lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Adolescence > हल्ली मुलीच नाही तर मुलगेही लवकर वयात येतात, ॲडल्ट कंटेट पाहतात कारण...

हल्ली मुलीच नाही तर मुलगेही लवकर वयात येतात, ॲडल्ट कंटेट पाहतात कारण...

आठव्या नवव्या वर्षी मुलींना पाळी येते, मुलगे थोराड दिसू लागतात त्याची कारणं समजून उपाय करायला हवेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 07:21 PM2022-04-19T19:21:30+5:302022-04-19T19:27:45+5:30

आठव्या नवव्या वर्षी मुलींना पाळी येते, मुलगे थोराड दिसू लागतात त्याची कारणं समजून उपाय करायला हवेत.

early puberty in adolescence-teenage girls and boys, what's the reason | हल्ली मुलीच नाही तर मुलगेही लवकर वयात येतात, ॲडल्ट कंटेट पाहतात कारण...

हल्ली मुलीच नाही तर मुलगेही लवकर वयात येतात, ॲडल्ट कंटेट पाहतात कारण...

Highlightsकोणत्याही प्रकारचे शारीरिक बदल सहजपणे स्वीकारण्याची मानसिकता मुलांमध्ये आणि मुलींमध्ये पालकांनी निर्माण करायला हवी.

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी


मुला-मुलींच्या शारीरिक, मानसिक गोंधळाची कारणे लवकर वयात येण्याशी जोडलेली असतात. अल्पवयात सुरू झालेला हा गोंधळ निस्तरता न आल्याने ही मुले लैंगिक अत्याचारांना बळी पडण्याची शक्यताही वाढते. त्यामागची कारणे काय आहेत?
मुली आणि मुले लवकर वयात येण्याचे प्रमाण अलीकडे वाढीस लागले आहे. मुलींची पाळी लवकर सुरू होणे, मुले कमी वयात थोराड दिसू लागणे, अशा स्वरूपाचे काही लक्षणीय बदल हे त्यापैकीच !
१. दहा वर्षांपूर्वी पर्यंत मुलींना साधारणपणे बाराव्या-तेराव्या वर्षी पाळी येत असे. हेच वय गेल्या पाच-दहा वर्षांत आठव्या-नवव्या वर्षापर्यंत खाली आले आहे.
२. पूर्वीच्या काळी आहारामध्ये समाविष्ट असलेले पदार्थ, आर्थिक स्थिती याबाबत फारशी रेलचेल नव्हती. आता मात्र अन्न सहज उपलब्ध झाले आहे.
३. त्यात आपल्या मुलांनी भरपूर खावे असे पालकांना वाटते. अति खाणे आणि कमी व्यायाम यामुळे स्थूलतेचे प्रमाण वाढू लागले आहे. शाळकरी मुला-मुलींची पोटे सुटल्याचे पाहायला मिळते.

(Image : google)

४. मुले मोबाईलच्या आहारी गेली आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटाने मुलांची मोबाईलशी जास्तच गट्टी जमली आहे. त्यामुळे वाढते वजन ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मुले आणि मुली वयात येण्यावर परिणाम होतो.
५. प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्लास्टिक शरीरामध्ये हार्मोनसारखे परिणाम साधू लागते आणि त्या पद्धतीने शरीरात हार्मोन बदलाची प्रक्रिया सुरू होते. याबाबत देश-परदेशात अधिक सखोल संशोधन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे डबे यातून प्लास्टिकच्या अतिरिक्त वापराचा परिणाम मुलांच्या आणि मुलींच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.
६. यामागे काही न कळलेल्या गोष्टीही असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. टीव्ही, मोबाईल, ओटीटी प्लॅटफॉर्म यामुळे मुलांना लहान वयातच ॲडल्ट कंटेट सहजपणे उपलब्ध झाला आहे. त्याचाही मुला-मुलींच्या शरीरावर आणि आरोग्यावर परिणाम होतो
७. लहान मुलींची शारीरिक वाढ पूर्ण झालेली नसतानाच हल्ली पाळी सुरू होते. त्यातूनच लहान वयापासूनच हार्मोनल समस्या सुरू होण्याचे प्रमाण वाढते. शरीराची वाढ पूर्ण झाली नाही तरी वजन वाढते. शारीरिक वाढ पूर्ण होण्याआधीच पाळी सुरू झाल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
८. मुलांमध्ये वयात येण्याची प्रक्रिया साधी सरळ असते. मुले लहान वयातच थोराड दिसू लागतात. मुले सातवी आठवीपासूनच पॉर्नोग्राफी पाहू लागतात. त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यातूनच टेस्टोस्टेरोन हार्मोन्स सिक्रिशन वाढते.

(Image : google)

९. लहान वयातच मुलींच्या स्तनांची वाढ सुरू होते, उंची वाढत नाही आणि हार्मोनचा स्त्राव मात्र सुरू होतो. अनेकदा मुलींचे मानसिक वय लहान असते, शारीरिक वाढ कमी झालेली असते. मात्र, हार्मोनल बदलांमुळे त्यांच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक आंदोलने सुरू होतात, मुली गोंधळतात. या बदलाला कसे सामोरे जायचे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. अशा मुली लैंगिक अत्याचाराला जास्त बळी पडण्याची शक्यता वाढते. हेच मुलांच्या बाबतीतही होते.
१०. मुलांच्या वाढीवर पालकांनी बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असते. मुला-मुलींशी मोकळेपणाने बोलणे, त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. मुलींना पाळी सुरू झाली किंवा त्या मोठ्या होऊ लागल्या तरी, दररोज एक तास व्यायाम आणि योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा असतो.

(Image : google)

११. वयात येणाऱ्या मुला-मुलींना प्रचंड भूक लागते. त्यांना भूक लागली की सतत खायला दिलेच पाहिजे, असा गैरसमज पालकांच्या मनात रूढ झाला आहे. मुलांना सतत भूक लागणे, या सवयीला पालकांनी आवर घालणे आवश्यक आहे.
१२. मुलींमध्ये सातव्या-आठव्या वर्षीच पाळी आल्यास स्त्रीरोग तज्ज्ञ यांचा तातडीने सल्ला घ्यायला हवा. अशा परिस्थितीत पेडियाट्रिक एंडोक्रोनोलॉजिस्ट यांचा सल्ला घेऊन पाळी लांबविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र हा निर्णय सर्वस्वी डॉक्टरांवर सोपवायला हवा. कोणत्याही प्रकारचे शारीरिक बदल सहजपणे स्वीकारण्याची मानसिकता मुलांमध्ये आणि मुलींमध्ये पालकांनी निर्माण करायला हवी.

(शब्दांकन : प्रज्ञा केळकर-सिंग)

Web Title: early puberty in adolescence-teenage girls and boys, what's the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य