वैद्य विनीता बेंडाळे
‘अनपत्यता’ किंवा ‘वंध्यत्व’ याच्या वाढत्या प्रमाणामुळे भारतात आणि जागतिक स्तरावरवरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.मूल होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतानाही दिवस रहात नाहीत यास अनपत्यता असे संबोधले जात असले, तरी किती काळ प्रयत्न केल्यानंतर यश न आल्यास अनपत्यता आहे असे म्हणता येऊ शकेल असा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होऊ शकतो. एक वर्षभर दर महिन्याला ‘ योग्य काळामधे’ प्रयत्न करूनही गर्भधारणा होऊ शकली नाही, तर अनपत्यता आहे असे निदान करता येते. अनपत्यतेची कारणे, निदानासाठी केल्या जाणाऱ्या विविध तपासण्या, चिकित्सेचे निरनिराळे पर्याय या सगळ्या गोष्टी संबोधित करण्यापूर्वी, मुळात स्वाभाविकपणे गर्भधारणा हेण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याचा विचार करणे महत्वाचे ठरेल. नैसर्गिक रित्या गर्भधारणा होताना योनिमार्गातून पुरुष बीजाचा ( sperm) प्रवेश होऊन गर्भाशयनलिकेमधील स्त्री बीजाशी (Ovum) त्याचा संयोग झाल्यानंतर गर्भनिर्मिती होते. त्यानंतर साधारणपणे आठवडाभराच्या काळामधे, हा तयार झालेला गर्भ (Zygote) गर्भाशय नलिकेमधून प्रवास करून गर्भाशयामधे पोहोचतो आणि त्याच्या पोषणासाठी तयार असलेल्या गर्भशय्येमधे (Endometrium) हा गर्भ रुजतो. इथून पुढे या गर्भाची मासानुमासिक वाढ होत जाते आणि गर्भधारणेचा काळ पूर्ण झाल्यानंतर बाळाचा जन्म होतो. हीच प्रक्रिया आयुर्वेदामधे एका सामान्य, परंतु अत्यंत व्यावहारिक उदाहरणाच्या मदतीने स्पष्ट केली आहे. शेतकरी ज्यावेळेस एखादे धान्य पिकवतो त्यावेळेस त्याला निरनिराळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून योजना करावी लागते. अगदी आपल्या घराच्या गच्चीमधे कुंडीमधे एखादं बी पेरलं, तरी त्यापासून अंकुर उगवण्यासाठी काही गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं. एक महत्वाची गोष्ट म्हणजे ‘बी’ . अंकुर निर्मिती होण्यासाठी बीज सकस असणे ही अनिवार्य गोष्ट आहे. बीज निकृष्ट दर्जाचं असेल, काही रोग लागलेलं असेल, तर त्यापासून अंकुर निर्मिती होऊ शकत नाही. बीज अत्यंत उच्च दर्जाचे असेल, परंतु ज्यामधे ते रुजणं अपेक्षित आहे त्या जमिनीची मशागत व्यवस्थित केलेली नसेल, तरीही ते बीज रुजण्यामधे अडचण येऊ शकते. बीजाची प्रत उत्तम आहे, जमिनीची मशागत अगदी काळजीपूर्वक केली आहे, पण बीजापासून अंकुर निर्मितीसाठीचा जो एक मुख्य आधार ‘ पाणी’ , हे पाणीच मिळाले नाही, किंवा योग्य प्रमाणात मिळाले नाही, तरीही अंकुर निर्मिती होऊ शकत नाही.
ऋतू , क्षेत्र, अंबू, बीज या चार घटकांच्या मदतीने गर्भधारणेचा विचार आयुर्वेदामधे केला आहे. वरकरणी दिसताना हे घटक जरी चारंच दिसले , तरी व्यवहारामधे आढळून येणारी निरनिराळी कारणे- स्त्री बीज निर्मिती न होणे (Anovulation) , PCOS, Fallopian tube blockages, Hormonal imbalance, Thyroid dysfunction आणि इतरही अनेक गोष्टी ज्या वंध्यत्वाशी निगडीत आहेत- त्यांचा अंतर्भाव या चार घटकांमधे होतो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, त्यादृष्टीने निदान आणि चिकित्सा योजना केल्यावर त्याचे योग्य फळही मिळताना दिसते. या सर्व माहितीमधे एक मुद्दा आवर्जून लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे निसर्गातील अगदी दैनंदिन जीवनातील उदाहरणावरून गर्भधारणेची प्रक्रिया आयुर्वेदामधे समजावली आहे. मनुष्य हा निसर्गाचाच अविभाज्य घटक आहे आणि या गोष्टीचा विसर पडल्यामुळे ज्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यापैकी अनपत्यता ही एक होय. (लेखिका आयुर्वेद आणि वंध्यत्व उपचार तज्ज्ञ आहेत. ‘द्युम्ना वुमेन्स क्लिनिक’, रसायू क्लिनिक, पुणे) ०२० २५४६५८८६, www.dyumnawomensclinic.com