Join us

पायी चालताना दिसतात कोलेस्टेरॉल वाढल्याचे हे संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:14 IST

High cholesterol symptoms in Legs : कोलेस्टेरॉल वाढल्याची काही लक्षणं तुम्हाला वॉक करतानाही बघायला मिळतात. ती लक्षणं काय हे जाणून घेऊया.

High cholesterol symptoms in Legs : बॅड कोलेस्टेरॉल शरीरात वाढणं आज एक मोठी गंभीर समस्या बनली आहे. बॅड कोलेस्टेरॉल शरीरात वाढलं तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका सगळ्यात जास्त वाढतो. कारण कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन नसा ब्लॉक करतं. ज्यामुळे हार्टपर्यंत सुरळीत रक्त पुरवठा होत नाही. कोलेस्टेरॉल शरीरात वाढलं तर शरीरात वेगवेगळी लक्षणं दिसू लागतात. कोलेस्टेरॉल वाढल्याची काही लक्षणं तुम्हाला वॉक करतानाही बघायला मिळतात. ती लक्षणं काय हे जाणून घेऊया.

वॉक करताना दिसणारी कोलेस्टेरॉलची लक्षणं

पायांमध्ये वेदना

कोलेस्टेरॉल वाढल्याचं सुरूवातीचं लक्षण म्हणजे पायी चालताना किंवा वॉक करताना पाय दुखतात. नसांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होत गेलं की, नसा लहान होत जातात आणि मांसपेशींना पुरेसं ऑक्सीजन मिळत नाही. त्यामुळे मांड्या, पोटऱ्या, कंबर पाय दुखतात आणि थकवा येतो. खासकरून चालताना आणि पायऱ्या चढताना ही लक्षणं दिसतात.

कमजोर स्नायू

कोलेस्टेरॉलमुळं रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे पायांचे स्नायू कमजोर होऊ शकतात. अशात चालताना, बॅलन्स ठेवताना किंवा जास्त वेळ उभं राहताना याची जाणीव होऊ शकते.

खालचे भाग थंड

कोलेस्टेरॉल वाढल्यानंतर ब्लड सर्कुलेशन योग्य पद्धतीनं होऊ शकत नाही. ज्यामुळे पाय इतर अवयवांच्या तुलनेत अधिक थंड असतात. हे खासकरून चालताना किंवा चालल्यानंतर होतं. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यावर रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. ज्यामुळे उष्णतेचा प्रसारही कमी होतो.

सुन्नपणा-झिणझिण्या

कोलेस्टेरॉल जमा होऊन धमण्या ब्लॉक होतात, तेव्हा अनेक गोष्टींमध्ये अडथळा निर्माण होतो. अशात पायांमध्ये झिणझिण्या किंवा सुन्नपणा जाणवतो. ज्यांना नेहमीच ही समस्या होते त्यांनी लगेच डॉक्टरांना भेटावं.

रंगात बदल

पायाचा रंग हलका किंवा जांबळा-निळा झाला असेल तर हा हाय कोलेस्टेरॉलचा संकेत आहे. त्वचेमध्ये ऑक्सीजन कमी पोहोचल्यानं ही समस्या होते. 

कोलेस्टेरॉल कसं कमी कराल?

कोलेस्टेरॉल वाढलं आहे किंवा कंट्रोल आहे हे जाणून घेण्यासाठी नियमितपणे टेस्ट करा. तेलकट, भाजलेले, मसालेदार पदार्थ कमी खावेत. फळं, भाज्यांचा आहारात समावेश करा. नियमितपणे व्यायाम करा. 

टॅग्स : आरोग्यहृदयरोग