Join us   

मूल नको म्हणून तुम्हीही गर्भनिरोधक गोळ्या घेताय? डॉक्टर सांगतात या औषधांबद्दलचे गैरसमज आणि सत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2023 6:07 PM

Facts and Truth About Contraceptive Pills : परदेशी संस्कृतीप्रमाणे तिशीनंतर मुलाचा विचार करणे भारतीय मनाला व शरीरालाही हिताचे नाही

डॉ. शिल्पा चिटणीस - जोशी     

“डॉक्टर, आमचं आत्ताच लग्न झालंय. खरंतर आम्हाला कमीत कमी एक वर्ष मूल नकोय पण घरच्यांनी आम्हाला काही गर्भनिरोधक वापरायचे नाही असे निक्षून सांगितलंय! काय करावं काही कळत नाही.” क्लिनिकमध्ये माझ्या कानावर येणारी ही नेहमीची कैफियत. विशेष म्हणजे ही समस्या समाजातील सर्व तरुणतरुणींसमोर आहे. लग्न झाल्या झाल्या “बघ हं, गोळ्या बिळ्या घेऊ नकोस! त्या अमकीने मोठ्यांचं न ऐकता गोळ्या घेतल्या आणि आता तीन वर्ष झाली दिवस रहात नाहीयेत!” हाही एक हमखास संवाद! नवीन लग्न झालेल्या आधीच कावऱ्या बावऱ्या झालेल्या मुलीला जवळजवळ दहशतच घातली जाते. खरंतर वंशसातत्य ही माणसातली सर्वात प्रबळ भावना आहे. मुलाचं अथवा मुलीचं लग्न करताना नकळतच प्रत्येक पालक आपल्या नातवाची अथवा नातीची वाट पहात असतो. त्यातून नव्या पिढीवर लवकरात लवकर गरोदरपणाची सक्ती केली जाते (Facts and Truth About Contraceptive Pills).

असुरक्षित ऐनवेळी घेण्याच्या गोळ्यांपेक्षा गर्भनिरोधक गोळ्या खूपच सुरक्षित असतात. प्रत्येक नवविवाहित जोडप्याला आम्ही या गोळ्या घेण्याबद्दल सल्ला देतो. या गोळ्या फक्त अल्पवयातील मधुमेह, वाढलेला रक्तदाब,अतिलठ्ठपणा अशा काही केसेस मध्ये देता येत नाहीत. पण या गर्भनिरोधक गोळ्यांबाबत लोकांमध्ये खूपच गैरसमज आहेत आणि कारण नसताना त्याबद्दल नवविवाहित जोडप्यांच्या मनात भीती घातली जाते. या गोळ्यांमुळे स्त्रीची पाळी अनियमित असेल तर तीही नियमित होते.गोळ्या नियमित घेतल्यास चुकून गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसतेच, त्यामुळे जोडप्याचे लैंगिक आयुष्यही जास्त निकोप राहते. पाळी नियमित झाल्यामुळे गोळ्या थांबवल्यावर गर्भधारणाही लगेच होते.

काही मुलींना चेहऱ्यावर जास्त प्रमाणात मुरूम व फोड येत असतील तर तेही या गोळ्यांमुळे खूप कमी होतात.अशी खरंतर बहुगुणी गोळी आहे ही. पूर्वीच्या काळात काही स्त्रियांनी माला डी, माला एन या सरकारतर्फे फुकट मिळणाऱ्या गोळ्या कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय, कोणत्याही वयात, कशाही डोस मध्ये घेतल्या .साहजिकच काही महिलांना त्रास झाला आणि मग त्याचा डांगोरा पिटुन या गोळ्या बदनाम करण्यात आल्या. आता सरकारी गोळ्या ही खूप कमी डोसच्या आणि उत्तम दर्जाच्या उपलब्ध आहेत. फक्त सुरू करण्याआधी एकदा स्त्रीरोगतज्ञांना जरूर भेटावे. भारतीय स्त्रियांची जनुकीयता लक्षात घेता आम्ही खूप जास्त वर्षें या गोळ्या घेण्याचा सल्ला देत नाही. आजकाल नवराबायको, दोघांनीही आपल्या करीयरसाठी खूप कष्ट घेतलेले असतात. कधी परदेशी जायची संधी असते तर कधी प्रमोशन मिळणार असते. 

(Image : Google)

अशावेळी unplanned pregnancy मुळे त्यांचे जीवन पार विस्कटून जाते. वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. यातून उत्तम मार्ग म्हणजे परिणामकारक गर्भनिरोधक गोळ्या घेणे आवश्यक असते कारण कंडोमपेक्षा ते जास्त श्रेयस्कर व सुरक्षित आहे. तसेच हवे तेव्हा व्यवस्थित नियोजन करून गर्भधारणा करता येऊ शकते. अर्थात या सगळ्या गोष्टींबरोबरच तरुण पिढीने सुध्दा तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. योग्य वय येताच, जास्त वय वाढू न देता मूल होऊ देणे हे सुध्दा शहाणपणाचेच आहे. परदेशी संस्कृतीप्रमाणे तिशीनंतर मुलाचा विचार करणे भारतीय मनाला व शरीरालाही हिताचे नाही, असे करण्यात गरोदर व बाळंतपणात गुंतागुंत होऊ शकते. तेव्हा सुवर्णसमन्वय साधला गेला तरच या बाबतीतली समस्या उलगडू शकते असे मला वाटते.                           

(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ आहेत.)

shilpachitnisjoshi@gmail.com

 

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीहेल्थ टिप्स