Join us

भारतात गर्भाशय काढून टाकण्याच्या ९५ टक्के शस्त्रक्रिया विनाकारण केल्या जातात, संशोधनाचा दावा, नक्की खरे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2023 19:05 IST

95 Percent hysterectomies in India Unnecessary according to reports : शस्त्रक्रिया करणार्‍या बहुतेक स्त्रिया अशिक्षित आणि ग्रामीण भागातील असल्याचे अहवालात म्हटले आहे.

गर्भाशय ही महिलांना नैसर्गिकरित्या लाभलेली एक अतिशय सर्वोत्कृष्ट अशी देणगी आहे. गर्भधारणा करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम या गर्भाशयाद्वारे केले जाते. मात्र गेल्या काही वर्षात गर्भाशयाशी निगडीत समस्यांमध्ये वाढ झाली आहे. हे जरी खरे असले तरी शस्त्रक्रिया करुन  गर्भाशय काढून टाकण्याचे (हिस्टरेक्टॉमी) प्रमाण भारतात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकूण शस्त्रक्रियांपैकी खाजगी  हॉस्पिटलमध्ये या प्रकारच्या शस्त्रक्रिया ६६.८ टक्के केल्या जातात. यातील जवळपास ९५ टक्के शस्त्रक्रिया या कारण नसताना केल्या जात असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात  नमूद करण्यात आले आहे (95 Percent hysterectomies in India Unnecessary according to reports). 

फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) आणि इंटिग्रेटेड हेल्थ अँड वेलनेस कौन्सिल यांनी प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेत ही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. शस्त्रक्रिया करणार्‍या बहुतेक स्त्रिया अशिक्षित आणि ग्रामीण भागातील असतात असेही यामध्ये म्हटले आहे. प्रजनन क्षमता असलेल्या महिलांमध्ये साधारणपणे फायब्रॉइड्स, अनियमित गर्भाशयाचा रक्तस्त्राव, गर्भाशयाचा प्रक्षोभ, पाळीशी संबंधित वेदना आणि गर्भाशयाचा ट्यूमर यांचा समावेश होतो.उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रीमेनोपॉझल महिलांमध्ये हिस्टरेक्टॉमी केली जाते, असे अहवालात म्हटले आहे.पण भारतात मात्र या शस्त्रक्रिया कमी वयाच्या महिलांमध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. 

भारतात, मासिक पाळीत प्रमाणाबाहेर होणारा रक्तस्त्राव हे हिस्टेरेक्टॉमी करण्याचे महत्त्वाचे कारण आहे, तर ही दुसरी सर्वात सामान्य स्त्रीरोग शस्त्रक्रिया आहे. मात्र यावर शस्त्रक्रियेशिवाय इतरही उपाय असू शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या विषयावर बोलताना, FOGSI चे अध्यक्ष हृषिकेश पै म्हणाले की, वैद्यकीय व्यावसायिकांनी महिलांच्या पुनरुत्पादक आरोग्यासाठी शस्त्रक्रिया नसलेल्या, दीर्घकालीन पर्यायांवर भर दिला पाहिजे. डॉक्टरांनी या संदर्भात जागरूकता आणि क्षमता निर्माण करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. 

   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स