Join us   

पुरुष नसबंदी टाळतात, कंडोम वापरण्यासही नकार देतात कारण.. नक्की भीती कशाची वाटते?

By सायली जोशी | Published: December 15, 2021 4:48 PM

कंडोम, नसबंदीमुळे आनंद मिळत नाही असं वाटत असेल तर तज्ज्ञ काय म्हणतात ते वाचा...

ठळक मुद्दे पुरुषांनी गर्भनिरोधक वापरणे नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी नाही तर संसर्गजन्य आजारांसाठीही उपयुक्त गर्भनिरोधकांबाबत असणारे गैरसमज वेळीच दूर केलेले बरे

सायली जोशी - पटवर्धन 

नको असलेली गर्भधारणा ही भारतातील एक महत्त्वाची समस्या असून त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे काम विविध स्तरावर सुरू आहे. लैंगिक संबंधांबाबतची अपुरी माहीती, त्याबाबत असणारे गैरसमज यांमुळे नको असलेली गर्भधारणा वाढत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षात प्रामुख्याने समोर आले आहे. भारतात पुरुषांच्या गर्भनिरोधकांबाबत अनेक गैरसमज पाहायला मिळतात. त्यामुळे या गर्भनिरोधकांचा वापर करण्याचे टाळले जाते. मात्र त्यामुळे महिलांना गर्भधारणा नको असताना त्यांच्यावर ती लादली जाते किंवा नको असलेल्या गर्भधारणेवर उपाय म्हणून महिलांना औषधे घेणे, शस्त्रक्रिया करणे अशा शारीरिक, मानसिक आणि भावनिक त्रासातून जावे लागते. 

पुरुषांनी आणि स्त्रियांनीही पुरुषांना वापरण्यासाठी असलेल्या गर्भनिरोधकांचा योग्य पद्धतीने विचार आणि वापर करायला हवा. त्यामुळे शारीरिक संबंधांबाबत येणाऱ्या अनेक अडचणी सोडवल्या जाऊ शकतात. केवळ गर्भधारणाच नाही तर विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार या गर्भनिरोधकांमुळे टाळता येऊ शकतात. पण त्यासाठी त्याबहद्दलची पुरेशी माहिती घेतलेली केव्हाही चांगली. पुण्यातील प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. सुधीर सोनटक्के याबाबत खालील गोष्टींचे स्पष्टीकरण देतात. 

(Image : Google)

पुरुषांमधील गर्भधारणेचे प्रकार

१. नसबंदी - केवळ गर्भधारणा नको म्हणून नसबंदी करुन घेणे पुरुषांना अनेकदा आवडत नाही. तसेच ही गोष्ट स्त्रीनेच करायला हवी अशा समजातून आपल्याकडे पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तसेच एकदा ही शस्त्रक्रिया केली की ती कायमची असते. काही वेळा रिव्हर्स शस्त्रक्रिया करण्याबाबत विचार केला जातो. मात्र त्याची यशस्विता ही ५० टक्केच असल्याने नसबंदीचा निर्णय पूर्ण विचारांती घ्यायला हवा.   

२. कंडोम - हा आपल्यादृष्टीने गर्भनिरोधक म्हणू अतिशय उत्तम प्रकार आहे जो सामान्यपणे जास्त प्रमाणात वापरला जातो. पण हा कंडोम वापरताना काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. 

अ) कंडोम वापरताना त्याची एक्सपायरी डेट तपासून पाहायला हवी. अन्यथा त्याचा दोघांच्या आरोग्याला त्रास होऊ शकतो. 

ब) एक कंडोम एकदाच वापरावा, काही जणांना याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अशाप्रकारच्या चुका होऊ शकतात.  

क) पाणी किंवा सिलिकॉनचे वंगण असलेले कंडोम वापरावे म्हणजे तो फाटण्याची शक्यता कमी असते. अनेकदा कंडोम लिक झाला असेल म्हणून गर्भधारणा झाली असे आपण म्हणतो. पण त्यासाठी योग्य ती काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

ड) प्रत्येक संबंधाआधी कंडोम वापरणे आवश्यक आहे. केवळ सेफ डेजमध्ये कंडोम नाही वापरला तरी चालतो असे अनेकांना वाटते त्यामुळे काही जण ठराविक दिवसांमध्येच कंडोम वापरतात. पण असे करणे योग्य नाही, अन्यथा गर्भधारणा राहू शकते. 

ई) कंडोम तपासून मगच घालावा. त्याला लहान छिद्र असण्याची किंवा तो फाटलेला असण्याची शक्यता असू शकते. तसेच कंडोम थंड आणि कोरड्या जागी ठेवावा. 

३. पोटातून घेण्याची औषधे - या गोळ्या प्राथमिक अवस्थेत आहेत. त्यातही विशेष म्हणजे भारतात अद्याप अशाप्रकारची औषधे उपलब्ध नाहीत. या औषधांचे संशोधन काही देशांमध्ये सुरू आहे. काही देशांत या औषधांचा वापर सुरू आहे. पण ही औषधे पूर्णपणे विश्वासार्ह आहेत असे आपण म्हणून शकत नाही. 

गर्भनिरोधकांबाबत गैरसमज 

१. कंडोम सेफ नसतात

कंडोम हे भारतात सर्वसाधारणपणे वापरले जाणारे गर्भनिरोधक असल्याने आपण प्रामुख्याने कंडोमबाबत विचार करुया. अनेकदा डॉक्टरही आपल्याला कंडोम वापरण्याचाच सल्ला देतात. अनेकांना कंडोम हे विश्वासार्ह नसून ते सहज फाटतात किंवा निघून येतात असे वाटते. नीट वापरल्यास आणि योग्य पद्धतीचे वंगण असलेल्या कंडोमबाबत असे होत नाही. कंडोम हे केवळ गर्भधारणा रोखण्यासाठी नाही तर सर्व प्रकारच्या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण देण्याचे महत्त्वाचे काम कंडोम करतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टी होऊ नयेत म्हणून कंडोम वापरणे अतिशय चांगले. आपण वापरत असलेले कंडोम हे लॅटेक्सचे असतात त्यामुळे ते सहजासहजी फाटतात किंवा निघतात असे होत नाही. ते स्ट्रेचेबल असल्याने व्यवस्थित बसतात. तसेच यातील वंगण अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते, ते चांगले असायला हवे.     २. कंडोममुळे शारीरिक संबंधांचा आनंद मिळत नाही

आपण फक्त कंडोम वापरतो त्याचा एक अतिशय पातळ लेयर असतो, ते लक्षातही येत नाही. कंडोम घातला हे माहित असल्याने मानसिकरित्या आपल्याला आनंद मिळणार नाही असे वाटते. पण हा थर पातळ असल्याने त्याचा फारसा फरक पडत नाही. तसेच त्याचे वंगण चांगले असेल तर आनंद मिळत नाही असे होत नाही. आपल्याला गर्भधारणा होणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा संसर्गही होणार नाही हे दोन्हीही माहित असेल तर आपला आनंद किंवा सुख दोन्हीही खरंतर वाढतं. मात्र आपल्या मनातील भावना काढून टाकणे आवश्यक आहे. 

३. एकावेळी दोन कंडोम वापरलेले चांगले 

अनेकदा गर्भधारणा होऊ नये म्हणून एकाऐवजी दोन कंडोम वापरले तर चांगले असा अनेक जोडप्यांचा समज असतो. मात्र अशाप्रकारे दोन कंडोम घातल्यास त्यांचे एकमेकांवर घर्षण होऊन ते फाटण्याची शक्यता अधिक असते. तसे झाले तर गर्भधारणा आणि संसर्गजन्य आजार या दोन गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी आपण कंडोम वापरतो त्या दोन्हीही साध्य होत नाहीत.  

४. कंडोम फीट बसत नाहीत

कंडोम हे लॅटेक्स या मटेरीयलचे असतात त्यामुळे ते स्ट्रेचेबल असतात. असे कंडोम व्यवस्थित बसतात. सध्या बाजारात वेगवेगळे साइज, कलर, फ्लेवर, टेक्श्चरमध्ये कंडोम उपलब्ध असतात. त्यामुळे आपण आपल्या आवडीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे कंडोम घेऊन तो वापरु शकता. 

५. नसबंदीचा शरीरसुख व ताकद यांच्याशी संबंध असतो 

नसबंदी केली तरीही वीर्य व वीर्यपतन तसेच राहते. फरक एकच आहे की त्यामध्ये शुक्राणू येत नाहीत हा एकच फरक आहे. गर्भधारणा ही शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचे मिलन झाल्याने होत असते. पण शुक्राणूच आले नाहीत तर गर्भधारणा होऊ शकत नाही, इतका एकच फरक आहे. याचा शरीरसुखात काहीच फरक पडत नाही कारण संभोगाची शरीरक्रिया ही पूर्वीप्रमाणेच होत असते. हार्मोन्स हे आपल्या शारीरिक संबंधांसाठी आवश्यक असतात. टेस्टेस्टेरॉन हा एक त्यातला एक महत्त्वाचा हार्मोन असून त्या हार्मोनवरही नसबंदीचा काहीच परिणाम होत नाही. तसेच ताकदीवरही याचा परिणाम होतो असे वाटते. पण नसबंदी आणि ताकदीचा काहीही संबंध नसतो. संभोगामध्ये केवळ संभोगाशिवाय फोर प्लेही असतो. त्यामुळे शरीरसुख हे त्यातूनही मिळतच असते. त्यामुळे नसबंदीबाबत असणारे गैरसमज चुकीचे असतात. सुख किंवा ताकद यामध्ये नसबंधीचा काहीही फरक पडत नसतो. त्यामुळे नसबंदी हे गर्भनिरोधक म्हणून सर्वात उत्तम उपाय आहे. मात्र पूर्ण विचारांती हा निर्णय घेऊन नसबंदी करायला हवी.    

 

टॅग्स : लैंगिक जीवनलैंगिक आरोग्यरिलेशनशिपआरोग्य