Join us

पुरुषांमधील वाढते वंध्यत्वाचे प्रमाण हे चिंतेचं कारण, काय असतात पुरुष वंध्यत्वाची कारणं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 13:29 IST

पुरुषबिजांची संख्या आणि प्रत खालवणं, ते जीवनशैली, काही जेनेटिक डिसऑर्डी यामुळे पुरुषांनाही वंध्यत्वाची समस्या भेडसावत आहे, त्यावरही वेळीच आणि योग्य विचार व्हायला हवेत..

ठळक मुद्दे काही औषधांच्या दुष्परिणामांमुळेही पुरुष वंध्यत्व निर्माण होऊ शकतं तसेच काही जन्मजात कारणे - जेनेटिक डिसऑर्डरसुद्धा पुरुष वंध्यत्वाला कारणीभूत ठरतात.पुरुष वंध्यत्व ही समस्याही गंभीर आहे.

वैद्य विनीता बेंडाळे

गेल्या चाळीस वर्षांमधे संपूर्ण जगभरामधील पुरुषांमधे पुरुषबीजांची संख्या ही खालावत गेली आहे अशी माहिती काही शोध प्रकल्पांनुसार उपलब्ध आहे. भारतामधे हे प्रमाण साधारणत: ५०% नी खालावले आहे. केवळ संख्यात्मकरित्याच ही अधोगती नसून पुरुष बीजांची प्रतही खालावत गेली आहे. पुरुष वंध्यत्वाच्या कारणांमधील प्रमुख कारणांमधे यांचा समावेश होतो. पुरुष बीजांची संख्या,त्यांची गती तसेच त्यांची रचना या तिन्ही गोष्टी गर्भधारणा राहण्याच्या दृष्टिने महत्त्वाच्या असतात. स्त्रीबीजनिर्मितीच्या काळामधे संबंध आल्यानंतर लाखों पुरुष बीजांचा प्रवेश हा योनिमार्गामध्ये होतो. तेथून पुरुष बीज हे गर्भाशयनलिकेमधील स्त्रीबीजापर्यंत (ovum) पोचल्यानंतर गर्मनिर्मिती होते. ही घटना अशा प्रकारे वाचताना जरी इतकी सरळ, सोपी भासत असली, तरी त्या पुरुष बीजांना योनिमार्गातून गर्भाशय नलिकेमधील स्त्रीबीजापर्यंत पोहोचणे हे एक प्रकारे आव्हान असते.

 

पुरुष बीजांचा योनिमार्गामध्ये प्रवेश झाल्यानंतर गर्भाशयनलिकेमधील स्त्रीबीजापर्यंत पोचण्यासाठी त्यंची शर्यत सुरु होते. अतिशय वेगाने ते आपला 'end goal' गाठण्यासाठी प्रवास सुरू करतात. असे करत असताना निरनिराळ्या अडथळ्यांमधून वाट काढत ही शर्यंत पूर्ण करायची असते. योनि मार्गामधील (Vagina) स्वाभाविक स्राव हे शरीराच्या संरक्षणासाठी - संसर्ग रेगांपासून (Infections) संरक्षणासाठी स्वाभाविकच काही प्रमाणात ‘acidic’असतात. पुरुष बीजांच्या दृष्टिने मात्र ‘alkaline’ वातावरण अनुकूल असते. त्यामुळे काही प्रमाणात या शर्यतीमधील पहिल्याच टप्पयामधे पुरुष बीजांचा नाश होऊ शकतो. चांगली गती असणारे पुरुषबीज हे यशस्वीरित्या योनिमार्गामधून दुसऱ्या टप्प्यापर्यंत म्हणजे गर्भाशयमुखापर्यंत पोहोचतात. स्त्रीबीजनिर्मितीच्या काळामधे गर्भाशय मुखप्रदेशातील स्राव हे पुरुषबीजांचा प्रवेश सुकर होण्याच्या दृष्टिने अनुकूल असेच असतात. काही वेळा गर्भाशय मुखाचे काही आजार, संसर्गरोग यामुळे हे स्राव पुरुष बीजांना प्रतिकूल होऊ शकतात. इथून पुढचा टप्पा म्हणजे गर्भाशयाच्या आतील पोकळी. इथे पोहोचल्यानंतर स्त्रीबीज निर्मिती झालेल्या किंवा होणं अपेक्षित असणाऱ्या योग्य गर्भाशय नलिकेकडे हा पुरुष बीजांचा मोर्चा वळणं अपेक्षित असतं. संपूर्णतः तसं न होता काही प्रमाणात पुरुष बीज तिथे वळतात. काहींचा मार्ग चुकतो. याव्यतिरिक्त संसर्ग रोगांमुळे (infections) गर्भाशयातील स्त्राव पुरुष बीजांना प्रतिकूल असणं, काही वेळा पुरुषबीजाला प्रतिकूल पेशींचं अस्तित्व असणं, या गोष्टींमुळे योग्य गर्भाशयनलिकेपर्यंत पोहोचणाऱ्या पुरुषबीजांची संख्या आणखीन खालावू शकते. या शर्यतीमधील शेवटच्या टप्प्यात म्गहणजे योग्य गर्भाशयनलिकेमधे जेव्हा पुरुष बीज पोचतात, तेव्हा त्यांची संख्या ही लाखांवरून शेकड्यांपर्यंत कमी झालेली असते. योग्य गर्भाशयनलिकेमध्ये पोचल्यानंतरही तेथील स्त्रीबीजापर्यंतचं मर्गक्रमण होणं अपेक्षित असतं. अंततः स्त्रीबीजापर्यंत पोचल्यावर पुरुषबीजाच्या शिरोभागामधे काही प्रक्रिया घडून येतात ज्यामुळे स्त्रीबीजाभोवती असणारे कवच भेदून स्त्रीबीजाशी हे पुरुषबीज संलग्न होऊन गर्भनिर्मिती होत असते. या सगळ्या विवेचनावरून पुरुष बीजांची संख्या, गती, प्राकृत रचना या सगळ्या गोष्टींचं महत्व लक्षात येतं. पुरुष वंधत्वाच्या दृष्टिने ही कारणे महत्त्वाची निश्चितच आहेत. पण त्याव्यतिरिक्तही कारणांचा विचार आवश्यक असतो. पुरुष बीज वाहून नेणाऱ्या मार्गपथामधे विविध कारणांमुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळेला पुरुष बीज निर्मितीची प्रक्रिया उत्तम असली, तरी स्वाभाविकरित्या गर्भधारणा होण्याला अडचण निर्माण होते.

 

शारीरिक संबंध येताना पुरुषांना येणाऱ्या अडचणी किंवा त्या प्रक्रीयेमधे येणारे काही दोष हे पुरुष वंध्यत्वाचे महत्त्वाचे कारण आहेच. शारीरीक तसेच मानसिक स्तरावरील कारणे याला जबाबदार असू शकतात.   ‘Varicocele’ हा पुरुषांच्या अंडकोषांचा आजार, काही संसर्ग दोष , पुरुष बीजांना मारक ठरणाऱ्या पेशींचे अस्तित्व (Anti sperm antibodies), पुरुष प्रजनन संस्थेमधील रचनात्मक दोष, तसेच प्रजनन संस्थेतील अवयवांना मार लागणे यांचा समावेश पुरुष वंध्यत्वाच्या कारणांमधे होतो. डायबिटीस, ‌थायरॉईड यांसारख्या आजारांमुळे पुरुष वंध्यत्व निर्माण होऊ शकतं.  दैनंदिन जीवनशैलीशी संबंधित विचार या लेखमालिकेमध्ये पुढे मांडण्यात येणार आहेत. पुरुष वंध्यत्वाच्या दृष्टिने महत्वाच्या काही मुद्दयांचा उल्लेख येथे करत आहे. स्थौल्य (obesity), धूम्रपान, मद्यपानासारखी व्यसने, मानसिक तणाव, लॅपटॉप्सचा अतिरिक्त वापर, घट्ट कपड्यांचा सातत्याने वापर या गोष्टी पुरुष वंध्यत्वाशी संबंधित दोष निर्माण करायला कारणीभूत ठरू शकतात. काही औषधांच्या दुष्परिणामांमुळेही पुरुष वंध्यत्व निर्माण होऊ शकतं तसेच काही जन्मजात कारणे - जेनेटिक डिसऑर्डरसुद्धा पुरुष वंध्यत्वाला कारणीभूत ठरतात.

(लेखिका आयुर्वेद आणि वंध्यत्व उपचार तज्ज्ञ आहेत. ‘द्युम्ना वुमेन्स क्लिनिक’, रसायू क्लिनिक, पुणे) ०२० २५४६५८८६, www.dyumnawomensclinic.com

टॅग्स : प्रेग्नंसीआरोग्य