lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Adolescence > तेराव्या वर्षी प्रेमात, पंधराव्या वर्षी नात्यात; कोवळ्या वयात भलतेच गुंते..

तेराव्या वर्षी प्रेमात, पंधराव्या वर्षी नात्यात; कोवळ्या वयात भलतेच गुंते..

लवकर पाळी येण्यापासून कोवळ्या वयातच शरीरसंबंध, नको त्या नात्यात अडकणं हे मुलींच्याच नाही, तर मुलांच्याही बाबतीत होतं, ते नाकारून प्रश्न सुटणार नाहीतच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2022 02:57 PM2022-09-06T14:57:30+5:302022-09-06T15:37:13+5:30

लवकर पाळी येण्यापासून कोवळ्या वयातच शरीरसंबंध, नको त्या नात्यात अडकणं हे मुलींच्याच नाही, तर मुलांच्याही बाबतीत होतं, ते नाकारून प्रश्न सुटणार नाहीतच.

the sexual issues of teenage boys and girls, sexual behavior, involvement and emotional trauma, how to deal with it/ | तेराव्या वर्षी प्रेमात, पंधराव्या वर्षी नात्यात; कोवळ्या वयात भलतेच गुंते..

तेराव्या वर्षी प्रेमात, पंधराव्या वर्षी नात्यात; कोवळ्या वयात भलतेच गुंते..

Highlightsचुका केल्यावर त्या पालकांकडे येऊन कबूल करण्याचा विश्वास पालकांनी मुलांमध्ये निर्माण करायला हवा.

डॉ.शिल्पा चिटणीस जोशी

सध्या नाशिक जिल्ह्यातले अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आल्याचं प्रकरण सर्वत्र गाजत आहे. या निमित्ताने समाजात आणि कायद्यात काळानुसार झालेले बदल, वयात येणाऱ्या मुलांची झपाट्याने बदललेली शारीरिक आणि मानसिक स्थिती या सगळ्याचा सखोल विचार व्हायला हवा. पॉक्सो कायदा आपल्या कोवळ्या मुलांच्या संरक्षणासाठी बनवला गेला आहे. या कायद्यामुळे या मुलामुलींचे लैंगिक शोषण थांबवण्यास खूप मोठा फायदा होत आहे. हा कायदा होण्याआधी खूप निष्पाप बालिका लैंगिक अत्याचाराला बळी पडत होत्या आणि गुन्हेगार मोकाट सुटत होते.
‘सोळावं वरीस धोक्याचं गं...’ ही म्हण आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय. तरुणपणी खूप राग यायचा या म्हणीचा आणि ही म्हण ऐकविणाऱ्यांचा! उगाच काय कटकट लावलीय, असं वाटायचं.

(Image : google)

आता स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून अनेक पावसाळे बघितल्यावर ही म्हण लिहिणाऱ्या पूर्वजांच्या हुशारीचं कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. हल्ली तर हे अल्लड आणि भावनाविवश वय सोळावरून बारा-तेरावरच आलं आहे. मुलींचे पाळी सुरू होण्याचे वय कमी झाल्यामुळे लैंगिक भावनांची जाणीवही कमी वयातच होत आहे. त्यातून कमी वयात लैंगिक संबंध सुरू होण्याचे प्रमाण वाढते आहे, पण म्हणून घाबरून जाऊन, मुलींना बंधने घालून त्यांचा कोंडमारा करणे हेही अत्यंत चुकीचं आहे. या कोमल, निष्पाप कळ्यांचं सुरेख फुलात रूपांतर होइपर्यंत त्यांना प्रेमानं जपायचंय फक्त.
आजकाल बऱ्याच शाळांमध्ये आम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ पाचवीपासूनच मुलींना आरोग्यासाठी मार्गदर्शन करायला जातो. यात मुलींचे शरीर, त्यात पाळी सुरू होण्याआधी आणि नंतर होणारे बदल, लैंगिक आकर्षण याबद्दल आम्ही बोलतो. बऱ्याच वेळा पालकांची मानसिकता अशी असते की, ‘त्या नको त्या विषयांवर नका बोलू मुलींशी, उगाच त्यांच्या मनात वेगळेच विचार सुरू होतील!’
या मनोवृत्तीवर अजून एक म्हण आठवली. ‘कोंबडं झाकून ठेवलं, तरी सूर्य उगवायचा राहात नाही.’
या विषयांवर आपण मुलांशी बोललो नाही, तरी ते माहिती मिळवितातच. त्यांच्या वयाने मोठ्या मैत्रिणी आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेली कधी-कधी अशास्त्रीय माहिती हे त्यांचे स्रोत होऊ शकतात. मग गैरसमज आणि अंधश्रद्धा यामध्ये भर पडू शकते. इंटरनेटवर दिसणारी सगळी माहिती खरीच असते, ही तर सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. तुम्ही कोणत्या संकेतस्थळावर जाऊन माहिती शोधताय, हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे सगळं सांगायचा उद्देश हा की, मुलांशी मनमोकळा संवाद ठेवला, तरच त्यांच्या मनात काय चाललंय, याची आपल्याला कल्पना येऊ शकते.
सध्या समस्या आहे हीच आहे की, समज येण्याआधी मुलंमुली शारीरिक संबंधांमध्ये गुंतत आहेत. हल्ली अगदी बाराव्या-तेराव्या वर्षांपासूनच मुलामुलींना गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असतात. अपरिपक्व वयात टीव्हीवरच्या सीरिअल्स आणि सिनेमे मुलांना बरंच काही दाखवतात, त्यांना खरं तर पचविता येत नाही. मग नको त्या गोष्टी करायला जातात. यात पीअर प्रेशर म्हणजे मित्रमंडळीचा दबाव हाही मोठा घटक असतो. अशा गोष्टींतून अल्पवयीन मुलगी जर प्रेग्नंट राहिली, तर मग मात्र परिस्थिती अतिशय गंभीर वळण घेऊ शकते. कारण कायद्यानुसार हा बलात्कार मानला जातो. कारण अठरा वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी लैंगिक संबंधाला परवानगी देण्याएवढी परिपक्व नसते, असे कायदा मानतो आणि ते खरेही आहे. शारीरिक संबंध परस्पर सहमतीने झाले असले आणि मुलगा वयाने लहान असेल, तरीही तो कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो. नाशिकच्या केसमध्ये मुलाचे वय जास्त आहे, पण मुलगी अल्पवयीन असे वृत्तपत्रीय बातम्या सांगतात. अल्पवयीन मुलीशी तिच्या संमतीनेही लैंगिक संबंध ठेवणे हे कोणत्याही वयात मुलांसाठी सर्व दृष्टीने धोकादायकच आहे.


(Image : google)

 

पालकांनी काय करावं?

१. लहान व अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार ही एक दुसरी ज्वलंत समस्या आहे. या केसेसमध्ये बऱ्याच वेळा गुन्हेगार हे नातेवाईक अथवा शेजारी असतात. त्यामुळे लहान वयापासूनच मुलांच्या मनात याबद्दल जागरूकता निर्माण करणे, पालकांनीही डोळ्यात तेल घालून वयात आलेल्या मुलीकडे लक्ष ठेवणे, तिने कोणाची तक्रार केल्यास ताबडतोब तपास करणे, अशा गोष्टींमुळे आपल्या मुलींच्या बाबतीत अप्रिय घटना घडणे आपण टाळू शकतो.
२. वयात आल्यावर मुलामुलींना एकमेकांचे आकर्षण वाटणे साहजिक आहे. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून आत्ता त्यांचं वय फक्त मैत्री करायचं आहे, मित्र-मैत्रिणींचे ग्रुप जरूर असावेत, पण एकाशी वेगळे नाते जोपासण्याची ही वेळ नाही हे त्यांना पटवून देत येऊ शकते.
३. तसेच तुमचं शरीर तुम्हीच जपायचं आहे, पुढचा मागचा विचार न करता, कोणत्याही व्यक्तीशी लैंगिक संबंध म्हणजे स्वतःच्या शरीराशी प्रतारणा आहे. याचे शरीरावर, तसेच मनावरही खूप दूरगामी परिणाम होऊ शकतात, हे मोकळेपणाने बोलायला पाहिजे मुलांशीही. फक्त मुलींशीच नव्हे. मुलेमुली दोघांशीही!
४. नुसते पोकळ नैतिकतेचे आणि तथाकथित संस्कृतीचे धडे देण्याचा प्रयत्न केला, तर ही मुलंमुली साफ दुर्लक्ष करतात. पालक करत असलेली सर्वात मोठी चूक म्हणजे सगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यावर बंदी आणणे. तरुण उसळतं रक्त तुम्ही फार काळ थोपवून धरू शकत नाही, ते अजूनच उसळतं, त्याला योग्य प्रवाहाची दिशा दिली, तरच ते आटोक्यात राहतं. आपल्या मुलांची लैंगिकता स्वीकारणे हेही भारतीय पालकांना अजूनही अवघडच जातं.
५. या वयातल्या मुलांकडून छोट्या-मोठ्या चुकाही होणारच. चुका केल्यावर त्या पालकांकडे येऊन कबूल करण्याचा विश्वास पालकांनी मुलांमध्ये निर्माण करायला हवा.
६. बहर येऊ घातलेल्या या नाजूक वेली आता भराभर मोठ्या होणार आहेत. यांना पालकांनी खंबीर मानसिक आधार आणि शिस्त व प्रेमाचं खतपाणी घातलं की, त्यांचे कणखर वृक्ष होतील, एक दिवस आईबाबांना शीतल छाया देत राहतील... हो ना?

(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ आहेत.)

Web Title: the sexual issues of teenage boys and girls, sexual behavior, involvement and emotional trauma, how to deal with it/

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य