>आरोग्य > प्रसूतीप्रश्न > छातीत गाठ येता ! - लवकर तपासणी, लवकर उपचार हे सूत्र लक्षात ठेवा.

छातीत गाठ येता ! - लवकर तपासणी, लवकर उपचार हे सूत्र लक्षात ठेवा.

कॅन्सर होऊच नये, असं औषध नाहीये. तेव्हा ‘लवकर तपासे, लवकर उपचारे; त्यास आयु आरोग्य लाभे’ हाच मंत्र जपायचा आहे. लवकर तपासणी-उपचार हे सारं कसं करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 01:59 PM2021-05-04T13:59:53+5:302021-05-04T14:08:49+5:30

कॅन्सर होऊच नये, असं औषध नाहीये. तेव्हा ‘लवकर तपासे, लवकर उपचारे; त्यास आयु आरोग्य लाभे’ हाच मंत्र जपायचा आहे. लवकर तपासणी-उपचार हे सारं कसं करतात?

early detection, early diagnosis, early treatment in cancer, breast cancer | छातीत गाठ येता ! - लवकर तपासणी, लवकर उपचार हे सूत्र लक्षात ठेवा.

छातीत गाठ येता ! - लवकर तपासणी, लवकर उपचार हे सूत्र लक्षात ठेवा.

Next
Highlightsफक्त बायकांबद्दल

डॉ.शंतनु अभ्यंकर

छातीत म्हणजे स्तनात गाठ आढळली की, कॅन्सरची कुशंका येते. अशी शंका घेणं योग्यच, पण कॅन्सर म्हणजे साक्षात मरणं असं नाहीये. सगळ्याच कॅन्सरनी काही मरण येत नाही. काही संथ कॅन्सर असतात. ते आपले शरीरात वर्षानुवर्षे वस्तीला असतात. काही कॅन्सर बरे करता येतात. लवकर निदान आणि योग्य उपचार मात्र मस्ट आहेत. ब्रेस्ट कॅन्सर हा असाच एक. ‘लवकर तपासे, लवकर उपचारे; त्यास आयु आरोग्य लाभे’ गटातील कॅन्सर आहे. स्तन हा अवयव फक्त स्त्रियांत असतो, असं आपल्याला वाटतं, पण पुरुषही ‘स-स्तन’ प्राणीच आहेत आणि त्यांच्या खुरट्या स्तनांतही क्वचित का होईना, पण कॅन्सर होतो.

जनुकांत BRCA 1, BRCA 2 या जीनमध्ये उत्परिवर्तन (Mutation) असेल, तर या कॅन्सरची (आणि बीजग्रंथींच्या कॅन्सरची) शक्यता वाढते. हे उत्परिवर्तन तपासता येतं. या टेस्टमध्ये, ब्रेस्ट कॅन्सरची अतिव शक्यता दिसताच, अंजेलीना ज्योली या प्रख्यात गौरांगनेने, चक्क दोन्ही स्तनच काढून घेतले, पण कॅन्सर होऊच नये, असं औषध नाहीये. त्यामुळे निव्वळ भीतिपोटी स्तनोच्चाटन अव्यवहार्य आहे. तेव्हा ‘लवकर तपासे, लवकर उपचारे; त्यास आयु आरोग्य लाभे’ हाच मंत्र यांनीही जपायचा आहे.

लवकर निदानासाठी सगळ्या स्त्रियांनी अधूनमधून आपली आपण स्तनाची चाचपून तपासणी करत राहाणे गरजेचे आहे. हे म्हणजे बेस्टच झालं. मुख्य म्हणजे फुकटात झालं. डॉक्टर, त्यांची फी, तपासण्या, त्यांचा खर्च वगैरे कटाप किंवा मॅमोग्राफीमार्फतही तपासणी करता येते. ही अधिक नेमकी. नियमित तपासणीचा भाग म्हणून किंवा हाताला गाठ लागते, म्हणून ही तपासणी केली जाते. असं केलं, म्हणजे लहानपणीच कॅन्सरची मानगूट धरता येईल. तो इकडे-तिकडे पसरायच्या आत काढून टाकता येईल. रोगमुक्ती शक्य होईल. स्तनात किंवा काखेत हाताला गाठ लागली किंवा बोंडशी आत ओढलेली, स्तनाची त्वचा सुजलेली, सुरकुतलेली अशी काही वेगळी दिसायला लागली की, याचे कारण कॅन्सर तर नाही ना, हे शोधणे ओघानेच आले.

पहिली पायरी सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी क्वचित एमआरआय.

मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा नाजूक एक्सरे. नाजूक अशासाठी की, यासाठी क्ष किरणांचा अत्यल्प मारा केला जातो. यासाठी स्तन चेपून धरले जातात आणि एक्सरे निघतो. त्रिमिती क्ष-चित्रही शक्य झाले आहे आणि यामुळे तपासणीत अधिक नेमकेपणा आला आहे. लवकरच या चित्राचा अन्वयार्थ लावायला कृत्रिम बुद्धिमत्तावाली मशीन वापरली जातील आणि मानवी बुद्धी-सत्ता संपुष्टात येईल!

 

स्तनाची सोनोग्राफी

इथे ध्वनिलहरींच्या मदतीनी स्तनाकडे पहिले जाते. जी गाठ लागते आहे ती घन आहे का द्रवयुक्त आहे, हे इथे झटकन कळते. पूर्वी हे निदान स्पर्शाने करावे लागायचे. गाठ किती लिबलिबीत आहे, किती घट्ट आहे वगैरे ठोकताळे वापरले जायचे. सारे ठोकताळेच असल्याने बऱ्याचदा चुकायचे. वैद्यकीय ‘प्रतिमासृष्टी’च्या नव्या-नव्या उन्मेषांनी पेशंटचे जगणे आणि पेशंटला जगविणे दोन्ही कितीतरी सोपं केलं आहे.

 

गाठीचा नमुना

गाठीचा नमुना घेऊन तपासणे ही पुढील चाचणी. जागेवर भूल देऊन, गाठीचा सुईच्या अग्राएवढा तुकडा, सुईच्या अग्रानेच काढला जातो किंवा सुईच्या पोकळीत आलेला तुकडा तपासला जातो. (FNAC / TRUCUT BIOPSY). या शितावरून भाताची परीक्षा केली जाते.

एकदा कॅन्सर आहे हे ठरले की त्याचा प्रकार, प्रसार आणि विखार तपासला जातो. उपचार या तीन बाबींवर ठरतात.

 

कॅन्सरचे प्रकार

प्रकार आणि उपप्रकार अनेक आहेत, पण उपचाराची तत्त्व साधारण सारखीच आहेत.

सिए इन सिटू :- म्हणजे अजूनही स्वस्थानी असलेला, स्थानबद्ध असलेला, कॅन्सर.

डक्टल कारसिनोमा :- हा दुग्ध वाहिन्यांतील कॅन्सर. हा तसा साधासुधा. पसरतोही पण उशिरा. लहान असेल तर गाठ काढून, शेक देऊन (रेडियोथेरपी) बरा होतो. फार मोठ्ठे ऑपरेशन लागत नाही.

पण मोठी गाठ असेल, तर स्तन पूर्णतः काढावा लागतो. पुढे पसरला तर नाही ना, हे पाहाण्यासाठी काखेतील लिंफ नोड तपासवा लागतो (सेंटिनल बायोप्सी).

या कॅन्सरमधील काही भिडू इस्ट्रोजेनच्या जिवावर तगून असतात. यासाठीही तपासणी केली जाते. (Receptor study) आणि रिपोर्टनुसार इस्ट्रोजेन विरोधी औषध देऊन पुनर्उद्भव टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करता येतो. २ (HER2) तपासणी करुन ट्रास्टूझुमॅब (Herceptin) गटातील औषधे उपयुक्त ठरतील का, हे ठरविले जाते.

 

इन्व्हेसिव्ह कॅन्सर- म्हणजे पसरलेला आजार.

कॅन्सरचा ‘विखार’ही (Grade) तपासला जातो. १ म्हणजे धिम्या गतीने पसरणारे, २ म्हणजे मध्यम आणि ३ म्हणजे जलद अशी गटवारी आहे.

 

प्रसार

अर्थातच कोणत्याही कॅन्सरसाठी हा कळीचा मुद्दा ठरतो. स्थानबद्ध आहे, स्तन-बद्ध आहे का, स्तनबाह्य स्वैर प्रसार आहे, हे समजण्यासाठी विविध तपासण्या (CT, PET, BONE SCAN) केल्या जातात.

पसरताना बहुतेकदा, सुरुवातीला, काखेतल्या लसीका ग्रंथीत कॅन्सरच्या पेशी अडकतात आणि या ग्रंथी फुगतात. तिथे कॅन्सर आहे का, हे पाहायला प्रत्यक्ष तपासणीच करावी लागते. प्रतिमा, सूचिका आणि ग्रंथी काढून तपासणे, इथेही कामी येतात. हा उंबरा. इथवर कॅन्सर पोहोचला आहे वा नाही, यावर पुढील बरेच निर्णय ठरतात. इथे कॅन्सर आढळला, तर तो हा उंबरा ओलांडून स्वैर संचार करत असण्याची शक्यता अधिक. अशा स्वैराचारी कॅन्सरशी लढायचं, तर निव्वळ स्तनाचे ऑपरेशन करून भागत नाही. शरीरात इतरत्र पसरलेल्या पेशींचा नायनाट व्हावा, म्हणून औषधे (केमोथेरेपी) द्यावी लागतात.

प्रसाराची व्याप्ती (Stage) TNM (Tumor, Node, Metastasis) अशा सांकेतिक भाषेत नोंदली जाते. ट्यूमर म्हणजे गाठ केवढी आहे, नोड म्हणजे लसीका ग्रंथी कितपत तडाख्यात सापडल्या आहेत आणि मेटास्टासिस म्हणजे प्रसार किती दूरवर झाला आहे. १,२,३,४ अशा याच्याही पायऱ्या आहेत. अर्थातच, प्रसार जितका व्यापक तितके भविष्य जाचक. पहिली पायरी म्हणजे जेमतेम २ सेंमीची गाठ आणि कॅन्सरमुक्त लसीका ग्रंथी. दुसरी पायरी म्हणजे पाच सेंमीपर्यंत गाठ आणि काखेत कॅन्सर युक्त लसीका ग्रंथी. यापुढची पायरी म्हणजे याहून मोठी गाठ आणि काखेच्या आसपास इतर लसीका ग्रंथीतही प्रसार. चौथ्या अवस्थेत कॅन्सर फुप्फुसे, यकृत, हाडे असा दूरदूर पसरलेला असतो.

प्रकार, विखार आणि प्रसार समजला की, उपचार ठरवत येतात. त्याबद्दल पुढील लेखात.

 

(लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत.)

पूर्वार्ध

faktbaykanbaddal@gmail.com

Web Title: early detection, early diagnosis, early treatment in cancer, breast cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Breast Self-Exam: स्तनाचा कॅन्सर आणि घरच्या घरी स्तन तपासणीची खबरदारी - Marathi News | Breast Self-Exam: Breast cancer and precautions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Breast Self-Exam: स्तनाचा कॅन्सर आणि घरच्या घरी स्तन तपासणीची खबरदारी

घरच्या घरी स्तन तपासणी करता येते, न घाबरता ती करणं, गाठ आढळ्यास डॉक्टरांकडे जाणं हा सतर्क टप्पा महत्त्वाचा. ...

आईपणाच्या सुखासह येणारी अवघड जागांची दुखणी, ती अंगावर काढणं घातक - Marathi News | price of motherhood, speak up about urine & vaginal infection infections & postpartum depression | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईपणाच्या सुखासह येणारी अवघड जागांची दुखणी, ती अंगावर काढणं घातक

वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी अजूनही प्रसूती हा स्त्रीचा खरोखर दुसरा जन्मच असतो याची जाणीव स्त्रीच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांनीच ठेवणं आणि तिला जपणं महत्वाचं आहे.  ...

वयात येणाऱ्या मुलांशी काय आणि कसं बोललं तर लैंगिक छळाचा धोका टळेल? - Marathi News | What and how to talk to teen age children about sex education to avoid the risk of sexual harassment? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयात येणाऱ्या मुलांशी काय आणि कसं बोललं तर लैंगिक छळाचा धोका टळेल?

शरीर ओळख, शरीर सुरक्षा, लैंगिक शिक्षण याबद्दल मुलांशी बोलता संकोच वाटला तरी कुठलीही कारणं न शोधता या विषयावर संवाद झालाच पाहिजे ...

PCOD चा त्रास ? अनियमित पाळी, चेहऱ्यावर पिंपल्स, वाढलेलं वजन ही लक्षणं काय सांगतात? - Marathi News | PCOD symptoms, irregular menstruation, pimples on the face, increased weight? what to do? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOD चा त्रास ? अनियमित पाळी, चेहऱ्यावर पिंपल्स, वाढलेलं वजन ही लक्षणं काय सांगतात?

PCOD हा आजार नक्की का होतो याचे एक कारण नसून अनेक कारणे आहेत. पण काही जणींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. ...

दहाव्या-अकराव्या वर्षीच वयात येणाऱ्या मुलामुलींना लैंगिक-मानसिक समस्यांचा धोका,तो टाळणार कसा? - Marathi News | The risk of sexual and mental and physical problems in adolescent, teenagers how to avoid it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दहाव्या-अकराव्या वर्षीच वयात येणाऱ्या मुलामुलींना लैंगिक-मानसिक समस्यांचा धोका,तो टाळणार कसा?

वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षीच वयात येणारी मुलं, हातात पॉर्न साइट्सचा ॲक्सेस, सगळीकडे खुणावणारं, मोहात पाडणारं जग, त्यातून त्यांना शास्त्रीय माहिती कोण देणार? ...

अपत्यप्राप्तीसाठी egg freezing हा पर्याय कुणी स्वीकारावा? त्यातले धोके कोणते?  - Marathi News | all you need to know about egg freezing? problems & solutions. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अपत्यप्राप्तीसाठी egg freezing हा पर्याय कुणी स्वीकारावा? त्यातले धोके कोणते? 

एग फ्रिजिंगची चर्चा होते, अमूक अभिनेत्री, तमूक सेलिब्रिटीने एग फ्रिज करुन ठेवले होते असे आपल्या कानावर येते. हे तंत्रज्ञान आता समाज स्वीकारत असले तरी तसा हा प्रकार नवीन नाही. ...