Join us   

नवरात्र स्पेशल आरोग्य उपासना : मूल होत नाही याचे टेन्शन? गर्भधारणेच्या उपचारांमध्ये होणारी गडबड? काय करायचं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2022 12:32 PM

Navratri Special Health Misconceptions about Infertility : वंध्यत्वाची समस्या असलेल्या जोडप्यांना उपचारांमध्ये येणाऱ्या समस्या आणि पेशंटकडून अनावधानाने होणाऱ्या चुका यांविषयी..

ठळक मुद्दे जोडप्यांनी मानसिक ताण कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, ध्यान, दोघांनीच बाहेर फिरायला जाणे, छंद जोपासणे या गोष्टी जरुर कराव्यात.घरचे लोक, नातेवाईक, इतकंच नव्हे तर आपल्या समाजात शेजारी-पाजारी आणि बाहेरचे लोकही या जोडप्यांना सतत नको ते प्रश्न विचारतात.

डॉ. शिल्पा चिटणीस जोशी

लग्नानंतर मूल होणे या गोष्टीला आपल्याकडे आजही अतिशय महत्त्व आहे. 'एक तरी होऊन जाऊदे' अशा आशयाची वाक्य नवीन लग्न झालेल्यांच्या घरात अगदी सहज कानावर पडतात. करीयर, एकमेकांना वेळ देणे, जबाबदारी नको असणे किंवा अन्य काही कारणांनी मूल होऊ देण्यास उशीर केला जातो. सुरुवातीला या सगळ्या गोष्टी बरोबर वाटत असल्या तरी नंतर मात्र कितीही प्रयत्न केला तरी मूल होत नाही. मग त्यामुळे येणारे नैराश्य, सामाजिक कुचंबणा, घरातून केली जाणारी विचारणा आणि त्यात आपले आरोग्य या सगळ्यामुळे महिला काही वेळा त्रासून गेलेली दिसते. सरतेशेवटी डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेण्याचा निर्णय होतो आणि मग वंध्यत्वावरील उपचार सुरू होतात. मात्र वंध्यत्वाचे उपचार हे वेळखाऊ असतातच. स्त्रीमध्ये स्त्रीबीज तयार होणे, ते गर्भनलिकेत पोहोचणे, शुक्राणुंशी त्याचे फलन, गर्भ तयार होऊन तो गर्भाशयात रुजणे हे सर्व योगायोग एकावेळी जुळून यावे लागतात. वंध्यत्वाची समस्या असलेल्या जोडप्यांमध्ये या सर्व गोष्टींची सांगड घडवून आणावी लागते. या उपचारांमध्ये येणाऱ्या समस्या आणि पेशंटकडून अनावधानाने होणाऱ्या चुका यांविषयी (Navratri Special Health Misconceptions about Infertility)...

(Image : Google)

१) स्त्रीरोग तज्ञांकडे वेळेवर जाणे गरजेचे आहे. वयाची तिशी पूर्ण होण्याआधी प्रेग्नन्सी प्लॅन करणे उत्तम. बऱ्याच वेळा वंध्यत्वाची समस्या असलेल्या जोडप्यांमध्ये लैंगिक समस्या आढळतात. अकारण संकोचामुळे लग्नानंतरची बरीच वर्ष ही जोडपी वैद्यकीय सल्ला घेत नाहीत. शेवटी आता मूल हवे म्हणून ते नाईलाजाने स्त्रीरोग तज्ञांकडे येतात, मात्र तोवर बराच उशीर झालेला असतो, त्यामुळे वेळेवर उपचार घेणे महत्वाचे.

२) वंध्यत्वाच्या उपचारांमध्ये स्त्रीरोगतज्ञांनी सांगितलेल्या दिवशी तपासणीला येणे अत्यंत आवश्यक आहे. हे दिवस आणि वेळ न पाळल्यास उपचारांना यश मिळत नाही. बऱ्याच तपासण्या मासिक चक्राच्या विशिष्ट दिवशी करायच्या असतात. अशावेळी बाकीची कामे बाजूला ठेवावीत. नवरा बायको दोघांनीही स्त्रीरोगतज्ञांनी सांगितल्याप्रमाणे उपचारांसाठी वेळ देणे अत्यावश्यक आहे.

३) कायम आढळणारी एक समस्या म्हणजे जोडप्यामधील पुरुषांची तपासण्या करण्यासाठीची टाळाटाळ. वंध्यत्वाच्या समस्येमध्ये ५० % दोष हा पुरुषांमध्ये असू शकतो हे मान्य करायची बऱ्याच पुरुषांची तयारी नसते. बऱ्याच वेळा महिनोंमहिने फक्त स्त्रीचा उपचार चालू राहतात आणि आम्ही कितीही वेळा सांगितले तरी पुरुष तपासण्या करून घेत नाहीत. दुसरीकडे मूल होत नाही म्हणून सासरचे टोमणेही स्त्रीला खावे लागतात. तसेच पुरुषामध्ये दोष असेल तर तो लपवला जातो आणि स्त्रीलाच दोषी धरले जाते. ह्या सगळ्यात त्या स्त्रीची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’अशी होते. हे चित्र नक्कीच बदलायला हवं. यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने योग्य ती भूमिका घ्यायला हवी.

(Image : Google)

४) वंध्यत्वाचे उपचार हे थोडेफार खर्चिक असतातच. ह्यासाठी लागणारी वेगवेगळी औषधे, होर्मोन्सची इंजेक्शन्स या गोष्टींना जास्त खर्च येऊ शकतो. काही वेळा थोडा जास्त खर्च करून वापरलेली औषधे लवकर रिझल्ट देतात आणि त्यामुळे पेशंटचा पुढचा खर्च वाचतो. याकरता थोडी खर्चाची तरतूद करायला हरकत नाही. काही वेळा वंध्यत्वासाठी IVF (टेस्ट ट्युब बेबी) ची वेळ येते तेव्हा खर्च चांगलाच वाढू शकतो पण एखादी कार घेण्यासाठी आपण छोटे कर्ज घेऊ शकतो तर ज्या उपचारांमुळे आपल्याला बाळ मिळणार आहे त्या उपचारांसाठी का घेऊ नये? पटतोय का हा विचार?

५) सर्वात महत्वाचं म्हणजे वंध्यत्वाची समस्या असणारी जोडपी प्रचंड मानसिक दडपणाखाली असतात. घरचे लोक, नातेवाईक, इतकंच नव्हे तर आपल्या समाजात शेजारी-पाजारी आणि बाहेरचे लोकही या जोडप्यांना सतत नको ते प्रश्न विचारतात. बऱ्याच वेळा या अतिमानासिक ताणामुळे उपचारांचा योग्य तो परिणाम दिसत नाही. कधी कधी पुरुषांवर या गोष्टींचा इतका ताण येतो की त्यांना लैंगिक समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या जोडप्यांना खंबीर मानसिक आधार देणे हे कुटुंबियांचे आणि आप्तेष्टांचे कर्तव्य आहे.  या जोडप्यांनी मानसिक ताण कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, ध्यान, दोघांनीच बाहेर फिरायला जाणे, छंद जोपासणे या गोष्टी जरुर कराव्यात.

(उद्या बोलू दुसऱ्या एका गैरसमजाविषयी)

(लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सप्रेग्नंसी