटाचे विकार, मूत्ररोगांवर हे झुडूप फायदेशीर ठरतं.  9. डाळिंबं- डाळिंबाच्या पानांचा उपयोग जंतावर गुणकारी आहे. काविळीवरील उपचारासाठीही त्याचा उपयोग केला जातो. 10 आघाडा- ॠषीपंचमीच्या दिवशी महिला दात घासण्यासाठी त्याचा वापर करतात. आघाडा मुखरोग आणि दंतरोगावर उत्तम औषध आहे. 11. विष्णुकांता- याला शंखपुष्पी म्हणतात. बुध्दीवर्धक म्हणून ही वनस्पती ओळखली जाते. ब्रेनटॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे. या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारांवर औषध म्हणून केला जातो. 12. शमी- शमीला सुप्त अग्नी देवता असं म्हणतात. त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी आहे. 13. दुर्वा- पांढऱ्या  दुर्वा अर्थात हरळ गणपतीला प्रिय. नाकातून रक्त येणं, ताप , अंगातील दाह कमी करण्यासाठी दुर्वांचा रस अमृतासमान असतो. 14. तुळस- ही वनस्पती 24 तास ऑक्सिजन देणारी आहे. डासांना ती पळवून लावते. कफ, दमा, सर्दी, किटक दंश तसेच कर्करोग यासारख्या आजारांवर तुळशीचा रस उपयोगी ठरतो. 15. धोतरा- या वनस्पतीपासून अफ्रोपिन नावाचं औषध काढतात. वेदनानाशक म्हणून त्याचा उपयोग होतो. धोतऱ्याचे फूल दमा, कफ, संधिवत आदी रोगांवर उपयुक्त ठरतं. 16. बेलपत्रं- या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो. 17. माका- पावसाळ्यात आढळणारी डोंगरी वनस्पती. माका हे रसायन आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग न होऊ देण्याची ताकद या वनस्पतीत आहे. मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचू दंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते. 18. मधुमालती- फुप्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो. 19 बोर- बोराच्या बियांचं चूर्ण चेहेऱ्यावर लावल्यास पुटकुळ्या जातात. डोळे जळजळणे, तापामधील दाह यासाठी बोर उपयुक्त आहे. 20. हादगा- याला अगस्ती म्हणून ओळखलं जातं. हादग्यांच्या फुलांची भजी छान लागतात. ही फुलं म्हणजे जीवनसत्त्वांचा खजिना आहे. 21 केवडा- ही वनस्पती थायरॉइडच्या दोषावर गुणकारी आहे.

Image: Google

अशा या 21 वनस्पती. या वनस्पती यासाठी देखील महत्त्वाच्या असतात कारण की पुढे सप्टेंबर संपून आक्टोबर लागतो. पाऊस कमी होतो. ऑक्टोबर हिट सुरु होते आणि पित्ताचे त्रास उफाळून येतात. डोकं दुखणं, डोळे जळजळणं, अ‍ॅसिडिटी होणं, मळमळणं, उलटी होणं असे त्रास सुरु होतात. 21 वनस्पतीतल्या कितीतरी वनस्पती खास या आजारावर उपचारासाठी उपयोगी पडतात. म्हणून आयुर्वेद म्हणतं या 21 वनस्पतीतील ज्या ज्या वनस्पती आपल्याला शक्य आहे तेवढ्या लावाव्या, जोपासाव्या आणि त्यांचा उपयोग करावा. किमान तुळस, आघाडा, दुर्वा, बेल, मधुमालती, डाळिंब या वनस्पती आपल्या दारात असायलाच हव्यात.

टॅग्स : गणेशोत्सवआरोग्यहेल्थ टिप्स