Join us   

नाजूक जागी सतत खाज येते? चारचौघात लाज वाटते ? तज्ज्ञ सांगतात, कारण आणि उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2023 10:50 AM

Leucorrhoea white discharge Irritation and Itching Vaginal Health : योनीमार्गाचा दाह हा आजार नेमका काय असतो? लक्षणे कोणती?

डॉ. दाक्षायणी पंडित 

परवा माझी एक मैत्रीण घरी आली होती. अस्वस्थ, त्रासलेली दिसत होती. तिचा हात नकळत नको तिथे जात होता. माझ्या ते लक्षात आलं हे समजताच ती ओशाळली. मी तिला विचारलं, ‘इतकी अस्वस्थ का आहेस? काय होतंय?’ ती म्हणाली, ‘अग, सारखं पांढरं जातंय अंगावर. इतकी भयानक खाज येतीये. ऑफिसात, मिटींगमध्ये कुठेही. फार लाजिरवाणं वाटतं गं चारचौघात.’मी तिला इतर काय त्रास होतो त्याची सविस्तर माहिती घेतली. मग तिला तपासलं. माझ्या लक्षात आलं की तिला नवरोजींकडून कँडिडा अल्बिकान्स ही एकपेशीय बुरशी प्रेमाची भेट म्हणून मिळाली होती. (अशी भेट फक्त या प्रकारेच मिळते. काय करणार? अधून मधून प्रेम तर करतोच ना आपण! ) तर मैत्रिणींनो ही भेट मिळाल्यावर काय करायचं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ते मी तुम्हाला सांगते (Leucorrhoea white discharge Irritation and Itching Vaginal Health).

आजाराचे नाव – योनिमार्गाचा दाह (व्हजायनल कँडिडियासीस)

रोगकारक जंतू -सामान्यतः कँडिडा अल्बिकान्स ही एकपेशीय बुरशी. पण प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीचे इतर भाऊबंद संसर्ग निर्माण करू शकतात. कँडिडा अल्बिकान्स ही बुरशी नेहमी आपल्या त्वचेवर, तोंडात, आतड्यात आणि योनीमार्गात व पुरुषांच्या शिस्नावरील (लिंगावरील) त्वचेवर वस्तीला असते. पण शरीराची स्वच्छता अथवा  प्रतिकारशक्ती कमी झाली की ती वेगात वाढून संसर्ग आणि त्यायोगे दाह निर्माण करते. पुरुषांमधील संसर्ग सहसा लक्षणरहित असतो. स्त्रियांना मात्र त्रासदायक असा योनिदाह होतो.

(Image : Google)

लक्षणे –

१. सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे अंगावर पांढरे जाणे म्हणजेच योनीमार्गातून पांढरा स्त्राव बाहेर येणे (इंग्रजीत ल्युकोरीया म्हणजेच व्हाईट डिस्चार्ज). कधी कधी पॅड घ्यावे लागावे इतकेही याचे प्रमाण असू शकते. हा स्त्राव पांढरा शुभ्र वा फाटलेल्या दह्याच्या गुठळ्यांसारखा असतो. 

२. अतिशय त्रासदायक लक्षण म्हणजे योनिमुखाशी येणारी  वैतागवाणी तीव्र खाज. 

निदान-

ही आली पंचनाम्याची वेळ. तीव्र लक्षणांमुळे आपली संसर्गित मैत्रीण सहसा लवकर डॉक्टरांकडे जाते. स्त्रावाचा शुभ्र पांढरा रंग आणि तीव्र खाज यावरच निदान केले जाते. स्त्रीरोग, त्वचारोग किंवा गुप्तरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर ते निदान करून औषधे देतात पण स्त्रावाचा नमुनाही तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवतात. मैत्रिणींनो, हा पंचनामा जरी असला तरी तज्ञांपासून आजाराशी संबंधित काहीही लपवायचं नाही, म्हणजे त्यांना अचूक निदान करता येते. तुम्ही सांगाल त्यातील प्रत्येक गोष्ट महत्वाची असते. 

(Image : Google)

उपचार –

यासाठी बरीच बुरशीरोधक औषधे आहेत. मलम, तोंडाने घेण्याच्या गोळ्या, योनिमार्गाच्या आत ठेवण्याच्या गोळ्या इ. प्रकारात त्या उपलब्ध आहेत. महत्वाची गोष्ट दोन्ही लैंगिक सहकाऱ्यांनी एकाच वेळी वा डॉक्टर सांगतील तेव्हढे दिवस उपचार घेणं अत्यंत आवश्यक आहे. एकानेच उपचार घेतले तर दुसऱ्याचा संसर्ग तसाच राहतो व उपचार घेऊन बरा झालेला पुन्हा संसर्गित होतो.  

प्रतिबंध -

रोज नियमित स्वच्छ आंघोळ हा सर्वात उत्तम प्रतिबंध. शरीर व अंतर्वस्त्रांची स्वच्छता चांगली राखल्यास स्त्री -पुरुष दोघांनाही संसर्ग होण्याचे प्रमाण खूप कमी होते.   

(लोखिका एम बी बी एस, एम डी. असून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व चिकित्सा प्रयोगशाळेच्या प्रमुख निवृत्त प्राध्यापिका आहेत. )

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सयोनीलैंगिक आरोग्य