Join us   

कानावर मुरूम - पुटकुळ्या आल्या आहेत? ३ उपाय, त्रास होईल कमी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 1:46 PM

Home Remedies for Ear Pimples चेहऱ्यावरील पिंपल्स सामान्य आहे, मात्र, कानामध्ये उठणारे मुरूम खूप त्रासदायक ठरतात. ३ उपाय करून पाहा, मिळेल आराम

चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम, काळे डाग उठणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र, यासह कान, नाक आणि डोळ्यांवर देखील मुरूम उठते, हे तुम्हाला माहिती आहे का ? कानामधील मुरूम खूप वेदनादायी असतात. चेहऱ्याच्या विविध भागात उठणारे मुरूम घालवण्यासाठी विविध उपाय आहेत. त्याचप्रमाणे, जर आपल्याला कानातल्या मुरूमांपासून सुटका हवी असेल, तर काही घरगुती उपायांचा वापर करून पाहा. याने कानातल्या मुरुमांपासून आराम मिळेल.

कानात मुरुम येण्याची कारणे-

आपल्या कानात पिंपल्स उठले असतील तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे कान साफ ​​न करणे, कानात जास्त घाम येणे, यासह तेलकट त्वचेमुळे मुरुमांची समस्या उद्भवण्याची पूर्ण शक्यता असते. कानामध्ये जर डास चावला आणि त्या ठिकाणी खाज सुटली तर इतर इन्फेक्शनने त्याठिकाणी मुरूम तयार होते. यावर उपाय म्हणून ३ घरगुती गोष्टी करून पाहा.

लसूण

लसणामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. कानातील मुरुमाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हा एक सोपा मार्ग आहे. हा उपाय करण्यासाठी एका पॅनमध्ये मोहरीचे तेल घ्या. त्या तेलात लसणाच्या २ ते ३ पाकळ्या गरम करा. तेल गरम झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा. नंतर कानातल्या मुरुमांवर लावा. दिवसातून २-३ वेळा मुरुमांवर लावा. अशाने आराम मिळेल.

दालचिनी

दालचिनीमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म कानाच्या पिंपल्सची सूज कमी करण्यास मदत करतात. हा उपाय करण्यासाठी चिमूटभर दालचिनीमध्ये चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळा आणि त्यात पाणी घालून घट्ट मिश्रण तयार करा. यानंतर ही पेस्ट कानाच्या मुरुमांवर लावा. हा घरगुती उपाय दिवसातून २-३ वेळा करून पहा. 

तुळशी

तुळशी अँटी-ऑक्सिडंट्सने भरपूर असते, जे त्वचेच्या खोलवर जाऊन विषारी घटक बाहेर काढून साफ करण्यास मदत करते. हा उपाय करण्यासाठी तुळशीच्या पानांची पेस्ट करा. त्या पेस्टमध्ये थोडं कापूर मिसळून कानाच्या मुरुमांवर लावा. यामुळे वेदना आणि सूज कमी होईल. ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी लावा. आणि सकाळी धुवून टाका.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल