Join us   

मुलांना लस देतोच, पण महिला स्वत:साठी आवश्यक लस घेतात का? डॉक्टर सांगतात, लस का घ्यायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2023 7:52 PM

Importance of Vaccination For Women's Health : एखाद्या संसर्गापासून दूर राहायचे असेल तर लस घ्यायलाच हवी...

डॉ. दाक्षायणी पंडित 

लसींच्या शोधापूर्वी विविध संसर्गजन्य आजारांचा माणसांमध्ये वारंवार प्रादुर्भाव होऊन मोठ्या संख्येने माणसे मृत्युमुखी पडत. रॉबर्ट कॉक या जर्मन शास्त्रज्ञाने जंतू व रोग याचा कार्यकारण भाव शोधून काढण्यासाठी क्षयरोगाच्या जंतूंवर अनेक प्रयोग केले. त्यातून अनेक जंतू व त्यांनी निर्माण केलेले रोग यांचा संबंध जोडणे सोपे झाले. नंतर फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाश्चर याने लसी शोधण्यासाठी अनेक जंतूंवर प्रयोग केले. त्याचे सर्वात महत्वाचे योगदान म्हणजे आलर्क (रेबीज) ची लस तयार केली. पाश्चरला वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्राचा पिता म्हणून गौरवले गेले (Importance of Vaccination For Women's Health).

अलीकडेच करोना विषाणू आला तेव्हा तो अगदी नवा होता. आपल्याला त्याची मुळीच ओळखदेख नव्हती. त्यामुळे आपल्या शरीरात करोनारोधी प्रतिकारशक्ती देखील नव्हती. याचा परिणाम म्हणून कोविडच्या साथीत  जगभरात लाखो लोक मरण पावले. सर्वत्र भीतीचा महाभयंकर उद्रेक झाला. मात्र संसर्ग साथ उद्भवताच अनेक देशांत त्यावर संशोधन सुरु झाले. त्याचा मुख्य उद्देश हा करोना विषाणू विरुद्ध लस तयार करणे व  संसर्ग आणि पर्यायाने मनुष्यहानी रोखणे हाच होतं. परिणामी अनेक देशांनी कोरोनाविरोधी लस तयार केली. त्यात भारताचा क्रमांक खूप वरती होता. लस उपलब्ध होताच करोनासाठी वैश्विक लसीकरण सुरु झाले आणि हळूहळू लोक बाधित होणे व मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले. आता तर करोनाला कुणीच घाबरत नाही. हे केवळ व्यापक लसीकरणाने साध्य झाले. अर्थात इतर सहाय्यक प्रतिबंधक गोष्टीही यासाठी महत्वाच्या होत्याच – उदा.  मुखपट्टी, वारंवार हात धुणे; इ. 

(Image : Google)

लस आणि लसीकरण म्हणजे काय?

लस म्हणजे तो अखंड जंतू (जिवंत किंवा मृत) अथवा त्याच्यातला एखादा रासायनिक भाग होय. विशिष्ट जंतूविरुद्ध लस तयार करण्यासाठी त्या जंतूचा कोणता भाग मानवी शरीरामध्ये सर्वाधिक प्रतिकारशक्ती निर्माण करील, मात्र त्याचे दुष्परिणाम कमीत कमी असतील याचा अभ्यास केला जातो. वर उल्लेख केल्यापैकी जे काही या अटींमध्ये बसेल, त्याची आधी प्राण्यांवर चाचणी घेतली जाते व या चाचणीच्या निष्कर्षांवरून त्याची योग्यता ठरवली जाते. ही प्रक्रिया खूप लांबलचक असते, त्यामुळे लस तयार व्हायला खूप वेळ लागतो. एखाद्या जंतू विरुद्ध वर्षानुवर्षे शास्त्रज्ञ प्रयत्न करीत असतात पण लस तयार होऊ शकत नाही. त्याची काही विशिष्ट वैज्ञानिक करणे आहेत. उदाहरणार्थ हिवताप (मलेरिया) विरुद्ध सक्षम लस तयार करणे अद्याप शक्य झालेले नाही. एकदा प्राण्यांवर प्रयोगांच्या निष्कर्षांनुसार लस माणसांवर वापरण्यायोग्य आहे असे ठरले की ती माणसांना विशिष्ट मात्रेत व कालावधीत दिली जाते, याला लसीकरण म्हणतात.

लसींचे वर्गीकरण – 

मानवी संसर्ग उत्पन्न करणारे सूक्ष्मजीव ज्या प्रकारचे आहेत, त्याच प्रकारे त्या विरूद्धच्या लसींचे वर्गीकरण केले गेले आहे. म्हणजे विषाणुरोधी लसी, जीवाणूरोधी लसी असे. त्यांच्या निर्मिती प्रक्रियेप्रमाणेही त्यांचे जिवंत व मृत लसी असे वर्गीकरण आहे. म्हणजे ज्या लसीत तो विषाणू किंवा जीवाणू जिवंत अथवा मृत अवस्थेत वापरला गेला आहे, असे. क्वचित काही लसींमध्ये विषा/जीवाणू वा त्याचा भाग न वापरता केवळ त्याच्या विषांचा प्रतिपिंड उत्पादनक्षम भाग वापरला जातो. त्याला व्हॅक्सिन न म्हणता टॉक्सॉईड म्हटले जाते. उदा. धनुर्वातरोधी लस (टिटॅनस टॉक्सॉईड).

( लेखिका एम बी बी एस, एम डी. असून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व चिकित्सा प्रयोगशाळेच्या प्रमुख निवृत्त प्राध्यापिका आहेत. )

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससंसर्गजन्य रोग