Join us   

उत्साहात विसर्जन मिरवणूक पाहायला जाताना लक्षात ठेवा ३ गोष्टी; बाप्पाला निरोप देताना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2023 8:51 AM

How To Take Care While going for Ganpati Visarjan Miravnuk immersion procession : मिरवणूक पाहायला जाताना किंवा सहभागी होताना काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी

गणपती बाप्पाचे राज्यातच नाही तर देशभरात आणि परदेशातही अतिशय उत्साहात स्वागत करण्यात येते. जितक्या जोशात आपण बाप्पाचा आगमन सोहळा करतो तितक्याच उत्साहात गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळाही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. सार्वजनिक गणपती मंडळांबरोबरच सोसायटीचे गणपती, घरातले गणपती यांचे या दिवशी विसर्जन असल्याने मोठ्या प्रमाणात गणपतींचे या दिवशी विसर्जन केले जाते. बहुतांश शहरांमध्ये मुख्य रस्ते या दिवशी बंद ठेवले जातात. सगळीकडे गुलाल, मिरवणूका आणि जल्लोष असा एकच माहोल पाहायला मिळतो (How To Take Care While going for Ganpati Visarjan Miravnuk immersion procession) . 

आपल्या गावाला निघालेल्या बाप्पाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आणि या जल्लोषात सामील होण्यासाठी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. यामध्ये पोलिस यंत्रणा, विविध सामाजिक काम करणाऱ्या संघटना, ढोल आणि विविध पथकांतील मंडळी, विक्रेते, गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरीक अशा सगळ्यांचा मोठ्या संख्येने समावेश असतो. सध्या राज्यभरात पावसाळी वातावरण असल्याने विसर्जन मिरवणूकीवरही पावसाचे सावट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूक पाहायला जाताना किंवा सहभागी होताना काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी, त्या कोणत्या ते पाहूया... 

(Image : Google)

१. स्कार्फ, रेनकोट

सध्या मधेच ऊन पडते तर मधेच पाऊस पडतो. अशा वातावरणाचा आपल्या शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. मिरवणूक आणि गणपती पाहण्याच्या नादात आपण दंगून गेलो तर आपल्याला आजुबाजूच्या वातावरणाचे भान राहत नाही. मात्र डोक्याला खूप ऊन लागले किंवा आपण खूप भिजलो तरी त्याचा नंतर त्रास होऊ शकतो. साधारणपणे अशाप्रकारच्या इव्हेंटनंतर संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याकडे स्कार्फ, टोपी, रेनकोट किंवा छत्री यांसारख्या गोष्टी अवश्य असायला हव्यात.

२. पाणी

पाणी ही किमान आवश्यकता असते. बाहेर पडल्यावर ऊन्हामुळे आणि चालल्यामुळे आपल्याला नेहमीपेक्षा जास्त तहान लागते. गर्दीमुळे जास्त घाम आणि थकवा येतो. त्यामुळे शरीर डीहायड्रेट होण्याची शक्यता असते. अशावेळी सतत पाणी पिणे आवश्यक असते. पाणी सतत विकत घेण्यापेक्षा आपल्याकडे एखादी बाटली असेल तर लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांना त्याचा चांगला फायदा होतो. अचानक उलटी, चक्कर येणे असे काही त्रास झाले तरी पाण्याचा उपयोग होतो. त्यामुळे पाणी अवश्य असायला हवे. 

(Image : Google)

३. मौल्यवान गोष्टी आणि पैसे 

मिरवणूकीत गर्दी असल्याने शक्यतो दागिने, खूप जास्त प्रमाणात पैसे, महागडे मोबाइल, घड्याळे यांसारख्या गोष्टी कॅरी करु नयेत असे वारंवार सांगितले जाते. मात्र आपण त्याकडे पुरेसे लक्ष देत नाही आणि आपली हौस म्हणून या सगळ्या गोष्टी घेऊन फिरतो. या गोष्टी चोरीला जाण्याचे प्रमाण या काळात खूप जास्त असते. तसेच गर्दीत नकळत या गोष्टी पडू शकतात, हरवू शकतात. त्यामुळे शक्यतो मौल्यवान वस्तू कॅरी करु नयेत आणि करायच्याच असतील तर योग्य ती काळजी घेऊन करायला हव्या.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सगणपतीगणेशोत्सव