Join us   

पायांच्या भेगा कमी करायच्या? डॉक्टर सांगतात ४ सोपे उपाय – पाय राहतील कायम मुलायम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2024 9:12 AM

Easy Ayurveda home remedy for Cracked Heels : आरोग्याच्या दृष्टीने पायांच्या भेगा हे त्रासदायक प्रकरण असते तसेच भेगांमुळे सौंदर्यातही बाधा येते.

पायांना भेगा असणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. कोरडेपणा, अनुवंशिकता, उष्णता किंवा अन्य काही कारणांमुळे उद्भवणारी ही समस्या लवकर बरी होत नाही. भेगा पडलेले पाय दिसायला तर खराब दिसतातच पण त्या भेगांमध्ये माती गेल्याने किंवा त्यांची सालपटे निघाल्याने या भेगांची आगही होते. काही वेळा या भेगा इतक्या वाढतात की एखादं क्रिम लावलं किंवा काही घरगुती उपाय केले तरी यापासून आराम मिळत नाही (Easy Ayurveda home remedy for Cracked Heels). 

आरोग्याच्या दृष्टीने पायांच्या भेगा हे त्रासदायक प्रकरण असते तसेच भेगांमुळे सौंदर्यातही बाधा येते. या भेगा कमी करण्यासाठी नेमका काय उपाय करावा असा प्रश्न आपल्याला पडतो. थंडीच्या दिवसांत तर ही समस्या जास्त वाढत असल्याने त्यासाठी काही ना काही उपाय करावाच लागतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री यांनी टाचांना असणाऱ्या भेगांसाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा पाहूया...

(Image : Google)

१. स्नेह असलेल्या पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करावे. म्हणजे वात प्रकोप आणि त्यामुळे होणारा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. याचाच अर्थ कोरड्या गोष्टी कमी खाव्यात. तेल आणि तुपाचा आहारातील वापर वाढवावा. 

२. झोपण्याआधी न चुकता दुधात १ चमचा गाईचे तूप घालून प्यावे. त्यामुळे थंडी संपून उन्हाळा सुरू होताना ऋतूबदलाच्या काळात शरीराला स्निग्धता मिळण्यास मदत होते.

३. बेंबीमध्ये न चुकता २ थेंब एरंडेल तेल घालावे.यामुळेही शरीराचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. 

४. पाय कोमट पाण्यात स्वच्छ धुवावेत आणि मग ते कोरडे करुन तिळाच्या तेलाने तळपायांना मसाज करावा. झोपताना हा उपाय केल्यास पायमोजे घालून झोपावे. 

या सगळ्या उपायांनी शरीराच्या आतील स्निग्धता तर वाढेलच पण बाहेरुनही टाचांना मुलायमपणा मिळाल्याने भेगांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सघरगुती उपाय