Join us

पावसाळी सर्दी खोकल्यासाठी घरगुती उपाय, आजीच्या बटव्यातले जुने नुस्के! सतर्क राहा, दुर्लक्ष टाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 19:15 IST

पावसाळा आला की सर्दी, खोकला अशा तक्रारी घराघरांमध्ये सुरू होतात. सर्दी- खोकला झाल्यावर लगेच औषधी घेण्यापेक्षा आजीबाईच्या बटव्यातले हे काही खास उपाय करून पहा.

ठळक मुद्दे कांद्यामध्ये असणारे अँटिबॅक्टेरियल गुण आपल्याला संक्रमणापासून वाचवतात.मधामुळे प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. 

सतत येणाऱ्या शिंका, गळणारं नाक, बसलेला घसा किंवा मग खोकला. असे आजार पावसाळ्यात अजिबातच नवे नाहीत. एकाला झालं की मग हे इन्फेक्शन घरातल्या सगळ्यांनाच होतं. दोन ते तीन दिवस अगदी कठीण जातात. सर्दी खोकला झाला की आपण लगेचच औषधांचा मारा सुरू करतो. यामुळे दुखणं तर कमी होतं, पण असं सतत औषधी घेणं आरोग्याच्या दृष्टीने कठीण असतं. म्हणूनच जर या पावसाळी सर्दी- खोकल्याने हैराण असाल, तर सगळ्यात आधी काही घरगुती उपाय करून पहा. हे उपाय नक्कीच प्रभावी ठरतील.

 

कांदा आणि मध चाटण कांदा आणि मधाचं चाटण हे सर्दी खोकल्यावर खूप प्रभावी आहे. खोकल्यासाठी तर हे चाटण उपयुक्त ठरतच पण सर्दी आणि शिंका असा त्रास होत असेल, तरी उपयुक्त ठरतं. त्यामुळे या औषधाचा उपयोग आधी करून पहा. फरक पडला नाही, तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधी घ्या. नैसर्गिक साधनांपासून हे चाटण बनविलेले असल्याने त्याचा आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. 

 

का घ्यावे चाटण? कांद्यामध्ये असणारे अँटिबॅक्टेरियल गुण आपल्याला संक्रमणापासून वाचवतात. तर मधामध्ये असणारे मिनरल्स, एंजाईम, विटामिन बी, प्रिबायोटिक्स आणि अँटिऑक्सिडंट्स आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात. मधामुळे प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. 

 

कसे बनवायचे चाटण? सगळ्यात आधी तर एक मध्यम आकाराचा कांदा किसून घ्या. यामध्ये दोन टेबलस्पून मध टाका आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. या मिश्रणावर झाकण ठेवा. अर्ध्या तासातच य मिश्रणाला पाणी सुटलेले असेल. हे पाणी सर्दी- खोकला  अशा आजारांवर प्रभावी ठरते. मोठ्या माणसांनी दिवसातून चार वेळेस हे पाणी एकेक टेबलस्पून अशा प्रमाणात प्यावे. एक- दोन दिवसातच फरक दिसून येईल.

 

टॅग्स : आरोग्य