Join us   

डायबिटीस आहे, तो ही ऐन तारुण्यात? या 6 चुका टाळा, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 3:35 PM

डायबिटीस असला म्हणून खूप घाबरून जायचे कारण नाही. तसेच खूप आरामात राहणेही योग्य नाही. योग्य ती काळजी घेऊन या समस्येसोबत जगता येऊ शकते

ठळक मुद्दे ऐन तारुण्यात डायबिटीस असेल तर वेळीच काळजी घ्यायला हवीकाही चुका या टाळण्यासारख्या असतात, त्याबाबत माहिती घ्यायोग्य आहार आणि नियोजन यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहू शकतो

डायबिटीस हा आता आजार राहीलेला नसून ती जीवनशैलीशी निगडित समस्या असल्याचे समोर येत आहे. २५ वर्षाच्या मुलामुलींमध्येही डायबिटीस होणाऱ्यांची संख्या मागील काही वर्षात वेगाने वाढत आहे. चुकीची जीवनशैली हे याचे मुख्य कारण असले तरी अनुवंशिकता, वाढलेले ताणतणाव, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या पद्धती, व्यायामाचा अभाव, व्यसनाधिनता यांसारख्या विविध कारणांनी डायबिटीस होणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ होत आहे. रक्तातील साखर नियंत्रणात आणणे आपल्याला वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. कारण यातील बहुतांश भाग हा आपल्या आहाराशी निगडित आहे. टाइप २ डायबिटीस असे या प्रकाराला ओळखले जाते. शरीराचा हळूहळू ताबा घेत एकएका अवयवावर परीणाम करणारी समस्या म्हणून या डायबिटीसला ओळखले जाते, म्हणूनच त्याला स्लो पॉयझनिंग असेही म्हणतात. त्यामुळे ऐन तारुण्यात तुम्ही या समस्येचे शिकार झाला असाल तर काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. टाइप २ डायबिटीस आटोक्यात राहावा आणि त्याने गंभीर रुप धारण करु नये म्हणून आवर्जून टाळायला हव्यात अशा चुका....

१. सतत आळसात असणे - आळशीपणा हे कोणत्याही आजारासाठी घातकच आहे. डायबिटीससाठी ही सर्वात घातक गोष्ट आहे. आळशीपणा हा केवळ लठ्ठपणाच नाही तर रक्तातील साखर वाढण्यासही कारणीभूत ठरतो. तर अॅक्टीव्ह असणे हे केवळ डायबिटीससाठी नाही तर इतरही अनेक गोष्टींसाठी फायदेशीर असते. त्यामुळे दररोज न चुकता व्यायाम करायलाच हवा. असे असले तरीही एकदम खूप जास्त व्यायामाने सुरुवात न करता हळूहळू व्यायाम सुरू करा, त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. 

२. स्निग्धता कमी असलेले आणि कार्बोहायड्रेटस जास्त असलेला आहार - इतर पोषक घटकांबरोबरच स्निग्ध पदार्थ हाही तुमच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. वजन कमी करण्याच्या नादात अनेक जण आहारातील स्निग्ध पदार्थ पूर्णपणे बंद करतात. त्यामुळे या लोकांच्या आहारातील चांगल्या स्निग्ध पदार्थांचीही कमतरता होते. त्यामुळे आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डायबिटीसच्या रुग्णांनी दाणे, बिया आणि शुद्ध तेलाच्या माध्यमातून चांगले स्निग्ध पदार्थ आहारात घ्यायला हवेत.

३. जास्त ताण घेणे - आरोग्यासाठी सध्याच्या स्थितीत सगळ्यात घातक गोष्ट कोणती असेल तर ती ताणतणाव ही आहे. स्पर्धेच्या युगात धावत असताना कौटुंबिक, करीयरविषयक, नातेसंबंधविषयक, सामाजिक अशा विविध स्तरावरील ताणांना तरुणांना सामोरे जावे लागत आहे. पण डायबिटीससाठी हा ताण अतिशय घातक असून त्याचे आरोग्यावर दूरगामी परिणाम होताना दिसतात. ताणामुळे रक्तातील साखरेची पातळी तर वाढतेच पण हृदयाशी संबंधित तक्रारीही उद्भवतात. 

४. पुरेशी झोप न घेणे - ७ ते ८ तासांती शांत झोप ही उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. झोपल्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन योग्य राहण्यास मदत होते. इन्शुलिन हाही एक हार्मोन असून डायबिटीसच्या रुग्णांनी पुरेशी झोप वेळच्या वेळी घेणे अत्यावश्यक आहे. 

५. दोन आहारांच्या मध्ये जास्त अंतर - तुम्हाला डायबिटीस असेल तर तुमच्या दोन खाण्यामध्ये योग्य अंतर असेल याकडे लक्ष द्या. दोन खाण्यांमध्ये दास्त अंतर असेल तर रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे डायबिटीस असलेल्यांना दर थोड्या वेळाने काही ना काही खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. दोन जेवणांच्यामध्ये तुम्हाला आहारात चालेल असे काही ना काही आवर्जून खायला हवे. 

६. फळे खाऊ नये - फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखर असते त्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांना फळे चालत नाहीत असा अनेकांचा समज असतो. पण आहारातून फळे पूर्णपणे वर्ज्य करणे किंवा खूप फळे खाणे दोन्हीही योग्य नाही. तर डायबिटीस असणाऱ्यांनी योग्य प्रमाणात फळे खाणे गरजेचे आहे. 

टॅग्स : मधुमेहआरोग्यहेल्थ टिप्स