Join us   

उन्हाळ्यात डिहायड्रेशन वाढवणारे 5 पदार्थ, तुम्ही खात तर नाही-उन्हाचा त्रास वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 4:53 PM

शरीरातील आर्द्रता कमी करणारे घटक आपल्याही नकळत आपण खात असतो. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत संतुलन बिघडण्याची शक्यता जास्त असते.

ठळक मुद्दे उन्हाळ्याच्या दिवसांत डीहायड्रेशन झाले तर त्रास होऊ शकतो, तसे होऊ नये यासाठी महत्त्वाच्या गोष्टी...साखर, मीठ, तेल या पदार्थांमुळे डिहायड्रेशन होत असल्याने शक्यतो विकतचे पदार्थ टाळलेलेच बरे

उन्हाळ्यात हवामानातील तापमानाचा पारा वाढत असल्याने शरीराला जास्तीत जास्त पाण्याची आवश्यकता असते. या काळात फारशी भूक लागत नाही, पण सतत पाणी पाणी होते आणि शरीरातील पाण्याची पातळी चांगली ठेवण्यासाठी आपण सतत द्रव पदार्थांचे सेवन करतो. पाण्याबरोबरच कलिंगड, खरबूज यांसारखी फळे तर कधी काकडी किंवा सरबते घेतली जातात. शरीर हवामानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली राखणे आवश्यक असते. पण अनेकदा आपल्याला पाणी प्यायचे लक्षात राहत नाही आणि त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. डिहायड्रेशन झाल्यास डोकेदुखी, अशक्तपणा, गरगरल्यासारखे होणे, थकवा येणे अशा समस्या उद्भवू शकतात. आहारातील काही पदार्थ डिहायड़्रेशनसाठी कारणीभूत ठरतात. शरीरातील आर्द्रता शोषून घेण्याचे काम या पदार्थांपासून केले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत डिहायड्रेशन होतील असे पदार्थ आवर्जून टाळायला हवेत, पाहूयात हे पदार्थ कोणते...

(Image : Google)

१. कॅफिन असलेले पदार्थ

कॉफी किंवा काही एनर्जी ड्रींक यामध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असते. तसेच या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाणही जास्त असण्याची शक्यता असते. अनेकदा उन्हाने लाहीलाही झाल्याने आपण कोल्डकॉफी किंवा एनर्जी ड्रींक घेतो. पण या गोष्टींचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यास आपल्याला डीहायड्रेशनचा धोका उद्भवू शकतो. 

२. प्रोटीन पॅक फूड 

आपण अनेकदा शरीराची प्रोटीनची गरज पूर्ण व्हावी यासाठी प्रोटीन पावडर, प्रोटीन बार अशा गोष्टींचा आहारात समावेश करतो. मात्र या पदार्थांमुळेही डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे यातून शरीराला प्रोटीन मिळत असले तरी ते किती प्रमाणात घ्यायचे याचे गणित असायला हवे. 

३. फ्रोजन आणि प्रोसेस्ड फूड 

अन्नपदार्थ जास्तीत जास्त टिकावेत यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मीठ, साखर किंवा इतर प्रीझर्व्हेटीव्हजचा वापर केला जातो. मात्र या पदार्थांमुळे शरीर डीहायड्रेट होत असल्याचे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून असे पदार्थ एका मर्यादेपर्यंत खाल्लेले ठिक आहे. पण ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो. 

(Image : Google)

४. सोया सॉस

भारताच्या बऱ्याच भागात सोया सॉस अतिशय आवडीने खाल्ला जातो. विविध पदार्थांना चव येण्यासाठी या सॉसचा वापर केला जातो. या सॉसमुळे पदार्थाला चव येत असली तरी सोया सॉसमध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असल्याने ते डीहायड्रेशनसाठी कारणीभूत ठरते. 

५. तळलेले पदार्थ 

आपल्याला तळलेले अन्नपदार्थ खायला मनापासून आवडते. हे पदार्थ जीभेला चांगले लागत असले तरी ते आरोग्यासाठी घातक असतात हे आपल्याला माहित आहे. तळलेल्या पदार्थांमध्ये तेल, फॅटस आणि सोडीयमचे प्रमाण जास्त असल्याने हे पदार्थ प्रमाणाबाहेर खाल्ल्यास डीहायड्रेशन होते. त्यामुळे हे पदार्थ टाळलेलेच केव्हाही चांगले. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स