डॉ. प्रीती कदम
कर्करोग एक शब्द, पण त्यामागे दडलेली वेदना, भीती आणि संघर्ष किती मोठा आहे, हे फक्त तो सहन करणाऱ्यालाच माहीत. जागतिक कर्करोग दिन हा दिवस केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर प्रत्येक रुग्णाला आणि त्यांच्या कुटुंबाला सांगण्यासाठी आहे की, तुम्ही एकटे नाहीत!
कर्करोग म्हणजे केवळ एक आजार नाही, हा केवळ शरीरावर होणारा परिणाम नाही, तर मनासह संपूर्ण आयुष्याला हादरवून सोडणारा प्रवास आहे. जेव्हा एखाद्याला कर्करोग झाल्याचे कळते, तेव्हा त्याचे जगच बदलून जाते. आशा आणि भीती यांचा संघर्ष सुरू होतो. प्रत्येक केमोथेरपीनंतर कमकुवत झालेलं शरीर, केस गळून गेलेलं डोकं, पण तरीही डोळ्यात आशेचा एक किरण दिसतो, मी यातून बाहेर पडणार !
कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत. पण सावधगिरी बाळगणे हा एकच पर्याय आहे. तंबाखू सोडणे, पौष्टिक खाणे, व्यायाम करणे, तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे यातून हा आजार टाळता येतो. समजा आजार झाल्यास लवकर उपचार सुरु होऊ शकतात.
आणि मुख्य ज्यांना कर्करोग झाला आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला इतर व्यक्ती चांगली मदत करु शकतात. कर्करोगासह जगणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार आणि सकारात्मकता द्यायला हवी. नकारात्मकता टाळून अशास्त्रीय माहितीपासून लांब राहायला हवं.
कर्करोगावरील उपचार दिवसेंदिवस सुधारत आहेत. अनेक रुग्ण यातून पूर्णपणे बरे होतात. गरज आहे ती वेळेत निदान आणि उपचारांची. म्हणून स्वत:ला किंवा इतरांना कर्करोगाची काही लक्षणे दिसली तर ती लपवू नका. लवकर निदान म्हणजे निम्मा विजय !
आपण एकमेकांना मदत करुन या आजारावर मात करु.