Join us   

वयात येताना मासिक पाळीचा खूप त्रास होतो? वजनवाढ, पोटदुखी, पिंपल्स? करा आहारात बदल..आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 3:18 PM

मासिक पाळी सुरू होते आणि अचानक हसऱ्या, खेळकर, दंगामस्ती करणाऱ्या मुली शांत होऊन जातात. आपल्या लाडक्या लेकीचा त्या चार दिवसांतला त्रास कमी होण्यासाठी या काही गोष्टी नक्कीच मदत करतील. 

ठळक मुद्दे आपल्या लाडक्या लेकीचा पाळीचा त्रास कमी करायचा असेल, तर मुलींच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. 

मासिक पाळी सुरू होते, तेव्हा बहुसंख्य मुलींना सुरूवातीच्या काळात खूपच जास्त त्रास होतो. एकतर सगळ्यात आधी आपल्याला हे काय होत आहे, हेच त्यांना समजत नाही. पाळीतला रक्तस्त्राव बघूनही अनेकजणी घाबरून जातात. आपल्याला असं काही होत आहे, म्हणजे फारच काहीतरी भयंकर आहे, असंही त्यांना वाटू लागतं. शारीरिक त्रास तर होतच असतो, पण मानसिक त्रासानेही त्या खूपच खचून जातात. अशा काळात आईला त्यांना मानसिक आधारही द्यावा लागतो आणि त्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते.

 

पाळी सुरू होण्याआधी मुली अतिशय अल्लड असतात. काहीजणी खूप जास्त हट्टीही असतात. खाण्यापिण्याच्या बाबतीत अनेकींना चुकीच्या सवयी असतात. त्यामुळे काही मुली दिसायला जरी सुदृढ वाटत असल्या तरी त्या निरोगी नसतात. त्यामुळेही पाळीचा त्रास खूप जास्त होऊ शकतो. म्हणूनच आपल्या लाडक्या लेकीचा त्रास कमी करायचा असेल, तर मुलींच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. 

मुलींना द्या सकस आहार मुलींना निरोगी बनविण्यासाठी त्यांना सकस आणि पौष्टिक आहार देणे खूप गरजेचे आहे. पाळी सुरू होताच मुलींच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा वापर वाढवायला हवा. या काळात फॉलिक ॲसिड योग्य प्रमाणात मिळणे खूप गरजेचे असते. 

 

मुगाच्या डाळीची खिचडी द्या पाळी सुरू होताना पचनसंस्थाही बिघडलेली असते. त्यामुळे हलका आहार देणे गरजेचे आहे. अशावेळी मुलींना तुर, उडीद किंवा अन्य डाळी देण्याऐवजी मुगाची डाळ घालून केलेली खिचडी द्यावी. यामुळे पोटाला आराम मिळेल आणि शरीरात ताकद येईल. मुग पचायला सोपे असल्याने पचनाचा त्रासही हाेणार नाही.

 

फळांचा वापर वाढवावा वयात आल्यानंतर आपल्या मुलीच्या पोटात रोज एक फळ जाईल याची काळजी आईने घेतली पाहिजे. ब्लिडिंगनंतर येणारा अशक्तपणा टाळायचा असेल तर डाळिंब, गाजर, बीट, टोमॅटो हे पदार्थ मुलींना अधिक प्रमाणात खाऊ द्या. यामुळे मुलींना ॲनिमियाचा त्रास होणार नाही आणि शरीरातील रक्ताची पातळी व्यवस्थित राखली जाईल.

 

स्पाईसी पदार्थ देऊ नका पाळीच्या काळात मळमळणे, डोके दुखणे, उलट्या होणे, ॲसिडीटी,  अपचन असे त्रास उद्भवतात. शिवाय मुलगी वयात येताच शरीरात काही हार्मोनल बदल होऊ लागतात आणि त्वचेवर पिंपल्स येतात. त्यामुळे पाळीच्या दिवसांमध्ये तरी मुलींना तेलकट, मसालेदार पदार्थ देणे टाळावे. हलकेफुलके अन्न पोटात गेल्यास पचायला सोपे जाते. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समहिला