Lokmat Sakhi >Health >Adolescence > PCOD चा त्रास ? अनियमित पाळी, चेहऱ्यावर पिंपल्स, वाढलेलं वजन ही लक्षणं काय सांगतात?

PCOD चा त्रास ? अनियमित पाळी, चेहऱ्यावर पिंपल्स, वाढलेलं वजन ही लक्षणं काय सांगतात?

PCOD हा आजार नक्की का होतो याचे एक कारण नसून अनेक कारणे आहेत. पण काही जणींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:40 PM2021-05-04T16:40:08+5:302023-09-21T15:51:57+5:30

PCOD हा आजार नक्की का होतो याचे एक कारण नसून अनेक कारणे आहेत. पण काही जणींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो.

PCOD symptoms, irregular menstruation, pimples on the face, increased weight? what to do? | PCOD चा त्रास ? अनियमित पाळी, चेहऱ्यावर पिंपल्स, वाढलेलं वजन ही लक्षणं काय सांगतात?

PCOD चा त्रास ? अनियमित पाळी, चेहऱ्यावर पिंपल्स, वाढलेलं वजन ही लक्षणं काय सांगतात?

Highlightsशरीरातील या हार्मोन इम्बॅलन्समुळे मानसिक ताण तणाव वाढतो व नैराश्य, चिडचिडेपणा याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे PCOD ची शंका आल्यास लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांना भेटणे गरजेचे असते.

डॉ. यशपाल गोगटे

पीसीओडी. हल्ली अनेकींना हा त्रास दिसतो. त्याविषयी तक्रारी असतात. उपाय केले जातात. सेक्स हार्मोन्सशी निगडित असलेला आजार म्हणजे PCOD अर्थात पॉली सिस्टिक ओवॅरियन डीजीस. आपण या आजाराबद्दल जाणून घेऊ.
आपल्या शरीरात तीन सेक्स हार्मोन्स मुख्यतः कार्य करतात : इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन व टेस्टोस्टेरॉन.
यातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमधील प्रमुख हार्मोन्स आहेत व टेस्टोस्टेरॉन हे पुरुषत्वाचे हार्मोन आहे. सामान्यतः स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन अधिक असते व टेस्टोस्टेरॉन अत्यल्प असते. या उलट पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन जास्त असते व इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन अत्यल्प असते. 
पण काही कारणास्तव स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण मात्र वाढले तर त्याला हार्मोनल इम्बॅलन्स असे म्हणता येईल. या हार्मोन इम्बॅलन्सचे मुख्य कारण असलेला आजार म्हणजे PCOD (polycystic ovarian disease).
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास पीसीओडी या आजारामध्ये स्त्रियांमध्ये पुरुषत्वाचे हार्मोन म्हणजेच
टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढते. या आजारामध्ये बीजांडात छोट्या छोट्या अनेक (poly) गाठी तयार होतात ज्याला
सिस्ट (cyst) असे म्हंटले जाते. गळ्यात मोत्याची माळ असावी तश्या या सिस्ट एकाशेजारी एक गुंफलेल्या असतात. सोनोग्राफीने या सिस्टचे निदान होऊ शकते. इतर गाठींपेक्षा या सिस्टचे वैशिष्ठ्य म्हणजे या आपोआप कमी जास्त होत असतात. पस्तीशी नंतर बरेच वेळा या सिस्ट आपोआप कमी होतात व काही प्रमाणात आजार बरा होतो. 


PCOD हा आजार नक्की का होतो याचे एक कारण नसून अनेक कारणे आहेत. 


काही जणींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. अनुवंशिकता हे एक मुख्य कारण म्हणता येईल. 
जन्मतः कमी वजन असणाऱ्या मुलींमध्ये हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. 
या आजाराचे डायबेटीसशी खूप जवळचे नाते आहे. त्यामुळे ज्या कुटुंबांमध्ये डायबेटीसचे प्रमाण जास्ती असते त्यातील मुलींना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.
वाढलेले वजन व लठ्ठपणा देखील याचे एक कारण आहे. 
त्यामुळे आयुष्यामधील तीन वेगळ्या टप्प्यांमध्ये PCOD
होण्याची शक्यता अधिक असते. 
हे टप्पे म्हणजे पौगंडावस्था, गर्भधारणा व मेनोपॉज हे होय. 
कारण या काळात झपाट्याने वजनाची वाढ होत असते. 
काही विशिष्ट हार्मोनच्या आजारांमुळे देखील PCOD होऊ शकतो जसे थायरॉईड, अक्रोमेगाली कुशिंग इ.

PCOD या आजाराची काही विशिष्ठ लक्षणे असतात. 

पाळीचे विकार जसे की पाळी उशिरा येणे, अनियमितता असणे, मधेच स्पॉटिंग होणे हे यात होऊ शकते. 
या आजारात पाळीची अनियमितता होत असल्याने वंध्यत्वाचे हे कारण असू शकते. 
पुरुषार्थाचे हार्मोन टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढल्यामुळे देहयष्टीत पुरुषाप्रमाणे बदल होतात जसे
डोक्यावरचे केस कमी होणे, चेहऱ्यावर, अंगाखांद्यावर केस वाढणे, आवाज घोगरा होणे, पिंपल्स व तारुण्यपिटिका होणे. 
बरेच वेळा हे पिंपल्स अधिक तीव्र व त्वचेवर डाग व व्रण पाडणारे असतात. 
शरीरातील या हार्मोन इम्बॅलन्समुळे मानसिक ताण तणाव वाढतो व नैराश्य, चिडचिडेपणा याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे PCOD ची शंका आल्यास लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांना भेटणे गरजेचे असते.

(लेखक हार्मोन तज्ज्ञ, एंडोक्रिनॉलॉजिस्ट आहेत.)
 

Web Title: PCOD symptoms, irregular menstruation, pimples on the face, increased weight? what to do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.