Join us   

Pcos Symptoms : PCOS मुळे महिलांना कमी वयातच येऊ शकतं वंध्यत्व; समजून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 12:49 PM

हा घटक मानवी रक्तातील लिपिड्समध्ये असंतुलन होण्यास कारणीभूत ठरतो. एका संशोधनामध्ये पीसीओएसने ग्रस्त ७० टक्क्यांहून जास्त महिलांना डीस्लीपिडेमिया असल्याचे आढळून आले होते.

भारतामध्ये दर पाचपैकी एका महिलेला पीसीओएस किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीयन सिंड्रोम असतो. ही एक सामान्य मेटॅबोलिक आणि एंडोक्राइन स्थिती आहे जी महिलांच्या प्रजननक्षम वयामध्ये उत्पन्न होते. यामध्ये ओव्हरीज महिलेच्या शरीरामध्ये पुरुष लिंग हार्मोन्स अति प्रमाणात निर्माण करतात.  पीसीओ म्हणजे वेगवेगळ्या सिस्ट्स ज्या हे हार्मोन्स निर्माण झाल्यामुळे ओव्हरीजमध्ये तयार होतात. पीसीओएस ओळखू येण्यासाठी हायपरअँड्रोजेनिजम (अँड्रोजेन्सची पातळी वाढलेली असणे), मासिक पाळीतील अनियमितता आणि पॉलिसिस्टिक ओव्हरीयन मॉर्फोलॉजी यांची मदत होते. (Polycystic ovary syndrome PCOS Symptoms and causes)

सर्वसामान्यतः पीसीओएसचा संबंध मासिक पाळीतील अनियमितता आणि मूल होण्यात येणाऱ्या अडचणींशी लावला जातो पण पीसीओएस असलेल्या महिलांना भविष्यात इतरही सहव्याधी उत्पन्न होण्याची शक्यता खूप जास्त असते, ज्यामुळे त्या महिलेचे आरोग्य कायमस्वरूपी बदलून जाऊ शकते. डॉ. बंदिता सिन्हा, कन्सल्टन्ट, ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजी (कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई) यांनी  लोकमत सखीशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

पीसीओएसवर उपचार न केले गेल्यास फक्त वंध्यत्वच नव्हे तर शरीराच्या इतर अनेक भागांवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. पीसीओएसचा धोका वाढल्याने निर्माण होणाऱ्या सहव्याधींमध्ये जेस्टेशनल डायबिटीस, टाईप २ चा डायबिटीस मेलिटस (T2D), हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, गरोदरपणाशी संबंधित समस्या, व्हेनस थ्रोम्बोएम्बोलिजम, ग्लुकोज टॉलरन्समध्ये बिघाड (IGT), त्वचेमध्ये बदल, एन्डोमेट्रियल कॅन्सर आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या यांचा समावेश आहे. हा विकार उत्पन्न होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये स्थूलपणाचा प्रामुख्याने समावेश असतो, आपल्या हृदयाच्या व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होतो. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये आढळून येणारा हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजाराचा धोका उत्पन्न करणारा घटक म्हणजे डीस्लीपिडेमिया.

हा घटक मानवी रक्तातील लिपिड्समध्ये असंतुलन होण्यास कारणीभूत ठरतो. एका संशोधनामध्ये पीसीओएसने ग्रस्त ७० टक्क्यांहून जास्त महिलांना डीस्लीपिडेमिया असल्याचे आढळून आले होते. पीसीओएसचे गांभीर्य कमी-जास्त असण्यामध्ये आहार व व्यायाम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात हे जरी खरे असले तरी खानपानाच्या सवयी किंवा जेनेटिक संवेदनक्षमता यासारखे घटक देखील या आजाराचा धोका वाढवू शकतात. हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होण्याबरोबरीनेच पीसीओएसमुळे उत्पन्न होणाऱ्या इतर सहव्याधींमध्ये गरोदरपण आणि प्रसूती यांच्याशी संबंधित समस्यांचा देखील समावेश असतो.

पीसीओएस असलेल्या महिलांना हायपरअँड्रोजेनिजम आणि गरोदरपणात बीएमआय वाढण्याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे खूप गंभीर गुंतागुंत होऊ शकते. गरोदरपणात रक्तदाब खूप जास्त वाढणे अर्थात प्रीक्लॅम्पसिया हा देखील पीसीओएसमुळे उत्पन्न होणारा सहविकार आहे, आई व बाळ या दोघांनाही याचा खूप त्रास होऊ शकतो. याखेरीज जेस्टेशनल डायबिटीस, गरोदरपणामध्ये होणारे हायपरटेन्शन आणि काही केसेसमध्ये गर्भपाताला देखील पीसीओएसची समस्या कारणीभूत ठरू शकते. 

पीसीओएसमुळे एन्डोमेट्रियम दीर्घकाळपर्यंत एस्ट्रोजेनच्या संपर्कात येण्याचे प्रमाण वाढते. ओव्ह्युलेशन एन्डोमेट्रियल हायपरप्लासिया आणि एन्डोमेट्रियल कॅन्सरमुळे हे होते.  या विकारामुळे लो-ग्रेड क्रोनिक इन्फ्लेमेशन देखील होते आणि पीसीओएसग्रस्त महिलांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा (अल्कोहोलचे सेवन न करणाऱ्या व्यक्तींना होणारा यकृतामध्ये चरबी वाढण्याचा आजार) त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मेटॅबोलिक सिंड्रोम, इन्श्युलिन रेसिस्टन्स आणि टाईप २ डायबिटीस या पीसीओएसमुळे होणाऱ्या सहव्याधी आहेत आणि त्या देखील पित्ताशयाचे आजार होण्याशी संबंधित आहेत. 

पीसीओएसवर उपचार न घेतल्यास अनेक वेगवेगळ्या सहव्याधी होऊ शकतात व गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. पण या सिंड्रोमला प्रतिबंध घातल्यास आणि त्यावर उपचार करवून घेतल्यास निरोगी जीवन जगता येते. आरोग्य तपासण्या नियमितपणे करवून घेणे, शरीराचे वजन नियमितपणे योग्य प्रमाणात राखणे हे पीसीओएसला प्रतिबंध घालण्याचे तसेच त्यावरील उपचारांचे दोन प्रभावी उपाय आहेत. पीसीओएस आणि त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या सहव्याधी होऊ नयेत यासाठी स्थूल किशोरवयीन मुली व पीसीओएसग्रस्त महिलांनी ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्नियासारखे त्रास होत असल्यास अल्ट्रासोनोग्राफी तपासणी करवून घेतली पाहिजे. अधिक गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी योग्य उपचार घेतले पाहिजेत.

वेळीच उपचार करवून न घेतल्यास व्यक्तीच्या मनोवृत्तींवर, दैनंदिन कामकाजावर पीसीओएसचा खूप गंभीर परिणाम होऊ शकतो. भविष्यात या आजाराचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. दुर्लक्षित पीसीओएसचे शरीरावर किती दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात याची जाणीव रुग्णांना करवून देणे ही आम्हा डॉक्टरांची जबाबदारी आहे. संतुलित आहार व व्यायाम यांच्यासह निरोगी जीवनशैली हा प्रतिबंधात्मक उपाय आहे आणि आज जगभरातील महिलांना ज्याने ग्रासले आहे त्या पीसीओएसच्या आजाराविरोधात लढा देण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरू शकते.

 

टॅग्स : लैंगिक आरोग्यलैंगिक जीवनहेल्थ टिप्सपीसीओएस