Join us   

Sexual health : गरोदरपणाचा धोका टाळण्यासाठी तरूणी सर्रास घेतात इमर्जन्सी पिल्स, हार्मोनल घोळ, तब्येतीचं वाटोळं

By manali.bagul | Published: December 02, 2021 6:30 PM

Sexual health : असुरक्षित सेक्स, कॅज्युअल सेक्स आणि गर्भारपणाचा धोका टाळण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या इमर्जन्सी पिल्स तब्येतीसाठी ठरतात घातक.

मनाली बागुल

डॉक्टर, गेल्या २-३ महिन्यापासून पाळी वेळेवर येत नाहीये, रक्तस्त्राव थांबतच नाही, महिन्यातून कधीतरीच ब्लीडींगचा त्रास.. सारखी मळमळ, अशक्तपणा जाणवतोय. खूप भीती वाटतेय,  काय करु? अशा तक्रारी घेऊन कित्येक मुली रोज डॉक्टरांकडे जातात. चुकीची जीवनशैली, त्यात प्रेमात पडताक्षणी परस्पर सहमतीने सेक्शुअली ॲक्टिव्ह होण्याची घाई आणि खबरदारीचे उपाय घेण्याविषयीचे अज्ञान किंवा गैरसमज यामुळेही अनेक समस्या निर्माण होताना दिसतात. (Emergency pills side effects)

आणि त्यावर उपाय म्हणून जाहिरातीत दिसणाऱ्या, मेडिकलमध्ये ओव्हर द काऊण्टर मिळणाऱ्या इमर्जन्सी गर्भनिरोधक पिल्सही अनेकजणी घेऊ लागल्या आहेत. कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय आणि परिणामांचा विचार न करता असुरक्षित लैंगिक संबंधांनंतर मुली सर्रास या गोळ्या घेतात. अनेकदा तर त्यांचे पार्टनरर्स त्यांना अशा गोळ्या स्वत: आणून देतात. आणि त्यातून मुलींचं आरोग्य धोक्यात येतं आहे.

यासंदर्भात स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी सांगतात, ''सध्या आय पिल्स आणि एबॉर्शन पिल्समुळे कॉण्ट्रासेप्शनला(Contraception) गांभीर्यानं घेतलं जात नाही. वारंवार आय पिल्स घेतल्यानं मोठ्या प्रमाणात हार्मोनल असंतुलन होऊ शकतं. लैगिंक संबंधात तरी दोघंजण असले तरी त्यानंतरचा हार्मोनल असंतुलनाचा त्रास मुलींसाठीच शारीरिक, मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरतो.

नियमित लैगिंक संबंध ठेवत असलेल्या मुलींना सुरक्षितता म्हणून कॉण्ट्रासेप्शन टॅब्लेट्स घ्यायला हरकत नाही. कंडोम्स पूर्ण सुरक्षा देतीलच याची खात्री नाही. म्हणून संबंध ठेवताना कंडोम आणि टुडे वजायनल कॉट्रासेप्टिव्ह (Condom + today vaginal contraceptive) दोन्हींचा वापर करता येणं शक्य आहे.

मात्र  बऱ्याच मुली याबाबत डॉक्टरांशी न बोलता अनवॉन्टेड प्रेग्नंसीच्या भीतीनं परस्पर उपाय करतात. गर्भधारणा टाळण्याच्या पिल्स वारंवार घेतल्यानं मासिक पाळीचे चक्र पूर्णपणे डिस्टर्ब होते, हार्मोनल असंतुलन, अनियमित मासिक पाळी, जास्त प्रमाणात रक्तस्त्राव, पोटदुखीचा सामना करावा लागतो.''

कौटुंबिक मानसिकतेबाबत त्या म्हणतात की, ''मुलींनी स्वत:हून स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी आजूबाजूला तसं वातावरण तयार होणं गरजेचं आहे. अजूनही पालकांची ॲडल्ट मुलांनाही त्यांची सेक्शुअल लाईफ असते, हे स्वीकारण्याची मानसिक तयारी नाही. आपण त्यांच्या नैसर्गिक भावना थांबवू शकत नाही आणि थांबवणं योग्यही नाही. हल्ली लग्नसुद्धा खूप उशीर केली जातात.

आजकालच्या तरुण पिढीचे करीअरचे, परदेशी जाण्याचे वगैरे बरेच बेत असतात. म्हणून हळूहळू जर पालकांनी हे स्वीकारलं, त्यांच्याशी बोलत राहून, सुरक्षित काय असुरक्षित काय हे सांगितलं तर मुलंही लैगिंक आरोग्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास घाबरणार नाहीत. पालकांशीही मोकळेपणानं बोलू शकतील.''

अनेकजण किती बेजबाबदार वागतात हे स्पष्ट करताना डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी सांगतात, ''एरव्ही डोक दुखतंय, क्रोसिन घेऊ का? म्हणून फोन करणारे पेशंट या अशा गोळ्या कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय का घेतात? नुकतंच लग्न झालेली जोडपी जेव्हा कुटुंबनियोजनाच्या बाबतीत सल्ला घ्यायला येतात तेव्हा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणून गर्भनिरोधक गोळ्या आम्ही त्यांना घ्यायला सांगतो तेव्हा बरीचशी जोडपी 'त्या गोळ्या' सोडून काहीही द्या असं म्हणतात.

कंडोम वापरलं म्हणजे एचआयव्हीचा धोका टळतो? बेजबाबदार लैंगिक वर्तनामुळे तरुण मुलं मुली धोक्यात..

पण हीच जोडपी या इमर्जन्सी गोळ्यांचा परस्पर वापर करताना दिसतात. ज्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या मानाने दहापटीने हानिकारक आहेत. असुरक्षित ऐनवेळी घेण्याच्या गोळ्यांपेक्षा गर्भनिरोधक गोळ्या खूप सुरक्षित असतात. म्हणूनच तरुण, विवाहित, अविवाहित सर्व महिलांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नयेत.  त्यातून संपूर्ण आरोग्याचे नुकसान होण्याचा धोका उद्भवू शकतो.''

टॅग्स : लैंगिक जीवनलैंगिक आरोग्यस्त्रियांचे आरोग्यहेल्थ टिप्सरिलेशनशिप