Join us   

Sexual Health : कोरोनामुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम? नपुंसकतेची भीती बागळण्याआधी वाचा तज्ज्ञ काय सांगतात....

By manali.bagul | Published: January 19, 2022 5:58 PM

Sexual Health : कोरोनामुळे नपुंसकता येते का किंवा प्रजनन क्षमतेववर गंभीर परिणाम होतो का, याबाबत अजूनही काही देशात संशोधनं सुरू आहेत. 

कोरोना व्हायरसचा नवा वेरिएंट ओमायक्रॉननं कहर केलाय. (Omicrom Varient) कोरोना संक्रमणानंतर थकवा, नैराश्य, अशक्तपणा, विशिष्ट अवयवांची दुखणी वाढण्याची अनेक प्रकरणं समोर आली. या व्हायरसच्या संक्रमणातून व्यक्ती बाहेर आल्यानंतर प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का? असा प्रश्न अनेकांना पडलाय. कोरोनामुळे प्रजनन क्षमतेवर होत असलेल्या परिणामांबाबत अनेकांच्या मनात गैरसमजही आहेत. (Research report say corona effect on sperm count and motility)

काय आहे रिसर्च? 

फर्टिलिटी अँड स्टेरिलिटी जर्नलच्या अभ्यासात जवळपास ३५ वर्ष वयाच्या १२० पुरुषांचे नमुने घेण्यात आले होते. हे सर्व लोक करोनातून बरे होऊन कमीत कमी १ आठवडा आणि जास्तीत जास्त २ महिने झाले होते. यातून समोर आलेल्या रिपोर्टनुसार कोरोनामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या (Sperm count) तर कमी होतेच, पण याशिवाय शुक्राणूंच्या गुणवत्तेवरही (Sperm Motility) परिणाम होतो. कोरोनामुळे नपुंसकता येते का किंवा प्रजनन क्षमतेववर गंभीर परिणाम होतो का, याबाबत अजूनही काही देशात संशोधनं सुरू आहेत. 

डॉक्टरांचा सल्ला

लैगिंक विकार तज्ज्ञ डॉ. राजन भोसले सांगतात की, ''जेव्हा आजार निर्माण करणारा एखादा व्हायरस शरीरात प्रवेश करतो. त्यावेळी शरीरातील इतर अवयवांचे नुकसान होण्याची शक्यता असते. उदा,  (mumps) गालगुंड हा आजार झाल्यानंतर या व्हायरसचा पुरूषांच्या अंडाशयांवरही (testicles) परिणाम होतो.  बहुतेक रुग्णांना (Infertility) वंध्यत्वाची समस्या उद्भवते. म्हणजेच स्पर्म काऊंट कमी होतो. साधारणपणे गालगुंड झाल्यास गालांना म्हणजेच लाळग्रंथीमध्ये सूज येते. तरीही त्याचा अंडाशयांवर परिणाम होतो. 

 इतर व्हायरसच्या बाबतीतही असं क्वचित पाहायला मिळू शकतं. एखाद्या व्हायरसच्या संक्रमणाचा नाक, घसा,  फुफ्फुसं, किडनीवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे पुरूषांच्या अंडाशयावरही परिणाम होण्याची शक्यता असते. सध्या विविध स्तरांवर कोरोनाच्या परिणामांबाबत संशोधन सुरू आहे. आंतराराष्ट्रीय स्तरावरील संपूर्ण रिसर्च रिपोर्ट्समध्ये याचा खुलासा झाल्याशिवाय कोरोना व्हायरसचा थेट प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो, असं म्हणता येणार नाही.'' 

मुलांसाठी नियोजन करणाऱ्या जोडप्यांसाठी सल्ला 

डॉ. भोसले यांच्या म्हणण्यानुसार ''जर कोरोना होऊन गेला असेल तर साधारणपणे ३ महिने थांबून लस घेण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे कोरोना संक्रमण झालं असेल तर तीन महिने  थांबून डॉक्टरांच्या सल्ल्यानं  गर्भधारणेबाबत निर्णय घ्यावा.  त्यामुळे पुरूषांनी भीती बागळण्याचं काहीही कारण नाही.  कोरोना संक्रमणानंतर तुम्हाला प्रजनन क्षमतेबाबत शंका येत असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वीर्य तपासणी करून घ्या. जर त्यात दोष आढळले तर योग्य उपचार घेऊन समस्या सोडवली जाऊ शकते. ''

टॅग्स : हेल्थ टिप्सलैंगिक आरोग्यआरोग्यकोरोना वायरस बातम्याओमायक्रॉन