Join us

सावधान ! तुम्हालाही माती आणि पाटीवरची पेन्सिल खाण्याची तीव्र इच्छा होतेय का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 18:21 IST

महिलांनाच नाही तर अनेक पुरूषांनाही अशी सवय असते. पण वरवर दिसते, तेवढी ही गोष्ट नक्कीच साधी सोपी नाही. म्हणूनच या समस्येचे गांभीर्य लक्षात घ्या आणि वेळीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही "पिका" या आजाराचे शिकार झालेले आहात, याचेच हे लक्षण आहे.

ठळक मुद्दे गरोदर स्त्रिया आणि लहान बालकांमध्येही पिका हा आजार दिसून येतो.ज्या मुलांची शारिरीक आणि मानसिक वाढ योग्य पद्धतीने होत नाही, त्यांना माती खाण्याची सवय लागू शकते.माती किंवा तत्सम पदार्थ खावे वाटणे, हे तुम्ही मानसिक दृष्ट्या दुर्बल असल्याचे लक्षण आहे. 

पहिला पाऊस पडला की मातीचा येणारा सुगंध, झाडांना पाणी घालताना ओल्या मातीचा मंद दरवळ किंवा  एखाद्या घराचे बांधकाम चालू असताना सिमेंट- विटांवर पाणी मारले की येणारा सुवास.... हे सगळे सुवास आवडत असतील, वारंवार घ्यावेसे वाटत असतील तर इथपर्यंत ठीक आहे. पण याच्या आणखी पुढे जाऊन तुम्हाला ती माती चाखून पाहण्याची, खाण्याची तीव्र इच्छा होत असेल, तर मात्र सावधान. कारण तुमच्या शरिरात अनेक आवश्यक घटकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असून तुम्ही "पिका" या आजाराचे शिकार झालेले आहात, याचेच हे लक्षण आहे. पिका आजार म्हणजे खाण्यासाठी अयोग्य असणाऱ्या वस्तू खाण्याची जबरदस्त इच्छा होणे आणि या इच्छेवर नियंत्रण न मिळविता आल्याने अशा गोष्टी खाण्याचे व्यसन लागणे. 

 

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते पिका या आजारामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह या घटकांची  कमतरता असल्यास शरीरात बारीक जंत तयार होतात. या जंतांमुळे रक्ताचे प्रमाण कमी होते आणि रूग्णाला माती, पेन्सिली, खडू असे खाण्यायोग्य नसणारे पदार्थ खाण्याची जबरदस्त इच्छा होते.  आपल्या आजूबाजूला आपण अनेक महिला पाहतो, ज्यांना माती तर खावी वाटतेच पण त्यासोबत गहू किंवा इतर धान्यांमधील खडे, पाटीवरच्या पेन्सिली, खडू किंवा मातीची ओली झालेली भिंतही चाखून पहावी वाटते. आपल्या पाहण्यात अशी एक तरी व्यक्ती हमखास असतेच. यावरूनच या आजाराची तिव्रता आणि गांभीर्य लक्षात येते. भट्टीत भाजलेली माती खाण्याची सवयही अनेक महिलांना असते.  विशेष म्हणजे विविध  शहरांमध्ये  अगदी सहज अशी माती उपलब्ध होते.   

माती, पेन्सिली खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम - माती, पेन्सिली, खडू खाल्ल्यामुळे दातांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. - तोंडाच्या आतील भागात तसेच आतड्यांमध्येही इन्फेक्शन, अल्सर होऊ शकतो. - खाण्यायोग्य नसणारे पदार्थ वारंवार शरिरात केल्याने पचन संस्थेवर ताण येतो आणि हळूहळू अशा रूग्णांना बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. - मुत्रपिंड निकामी होण्यासारख्या समस्याही अशा रूग्णांमध्ये बघायला मिळतात.

या पदार्थांचा आहारात समावेश करा - पिका या आजारावर मात करण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि आयर्नचा पुरवठा करणारे घटक जास्तीतजास्त प्रमाणात खाल्ले पाहिजेेत. - म्हणूनच अशा रूग्णांनी गुळ, शेंगदाणे, दुध, ॲव्हाकॅडो, डाळी, मासे या गोष्टी पुरेशा प्रमाणात खाव्या.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समहिला