Join us   

चमकदार, पांढरेशुभ्र दात हवेत? पिवळेपणा घालवण्यासाठी वापरा घरातल्याच 4 गोष्टी, हे घ्या उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 3:38 PM

दातांचे आणि तोंडाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वापरा हे घटक, बॅक्टेरीयल इन्फेक्शनपासून राहाल दूर

ठळक मुद्दे घरगुती पदार्थ वापरा आणि दातांचा पिवळेपणा घालवा मजबूत दातांसाठी घरच्या घरी करा हे उपाय, तोंडाचा वासही होईल दूर

आपली स्माईल हा आपला दागिना असतो असे आपण अनेकदा ऐकतो. पण ही स्माईल दिल्यावर दिसणारे आपले दात पिवळे असतील, आपल्या तोंडाला वास येत असेल किंवा दात सतत पडत असतील तर, दातांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे हे लक्षात घ्यायला हवे. आपले दात मजबूत आणि पांढरे शुभ्र असावेत यासाठी काही सोपे उपाय करण्याची आवश्यकता आहे. यामुळे दात दिसायला तर चांगले दिसतीलच पण दात मजबूत होण्यासही मदत होईल. पाहूयात घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय. सहज करता येणारे हे उपाय नियमित केल्यास त्याचा चांगला फायदा होईल. पाहूयात तोंडाचे आणि दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणत्या घटकांचा उपयोग होतो. 

तुळशीची पाने -

तुळस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते असे आपण नेहमी ऐकतो. तुळशीची दोन पाने दररोज खावीत असेही म्हटले जाते. उत्तम आरोग्यासाठी ज्याप्रमाणे तुळस उपयुक्त असते, त्याचप्रमाणे तोंडाचे आणि दातांचे आरोग्य चांगले राहावे यासाठीही तुळस फायदेशीर ठरते. तुळशीमध्ये असणाऱ्या अॅस्ट्रींजंट या घटकामुळे दात किडण्यापासून त्यांचा बचाव होतो. तसेच तोंडात खराब वास येत असेल तर तो जाण्यासही तुळशीचा फायदा होतो. 

हळद -

हळदीमध्ये असणारे अँटीबॅक्टेरीयल घटक एखादी जखम झाली की अतिशय उत्तम काम करतात. त्यामुळे आपण काहीही लागले की त्याठिकाणी पटकन हळद टाकतो. पण दातांच्या आणि तोंडाच्या आरोग्यासाठीही हळद तितकीच उपयुक्त असते हे आपल्याला माहित नसते. शास्त्रीय अभ्यासानुसार हळद ही पारंपरिक माऊथ वॉश म्हणून काम करते. तोंडाचा कर्करोग होऊ नये म्हणून अतिशय उपयुक्त असे गुणधर्म हळदीमध्ये असतात. 

तीळ -

तीळ दिसायला आकाराने लहान असतील तरी त्याचे आरोग्यासाठी अतिशय चांगले उपयोग असतात. थंडीच्या दिवसांत शरीरात उष्णता निर्माण करणारे तीळ दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तीळ चावून खाल्ल्यास दात स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच तीळत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मात्र दातांच्या फटीत तीळ अडकल्यास ते वेळच्या वेळी काढायला हवेत, नाहीतर ते तसेच राहून दात किडण्याची शक्यता असते. 

जायफळ -

मसाल्यातील हा महत्त्वाचा पदार्थ असून दात स्वच्छ होण्यासाठी आणि तोंडातील दुर्गंध दूर होण्यासाठी जायफळ अतिशय फायदेशीर ठरते. चिमूटभर जायफळ पावडर घेऊन ती दातांवर पेस्टप्रमाणे घासल्यास तोंडातील बॅक्टेरीया मरतात. यानंतर भरपूर चुळा भरा आणि नेहमीप्रमाणे पेस्टने दात घासा. 

दातांचे आणि तोंडाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वरील घटकांचा वापर करणे तसेच कमीत कमी साखर खाणे आवश्यक आहे. हे पदार्थ वापरले म्हणजे नियमित ब्रश करायचा नाही असे नाही. तर ब्रश करुन त्यासोबत या पदार्थांचा वापर करायचा. जेणेकरुन दात स्वच्छ राहण्यास आणि मजबूत होण्यास मदत होईल.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सदातांची काळजी