Join us   

थंडीत खायलाच हवी गूळ-तूप पोळी, ५ फायदे, आई-आजीच्या खाऊची खास आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2024 1:29 PM

Healthy Diet in winter Jaggery and roti benefits : खमंग लागणारी गूळ तूप पोळी पोटभरीची आणि भरपूर एनर्जी देणारा पदार्थ...

गूळ तूप पोळीचा लाडू हा आपल्या लहानपणी आई किंवा आजी आपल्याला देत असलेला नाश्ता. आदल्या दिवशीची उरलेली पोळी वाया न घालवता तिच्यापासून पौष्टीक पदार्थ कसा करायचा ते या स्त्रियांना चांगलेच माहित होते. गूळात असणारे लोह, तुपामुळे त्याची वाढणारी पौष्टीकता आणि शिळ्या पोळीतून मिळणारे पोषण यांचा मिलाप असलेला हा पौष्टीक नाश्ता म्हणजे आपल्यासाठीही आवडीचा खाऊ असायचा. लहान मुलांना आजही अनेकदा त्यांनी पोळी खावी म्हणून पोळीचा रोल देताना त्यात गूळ आणि तूप घालून देतो. अतिशय खमंग लागणारी ही गूळ तूप पोळी म्हणजे पोटभरीची आणि भरपूर एनर्जी देणारी असते. संक्रांतीलाही आपल्याकडे आवर्जून तीळगुळाची पोळी केली जाते. थंडीच्या दिवसांत हा पारंपरिक आहार एनर्जी देणारा असतो. पाहूयात गूळ-पोळी खाण्याचे फायदे (Healthy Diet in winter Jaggery and roti benefits)...

१. थंडीच्या दिवसांत शरीराला भरपूर ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असते. गूळ हा उष्ण आणि ऊर्जेचा स्त्रोत असल्याने थंडीत आवर्जून गूळ खाल्ला जातो. गुळात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारखे आरोग्यासाठी आवश्यक असे घटक असतात. 

२. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ व्यक्ती यांच्यामध्ये अनेकदा लोहाची कमतरता असल्याचे दिसून येते. गुळ पोळीने लोहाची कमतरता भरुन निघते आणि हाडे दुखण्याच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. 

(Image : Google)

३. थंडीच्या दिवसांत पचनाशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. गॅसेस किंवा अपचन यांसारख्या समस्या दूर होण्यासाठी गूळ पोळी हा उत्तम आहार मानला जातो. 

४. थंडीच्या दिवसांत तापमान कमी झाल्याने सर्दी- कफ होण्याच्या समस्येतही वाढ होते. हा कफ  बरा होण्यासाठी गूळ तूप पोळी एक चांगला आहार आहे. 

५. गूळ पोळी आणि तूप किंवा दूध हा एकप्रकारचा सोपा आणि ब्रेकफास्टसाठीचा चांगला पर्याय असल्याने सकाळी घाईच्या वेळात आपण हा आहार घेऊ शकतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नथंडीत त्वचेची काळजी