Join us   

गाडीत बसलं की कसंतरी होतं...अनेकदा हा त्रास मुलींनाच जास्त होतो, असं का? उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 7:37 PM

त्याच त्याच रूटीनमधून कंटाळा आला की मस्त गाडी काढावी आणि कुठेतरी लांब गावाला जाऊन यावे असे वाटते. तरूण मुलींना तर त्यांचा बॉयफ्रेंड लाँग ड्राईव्हला नेण्यासाठीही तयार असतो. पण हाय रे किस्मत.... गाडीचे नाव काढले, की अनेकींच्या पोटात खळबळ व्हायला सुरूवात होते.. बायकांना, मुलांना आणि तरूणींनाच हा त्रास का बरे होत असावा ? ही गाडी नेमकी त्यांनाच का लागत असावी ?

ठळक मुद्दे मोशन सिकनेसचा त्रास एवढा भयंकर असतो, की त्यामुळे त्या व्यक्तींना प्रवास म्हटले की अंगावर काटा येतो.रेल्वे, बस, कार, विमान, जहाज अशा कोणत्याही वाहनात त्रास होऊ शकतो.मोशन सिकनेसचा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांकडून योग्य औषधोपचार घेतले पाहिजेत.

प्रवासाला जाण्यासाठी गाडीत बसल्यावर लगेचच चकरा येणे, डोके दुखणे, मळमळणे, उलट्या होणे असे अनेक त्रास आपल्या जवळपासच्या व्यक्तींना होत असतात. यालाच गाडी लागणे असेही म्हणतात. चारचौघात हा प्रकार अगदीच लाजिरवाणा असतो. गाडी लागणाऱ्या व्यक्ती सोबत असल्या की प्रवासाचाही  हिरमोड होतो. त्यामुळे मग आपल्या ज्या मैत्रीणींना प्रवासाचा त्रास होतो, त्यांना इतर  लोकही बाहेरगावी  घेऊन जाणे टाळतात. 

मध्यमवयीन बायकांना तरी आता वयामुळे या त्रासाची सवय झालेली असते. पण असा त्रास होणाऱ्या तरूणी मात्र फार हिरमुसून जातात आणि एकट्याच घरात कुढत बसतात. गाडी लागणे या त्रासालाच मोशन सिकनेस असेही म्हणतात. याविषयी झालेल्या एका अभ्यासातून असे लक्षात आले आहे, की पुरूषांच्या तुलनेत महिलांना आणि बालकांनाच याचा सर्वाधिक त्रास होतो. आपणही थोडा विचार केला, तर आपल्या परिचयातील ज्या लोकांना माेशन सिकनेसचा त्रास होतो, त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण महिलांचेच असते. याविषयी अनेक अभ्यास समोर आले असले तरी महिलांनाच नेमका हा त्रास का होतो, यावर अजूनही अनेक तज्ज्ञांचे एकमत होऊ शकलेले नाही. पण ज्या थेअरीला सर्वाधिक मान्यता मिळाली, त्यानुसार महिलांमध्ये असणारा इस्ट्रोजीन हार्मोन मोशन सिकनेससाठी कारणीभूत आहे. प्रेगन्सीमध्ये किंवा मासिक पाळी दरम्यानही अनेकींना मळमळणे, उलट्या होणे असा त्रास होत असतो. नुकत्याच वयात आलेल्या मुलींना तर सुरूवातीचे वर्ष- दोन वर्ष अशा त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे मोशन सिकनेसासाठी देखील इस्ट्रोजीन जबाबदार आहे, असे सांगण्यात आले आहे. ज्या महिलांच्या शरीरात या हार्मोनची पातळी अधिक असते, त्यांना असा त्रास होतो, असे या थेअरीनुसार सांगितले असले तरी ते सत्यच आहे, हे अजूनही सिद्ध झालेले नाही. 

 

मोशन सिकनेसचा त्रास कमी करण्यासाठी हे उपाय करून पहा १. गाडीत बसल्यावर मोबाईल पाहणे, पुस्तक वाचणे टाळा आणि लगेच झोपी जा. २. शक्यतो खिडकीच्या काचा थोड्या उघड्या ठेवा. ३. डाव्या तळहाताच्या अंगठ्याखालची जागा २ ते ३ मिनिटे उजव्या हाताच्या अंगठ्याने दाबून ठेवा. हा एक ॲक्युप्रेशन उपचार आहे. ४. रेल्वेने प्रवास करत असला तर रेल्वे ज्या दिशेने जात आहे, त्याच दिशेने तोंड करून बसा.

५. प्रवासाच्या आदल्या दिवशी तेलकट, तुपकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. तसेच भरपूर झोप घेऊनच प्रवासाला सुरूवात करा. ६. अद्रकाचा तुकडा, लवंग, विलायची प्रवासभर तोंडात चघळत ठेवा. ७. लिंबू सोबत ठेवा. मळमळायला सुरूवात झाली की लिंबू कापा आणि त्यांचा सुवास घ्या. ८. प्रवासादरम्यान जर एकेक घोट सोडा घेत राहिले, तर मोशन सिकनेसचा त्रास होत नाही. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सट्रॅव्हल टिप्स