प्रत्येक घरात नाश्ता म्हटलं की कांदे पोहे हा कॉमन पदार्थ आहे. पोहे हा महाराष्ट्र आणि कर्नाटकी आहारातला एक महत्वाचा पदार्थ आहे. पोह्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. त्यात कांदे पोहे, दडपे पोहे, दही पोहे, दुध पोहे, बटाटे, पोहे, तर्री पोहे, मटार पोहे, पोह्यांचा चिवडा, पोह्यांचे कटलेट असे बरेच पदार्थ पोह्यांपासून बनवले जातात. कांदा पोह्याचा कार्यक्रम हा काही प्रमाणात कमी झाला असला तरी या पोह्यांना एक भावनिक मूल्य अजूनही आहे. प्रत्येक घरात कांदे पोहे बनवण्याची पद्धत वेगळी आहे. पोह्यांमधून शरीराला अनेक पौष्टीक घटक मिळतात. पोह्यात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे आढळतात. याशिवाय ग्लूटेनमुक्त आणि कार्बोहायड्रेट्सचा उत्तमस्त्रोत त्यातून मिळतो. मात्र, अधिक प्रमाणावर पोहे खाल्ल्याने त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरामध्ये वाढतात.
यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट आणि वैलनेस एक्सपर्ट वरूण कत्याल सांगतात, ''नाश्ता म्हटलं की अनेकांच्या घरात कांदे पोहे हे बनवले जातात. मात्र, त्यातील कार्बोहायड्रेट्स शरीरातील वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. पोहे हे सफेद तांदळापासून तयार केले जाते. हे एक ग्लाईसेमिक - इंडेक्स पदार्थ आहे. ज्यामुळे शरीरातील शुगर लेवल यासह वजन देखील वाढू शकते. पोहे बनवताना वापरण्यात येणारे तेल यासह इतर साहित्यांमुळे वजन वाढते. त्यामुळे दररोज पोह्यांचे अधिक प्रमाणावर सेवन करणे टाळावे.''
पोहे खाण्याचे दुष्परिणाम
लठ्ठपणा
पोहे हा उत्तम नाश्ता मानला गेला आहे. मात्र, नियमित पोहे खाल्ल्याने लठ्ठपणाची समस्या वाढू शकते. पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे. ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. याशिवाय पोहे बनवताना त्यात तेलाचे प्रमाण, यासह शेंगदाणे आणि बटाट्याचे देखील समावेश असतो. ज्यामुळे आपल्या शरीरात कॅलिरीजचे प्रमाण वाढते.
ब्लड शुगर लेवल वाढते
मधुमेहग्रस्त रुग्णांना तांदूळ न खाण्याचा सल्ला दिला जातो. तांदळापासून तयार पदार्थाचे सेवन केल्याने शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाण वाढते, आणि पोहे देखील तांदळापासून बनवले जाते. त्यामुळे मधुमेहग्रस्त रुग्णांनी पोह्याचे सेवन कमी करावे.
अॅसि़डिटी
अनेक लोकांना पोहे खाल्ल्याने अॅसि़डिटीची समस्या वाढते. पोहे खाल्ल्याने जास्त भूक लागत नाही. पोट भरलेले वाटते. त्यामुळे आपल्याला दिवसभर अॅसि़डिटीची समस्या उद्भवते.
लोह ओव्हरलोड
पोह्यात भरपूर प्रमाणावर लोह आढळते. अशा स्थितीत पोह्यांचे अतिसेवन केल्यास शरीरात लोहाची विषबाधा होऊ शकते. शरीरात लोहाचे प्रमाण जास्त वाढल्याने, व्यक्तीला उलट्या, डिहायड्रेशन, डायरिया सारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल.
पोहे कधी आणि किती प्रमाणात खावेत?
पोहे नेहमी मर्यादित प्रमाणात खावेत. पोहे जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होतात. जर तुम्हाला पोहे खायला आवडत असतील तर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा नाश्त्यात किंवा चहासोबत खाऊ शकता. पोहे खाताना एक वाटीपेक्षा जास्त पोहे खाऊ नयेत. वजन कमी करायचे असेल तर पोहे बनवताना शेंगदाणे किंवा बटाटे घालू नका.