lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Adolescence > दहाव्या-अकराव्या वर्षीच वयात येणाऱ्या मुलामुलींना लैंगिक-मानसिक समस्यांचा धोका,तो टाळणार कसा?

दहाव्या-अकराव्या वर्षीच वयात येणाऱ्या मुलामुलींना लैंगिक-मानसिक समस्यांचा धोका,तो टाळणार कसा?

वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षीच वयात येणारी मुलं, हातात पॉर्न साइट्सचा ॲक्सेस, सगळीकडे खुणावणारं, मोहात पाडणारं जग, त्यातून त्यांना शास्त्रीय माहिती कोण देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 03:37 PM2021-05-01T15:37:43+5:302021-05-01T15:47:48+5:30

वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षीच वयात येणारी मुलं, हातात पॉर्न साइट्सचा ॲक्सेस, सगळीकडे खुणावणारं, मोहात पाडणारं जग, त्यातून त्यांना शास्त्रीय माहिती कोण देणार?

The risk of sexual and mental and physical problems in adolescent, teenagers how to avoid it? | दहाव्या-अकराव्या वर्षीच वयात येणाऱ्या मुलामुलींना लैंगिक-मानसिक समस्यांचा धोका,तो टाळणार कसा?

दहाव्या-अकराव्या वर्षीच वयात येणाऱ्या मुलामुलींना लैंगिक-मानसिक समस्यांचा धोका,तो टाळणार कसा?

Highlightsलैंगिक संबंधांबाबतीत ही मुलं प्रचंड गोंधळलेली तरी आहेत किंवा बिनधास्त तरी आहेत.

स्नेहा मोरे

किशोरवय म्हणजे १० ते १९ आणि पुढे १९ ते २२ हा गट अतिशय संवेदनशील गट समजला जातो. देशातील लोकसंख्येच्या २२ टक्के नागरिक या वयोगटात येतात. या वयोगटाचे वैशिष्ट्य म्हणजे कळी उमलून फूल बनणे. अळीचं फुलपाखरू होताना अनेकांसाठी हा प्रवास फारच खडतर ठरतो. या काळात शारीरिक, भावनिक, मानसिक, लैंगिक बदल फार झपाट्याने होतात. त्यामुळे मुले-मुली भांबावून जातात. त्याच्यात भर म्हणजे मुलांचे मुलींप्रती व मुलींचे मुलांप्रती आकर्षण. शरीरातील हार्मोन्स गोंधळ घालायला लागतात. यात त्या मुला-मुलींची चूक नसते. पण त्यांना समजून घेणे गरजेचे असते. किशोरवयीन मुलांमध्ये ‘रिस्क टेकिंग बिहेव्हिअर’ खूप जास्त असते. म्हणजे नवनवीन प्रयोग करण्याचे ते धाडस करतात. त्यांना बरीच माहिती मित्र-मैत्रिणी किंवा सोशल मीडिया गुगलवरून मिळवायची. ती बरोबर आहे की नाही त्यांना कळत नाही. पूर्वी मुलेमुली १४-१५ वर्षांमध्ये वयात यायचे. आता दहाव्या वर्षापासूनच शरीरात बदल दिसायला लागत आहेत. त्यामुळे सहावी, सातवीमध्येच ‘रिलेशनशिप’ची समस्या तोंड वर काढू लागली आहे. सोशल मीडिया, टीव्ही मालिका, सिनेमा इतकेच काय तर कार्टून्समध्येही प्रेमसंबंध दाखवले जाऊ लागले आहेत. त्यामुळे मुलांच्या कोवळ्या मनावर भरपूर परिणाम होतो. अजूनही काही गावांमध्ये १८ वर्षांच्या आधीच मुलींचे लग्न होतात. या मुलींमध्ये आत्मविश्वास कमी असतो. गर्भधारणा होऊ नये म्हणून काय उपाय करावेत, याबद्दलचे ज्ञान मुलामुलींना नसते. त्याबाबत बोलायची हिंमतही नसते. २१ वयापर्यंत मुलींचे शरीर गर्भधारणेसाठी परिपक्व झालेले नसते.
त्यामुळे या वयात झालेली गर्भधारणा गर्भ आणि मुलगी दोघांना हानी पोहोचवू शकते.  पुरेशी काळजी घेतली नाही, तर गर्भधारणा व लैंगिक आजार एचआयव्ही, एड्सची शक्यता वाढते. परिणामी भावनिक, मानसिक समस्या येतात. आत्मविश्वास खचतो. हे सगळे टाळण्यासाठी वयाच्या १० वर्षांपासूनच मुलांना त्यांच्यातील बदलांबाबत व कसा बचाव करायचा याची माहिती देणे आता काळाची गरज बनली आहे. किशोरवयीन मुले ही अधिक भावनिक असतात. मोहात सहज अडकू शकतात. लहानसहान गोष्टींवरून चिंतातुर होतात किंवा संताप व्यक्त करतात. अशा मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, नाही तर मद्यपान, अमली पदार्थाचे सेवन, लैंगिक संबंध किंवा कोणत्याही वाईट
गोष्टींच्या जाळय़ात ती अडकली जातात. विशेषत: किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याकडे नेहमीच पालकांचे दुर्लक्ष होत असते.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नूतन लोहिया सांगतात... 

मुलांच्या वाढत्या वयात पालकांचीच भूमिका मोलाची असते. पालक हेच मुलांचे पहिले मित्र, मैत्रिण असायला
हवे. त्यांनी त्यांच्याशी सुसंवाद साधावा. त्यांचे मित्र मैत्रिणींबद्दल माहिती ठेवावी. मुलांना समुपदेश करावे. लैंगिक बाबतीत काही प्रश्न असतील तर ते निसंकोच हाताळावे. मुलांच्या हाती कमी वयात मोबाइल आला तर ‘पॉर्न साइट’चा धोका हमखास असतो. त्यामुळे पालकांनीच काळजी घ्यावी. मुलांशी सुसंवाद हाच या समस्येचा मुख्य उपाय आहे. नवजात मुलांना कसे सांभाळायचे याबाबत बरेच पालक कार्यशाळांना जातात. पुस्तके वाचतात. पण वयात येणाऱ्या मुलांना कसे हाताळावे, याबाबत कोणीही कार्यशाळेची मदत घेत नाही. डॉक्टरांचा सल्ला घेत नाही, याविषयीही आजही समाजात न्यूनगंड आहे, त्यामुळे या गोष्टींकडे आता विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. विरेंद्र सिन्हा सांगतात..

यावयात उत्पन्न होणारे प्रेम ‘परिपक्व प्रेम  नसते. याला इंग्रजीत Calf love किंवा Puppy love म्हणतात. हे प्रेमसंबंध बहुधा लवकर जुळतात व लवकर तुटतात. कारण एकमेकांना समजून घेण्याची, एकमेकांना मदत करण्याची, एकमेकांना आधार देण्याची परिपक्व मानसिकता तयार झालेली नसते. या कच्च्या प्रेमप्रकरणातून शारीरिक संबंध घडले, तर अकाली गर्भधारणा, लैंगिक अवयवांना इजा, अयशस्वी संबंधामुळे येणारा न्यूनगंड, सामाजिक भीतीमुळे येणारी अपराधाची भावना व भयगंड हे सगळे या वावटळीचेच भाग..आरोग्यशास्त्राच्या दृष्टीतून या संबंधातून लैंगिक आजार होऊ शकतात.  लैंगिक समस्यांशी निगडित आजार होऊ शकतात, तसेच, एचआयव्ही हा शरीरातील रोगप्रतिबंधक शक्तीवर हल्ला करणारा हा रोग शरीरसंबंधातून होतो. मुलांना निकोप लैंगिक- भावनिक संबंधासाठी तयार करायचं असेल तर त्यांना जबाबदारीचं देत शास्त्रीय माहितीही द्यायला हवी.  मुलांच्या विश्वात डोकावल्यास काय दिसतं? लैंगिक संबंधांबाबतीत ही मुलं प्रचंड गोंधळलेली तरी आहेत किंवा बिनधास्त तरी आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत माझ्या एकटय़ाच्या क्लिनिकमध्ये लैंगिक समस्या घेऊन येणाऱ्या अविवाहित मुलांची संख्या चौपट झाली आहे. आजच्या मुलांना या सगळ्या गोष्टींचं भान देणं गरजेचं आहे, हे नक्की पण नेमकं काय, कसं हाच सवाल आहे. लैंगिक शिक्षण हा त्यावरचा उपाय अनेकांनी बोलून दाखवला आहे. पण लैंगिक शिक्षणात काय काय अंतर्भूत असावं आणि ते शिक्षण देणारेही तितकेच प्रशिक्षित असणं गरजेचं आहे.

( लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत आरोग्य वार्ताहर आहेत.)

Web Title: The risk of sexual and mental and physical problems in adolescent, teenagers how to avoid it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य