Join us   

सतत स्क्रीनकडे पाहून डोळे थकले, आळशी झाले? डोळ्यांचा स्ट्रेस घालवण्यासाठी 8 सोपे व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 12:03 PM

डोळे चांगले ठेवायचे असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही

ठळक मुद्दे डोळ्यांना येणारा ताण घालवण्यासाठी सोपे उपायडोळे चांगले तर आपण वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकू

ऑफीसचे काम, सोशल मीडियाचा वापर आणि इतर अनेक कामांसाठी आपल्यातील अनेक जण दिवसातील सर्वाधिक काळ मोबाइलच्या, लॅपटॉपच्या किंवा आणखी कोणत्या तरी स्क्रीनसमोर असतात. सतत स्क्रीनसमोर डोळे असल्याने डोळ्यांना येणारा थकवा, कोरडेपणा, डोळे चुरचुरणे, कोरडे होणे अशा एकाहून एक समस्या निर्माण होतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत काही ना काही पाहण्यात व्यस्त असणाऱ्या या डोळ्यांची वेळीच काळजी घेतली नाही तर या समस्या  वाढतात. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काही व्यायाम केल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच अँटीग्लेअर चष्मा वापरणे, दर काही वेळाने डोळे स्क्रीनपासून दूर नेणे, पुरेशी झोप घेणे यांसारख्या उपायांनी डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पाहूयात डोळ्यांना येणारा ताण म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आणि ती दूर होण्यासाठी काय व्यायामप्रकार करायला हवेत याविषयी...

डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे काय? 

डिजिटल आय स्ट्रेन ही समस्या मोबाईल फोन, कॉम्प्युटर यांसारखा उपकरणांचा जास्त वापर केल्यामुळे होते. या उपकरणांच्या स्क्रीनमधून निघणारा प्रकाश डोळ्यांना हानी पोहचवतो. डिजिटल आय स्ट्रेनला “कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (Computer Vision Syndrome)” म्हणूनही ओळखले जाते. ही समस्या सामान्यत: अशा लोकांमध्ये आढळते जे दिवसातील बराच काळ स्क्रीन पाहण्यात घालवतात. ज्या लोकांना कॉम्प्युटरवर दिवसभर काम करावे लागते त्या लोकांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. 

लक्षणे 

१. डोकेदुखी २. डोळ्यावर ताण येणे  ३. डोळे कोरडे होणे  ४. मान आणि खांदा दुखणे  ५. डोळ्यांना खाज येणे ६. डोळे लाल होणे   

डोळ्यांसाठी व्यायामप्रकार 

१. कामाच्या मधून स्क्रीनवरुन डोळे बाजूला करुन डोळ्यांची काहीवेळा सतत उघडझाप करा. यामुळे डोळ्यांना ताण येणार नाही, तसेच डोळ्यातील द्रव्य टिकून राहण्यास मदत होईल आणि डोळे कोरडे होणार नाहीत. 

२. आजुबाजूला झाडे असतील तर स्क्रीनपासून डोळे बाजूला घेऊन काही वेळ नैसर्गिक हिरव्या रंगाकडे पाहा. त्यामुळे डोळ्यांना आलेला ताण निघून जाण्यास मदत होईल. 

३. दिवसातून किमान ४ ते ५ वेळा डोळे थंड पाण्याने धुवा. त्यामुळे डोळे कोरडे होणार नाहीत आणि डोळ्यांवर आलेला ताण निघून जाण्यास मदत होईल. 

४. डोळे बंद करुन एका बाजूने गोल फिरवा, त्यानंतर थोडावेळाने पुन्हा उलट्या बाजूने गोल फिरवा. असे ८ ते १० वेळा करा. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होईल.

५. स्क्रीनवर काम करताना ठराविक वेळाने डोळे बंद करुन हाताचे तळवे डोळ्यांवर ठेवा. त्यामुळे रिलॅक्स व्हायला मदत होईल. 

६. दोन्ही हात एकमेकांवर चोळा आणि त्यातून निर्माण झालेली उष्णता डोळ्यांना द्या. त्यामुळे बराच काळ स्क्रीनकडे पाहून डोळ्यांना थकवा आला असेल तर तो दूर होण्यास मदत होईल.

७. डोळे एकदा उजव्या आणि एकदा डाव्या बाजूला फिरवा. असे किमान ८ ते १० वेळा करा. त्यामुळे एकाच ठिकाणी पाहून डोळ्यांना ताण येत असेल तर तो येणार नाही. 

८. दर २० मिनीटांनी २० फूट दूर असलेली वस्तू २० सेकंदासाठी पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे एकसलग स्क्रीनकडे पाहिल्याने येणारा ताण जाण्यास मदत होईल. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सडोळ्यांची निगा