Heart Disease Causes : अलिकडे हृदयासंबंधी आजारांचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. कमी वयातही वेगवेगळे हृदयरोग होऊ लागले आहेत. आधी हे आजार वृद्ध लोकांना अधिक होत होते, पण अलिकडे यांचं प्रमाण तरूणांमध्येच काय तर लहान मुलांमध्ये सुद्धा खूप वाढलं आहे. खासकरून भारतात तरूणांमध्ये हृदयासंबंधी आजारांच्या केसेस बऱ्याच वाढल्या आहेत. त्यामुळे याकडे गंभीरतेने बघण्याची गरज आहे. तसेच या आजारांची कारणं माहीत असणंही महत्वाचं आहे.
तरुणांच्या 2 सवयी ज्यामुळे हृदयाची समस्या होते
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, खानपानाशी संबंधित काही सवयी हृदयविकारासाठी प्रमुख कारण ठरतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सवयी त्या तरुणांच्या हृदयाचं नुकसान करतात. ज्यांच्या हृदयविकाराचा कुठलाही कौटुंबिक इतिहास नसतील आणि या दोन सवयी असतील तर त्यांना हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. त्या काय सवयी आहेत ते पाहुयात.
सकाळचा नाश्ता टाळणे
सकाळच्या धावपळीत नाश्ता टाळमे सोयीचे वाटू शकते, पण हृदयावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. नाश्ता न केल्यास हार्मोन्स असंतुलित होतात आणि आर्टरीजमध्ये प्लाक जमा होण्याची शक्यता वाढते. नाश्ता वगळणाऱ्या तरुणांमध्ये ब्लड प्रेशर वाढण्याचा आणि मेटाबॉलिज्म बिघडण्याचा धोका जास्त असतो. शरीर जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे हृदयावर ताण येतो. एक्सपर्ट्सच्या मते, नियमित नाश्ता वगळल्यास हृदयविकाराचा धोका 27-35% पर्यंत वाढू शकतो.
रात्री उशिरा जेवणं
आजकालच्या लाइफस्टाईलमध्ये बरेच लोक रात्री उशिरा जेवतात. हे हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. जेवण करून लगेच झोपत असाल तर शरीरात सूज वाढते. दोन तासांपेक्षा कमी वेळात झोपल्यास मेटाबॉलिज्म प्रभावित होतो, ग्लूकोज नियंत्रण बिघडतं आणि सूज वाढते. यामुळे मायोकार्डिअल डॅमेज (हृदयाचं नुकसान) होण्याची शक्यता वाढते.
जर तरूणांनी या रोजच्या जगण्यातील या सवयी टाळल्या तर ते निरोगी राहू शकतात आणि हृदयांचे वेगवेगळे आजारही टाळू शकतात. महत्वाची बाब म्हणजे कमी वयात हार्ट अॅटॅकचा धोका टाळला जातो.